मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय मोफत प्रवासासाठी समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी या सेवेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांच्या सोई-सुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच ८५ पेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर सोई-सुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेऊन जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी मतदारसंघनिहाय समन्वय अधिकारी दिव्यांग मतदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *