ठाणे : ठाणे पालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात या अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर होणारी टीका टाळण्यासाठी प्रशासनाकडून या बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. असे असताना देखील लोकसभा निवडणुकीचा फायदा घेत कळवा, खारेगाव, दिवा आणि मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामे जोमात उभी राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात संजय घाडीगावकर यांनी यासंदर्भातील पुरावे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे आता पालिका प्रशासन यावर काय कारवाई करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ठाणे पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर टीका करण्यात येत आहे. याची दाखल घेत तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी अशा बांधकामांवर कारवाईचे संकेत देत, पुन्हा नव्याने बांधकामे होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचनादेखील त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या होत्या. त्यात विधानसभेतदेखील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी यासंदर्भात आवाज उठविल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मागील काही महिने अनधिकृत बांधकामांना अंकुश घालण्यात पालिकेला यश आले होते; परंतु आता पुन्हा आचारसंहितेच्या आड अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचे चित्र खास करून कळवा, मुंब्रा, दिवा भागात दिसत आहे.
नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनीदेखील मागील महिन्यात अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. असे असले तरी दुसरीकडे यावर थातुरमातुर कारवाई केली जात असून आजही अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचे चित्र दिसत आहे. यासंदर्भात उद्धव सेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर यांनी तक्रार केली. त्यावर उपायुक्तांनी संबधित सहायक आयुक्तांना पत्र पाठवून या तक्रारीच्या अनुषंगाने शहनिशा करून कारवाई करावी, असे म्हटले आहे. तसेच दिव्यात ८८च्या आसपास अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचा दावा घाडीगावकर यांनी केला.
