एकनाथ शिंदेंचे मिशन दुबई
दुबईत अडकलेल्या नागरिकांसाठी दोन खाजगी विमान व्यवस्थांची व्यवस्था
दुबईच्या फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअर दोन विमानाव्दारे केली व्यवस्था
मुंबई: इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे आखाती देशातील विमानवाहतूकसेवा पुर्णता ठप्प झाल्याने अनेक भारतीय आखाती देशात अडकले आहेत. यापैकी दुबईत अनेक महाराष्ट्रीयन नागरीकही अडकलेले होते. समाजमाध्यमांवरून त्यांनी भारत आणि महाराष्ट्र सरकारकडे दुबईतून सुटकेची मागणी केली होती. अशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिशन दुबई हाती घेतले आणि दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि नागरिकांसाठी दोन खाजगी विमानांची व्यवस्था केली आणि त्यांना सुखरूप मुंबईत परत आणले.
या सर्वांचे विमानतळावर स्वागत करायला शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या एन.सी. शायनासहीत अनेक शिवसैनिक उपस्थित होत. गुलाबाचे फुल देऊन त्यांचे मुंबई विमानतळावर स्वागत करण्यात आले.
शिंदेंच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून स्टार एअरच्या ची दोन विशेष विमाने दुपारी फुजैरा एअरपोर्ट वरून महाराष्ट्राच्या नागरिकांना घेऊन निघाली. आणि रात्री मुंबईत दाखल झाली. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज चे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आदी भागातील इतर नागरिकांचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच या मराठी नागरिकांशी संवाद साधला होता. “तुम्ही सर्व सुरक्षित आहात, काळजी करू नका, महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील,” असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांशी अखंड संपर्क साधून या १६४ प्रवाशांना आज मायदेशी मुंबईत आणण्यात आले.
देवेंद्र फडणवीसही विविध यंत्रणांशी संपर्कात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून अडकलेल्या नागरिकांना परत भारत आणण्यासाठी पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः विविध यंत्रणांशी नियमित संवाद साधत असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मदतीची आवश्यकता असलेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. मदतीसाठी अडकलेल्या प्रवाशांनी त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आले आहे.
