२ जुलै २०२३ रोजी अजित पवारांनी आपले काका आणि महाराष्ट्रातील जाणते नेते शरद पवार यांना जाहीर सोडचिठ्ठी दिली. तेव्हापासून काका आणि पुतण्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. त्यातील एक महत्त्वाचा आरोप म्हणजे काकांनी माझ्यावर कायम अन्याय केला आणि २००४ मध्ये मला मुख्यमंत्री बनण्याची संधी असतानाही काकांनी मी मुख्यमंत्री बनू नये, म्हणून राष्ट्रवादीच्या जागा जास्त असतानाही काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊन टाकले होते, असा आहे.या आरोपाच्या उत्तरात शरद पवार यांनी २००४ मध्ये पक्षात मुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी अनुभवी कोणीच नव्हते आणि अशा परिस्थितीत मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेतले असते तर पक्षात भांडणे होऊन पक्ष फुटला असता असा दावा शरद पवारांनी केला होता. वस्तूतः त्या काळात पक्षात अनुभवी व्यक्ती बऱ्याच होत्या, आणि कोणीही व्यक्ती मुख्यमंत्री पदाचा अनुभव घेऊन जन्माला आलेली नसते. शरद पवारही अनुभव नसतानाच मुख्यमंत्री झाले होते मात्र २००४ मध्ये मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव असणारे बरेच जाणकार पक्षात होते. त्यामुळे अनुभवी व्यक्ती नव्हती असे शरद पवारांनी सांगणे हे कुणालाच पटणारे नव्हते.
शरद पवारांचा हा दावा धादांत खोटा असल्याचा आरोप अजित पवारांनी काल त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना केला आहे. त्यावेळी अजितदादा म्हणाले की २००४ मध्ये शरद पवारांनी मुख्यमंत्री पद नाकारले, त्याला कारणे वेगळी होती. यापूर्वी १९९१ मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांना केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून जावे लागले होते. त्यावेळी त्यांनी पद्मसिंह पाटील यांचे नाव बाजूला ठेवून सुधाकर नाईक यांना मुख्यमंत्री केले होते. मात्र वर्षभरातच सुधाकरराव नाईक शरद पवारांना ऐकेनासे झाले. त्यामुळे शरद पवारांनी सुधाकर रावांना हटवले आणि ते महाराष्ट्रात परत आले .२००४ मध्येही पक्षातील कोणत्याही लायक व्यक्तीला मुख्यमंत्री केले आणि त्यानेही वर्षभरात आपले ऐकणे बंद केले तर आपली चांगलीच बेइजती होईल अशी भीती शरद पवारांना वाटली, आणि त्या भीतीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या कोणालाही मुख्यमंत्री होऊच दिले नाही, असा दावा अजित पवारांनी पक्ष मेळाव्यात बोलताना केला आहे.
अजित पवारांच्या दाव्यात काहीही तथ्य नाही, असे म्हणणे काहीसे धाडसाचे ठरेल. जेव्हा राज्याचे राजकारण सांभाळणारा एखादा कर्तृत्ववान नेता केंद्रात जातो, तेव्हा राज्यात नेमला जाणारा नवा मुख्यमंत्री हा आपल्या सूचनेनुसार नेमला जावा, अशी त्याची अपेक्षाही असते, आणि प्रयत्नही असतात. १९९१ मध्ये शरद पवारांनी नेमके तेच केले होते. त्यांनी सुधाकरराव नाईकांना मुख्यमंत्री केले खरे, पण सुधाकररावंनी शरद पवारांचे ऐकणे बंद केले आणि त्याचा परिणाम म्हणून शरद पवारांना महाराष्ट्रात परत यावे लागले असे तत्कालीन राजकीय विश्लेषक सांगतात. १९९१ मध्ये जे झाले तेच २००४ मध्ये होणार नाही कशावरून? अशी भीती शरद पवारांना वाटू शकते. त्यावेळी जर राष्ट्रवादी काँग्रेस कडे मुख्यमंत्री पद आले असते, तर छगन भुजबळ, आर आर पाटील, जयंत पाटील, अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील अशी दिग्गजांची नावे चर्चेत होती. या सर्वच व्यक्ती कर्तबगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होत्या. आणि विशेष म्हणजे दीर्घकाळ कोणाच्याही ओंजळीने पाणी पिणाऱ्यांपैकी त्या नव्हत्या. त्यात अजित पवार हे तर पवारांच्या घरचेच होते मात्र. त्या काळातही अजितदादांचा तोडफोड स्वभाव प्रसिद्ध होता. जयंत पाटील किंवा छगन भुजबळ यांनी भविष्यात ऐकले नसते तर त्यांना बाजूला करणे सोपे होते. मात्र अजित पवारांना एकदा मुख्यमंत्री करून मग पायउतार करायला लावणे हे शरद पवारांसाठी अडचणीचे ठरणार होते. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री पद न स्वीकारणे शहाणपणाचे असा निर्णय घेतला असू शकतो.
अशाप्रकारे कर्तबगार नेता केंद्रात गेल्यावर त्याचे लक्ष पूर्णतः राज्याकडे असते, आणि दिल्लीत बसून तो राज्यातल्या मुख्यमंत्र्याला नामधारी बनवून आपल्या मनाप्रमाणे कारभार चालवण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावून पाहिले तर पवारांच्या आधीही असे दाखले निश्चित मिळतात. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य गठीत झाले, त्यावेळी पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड झाली होती. यशवंतराव हे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अत्यंत विश्वासू होते. त्यामुळे त्यांच्याकडे महाराष्ट्राचा कारभार सोपवला होता. १९६२ मध्ये देशावर चीनने आक्रमण केले. तत्कालीन संरक्षण मंत्री परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले असा नेहरूंचा समज झाला. त्यामुळे त्यांनी संरक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलवून केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त केले. सहाजिकच महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद रिक्त झाले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी आपले विश्वासू म्हणून विदर्भातील मारोतराव कन्नमवार यांना मुख्यमंत्री बनवले. असे म्हणतात की त्या काळात महाराष्ट्राचा कारभार कसा चालवायचा याबाबत यशवंतरावच फोनवरून कन्नमवार यांना सूचना द्यायचे. त्यामुळे कन्नमवार त्रासून जायचे. अनेकदा ते चव्हाण यांच्या सांगण्यावरून एखादा निर्णय घ्यायचे, आणि तो चुकीचा ठरला की तोफेच्या तोंडी कन्नमवार यांना दिले जायचे. चव्हाण करून सवरून नामा निराळे राहायचे. या सर्व प्रकाराने त्रासून ‘रामायणातला राम वनवासात होता आणि भरत त्याच्या पादुका सांभाळत होता, माझा राम दिल्लीत बसला आहे, आणि मी इथे मुंबईत त्याच्या पादुका सांभाळतो आहे,’ असे उद्विग्न उद्गार मारोतराव कन्नमवार अनेकदा काढायचे, असे तत्कालीन पत्रकार आणि अधिकारी सांगतात. काही वेळा त्रासून कन्नमवार ‘मला फोनवर नीट ऐकू येत नाही, तुम्ही लिहून पाठवा, म्हणजे मी ॲक्शन घेतो’ असेही चव्हाण यांना सांगायचे, असे सांगणारेही काही पत्रकार काल-परवापर्यंत तरी होते.
कन्नमवार हे मुख्यमंत्रीपदी जेमतेम वर्षभर राहिले. त्यांच्यानंतर चव्हाण यांनी वसंतराव नाईक यांना आपल्या विश्वासातले म्हणून मुख्यमंत्री नेमले होते. कन्नमवार हे काहीसे रांगडे होते. तर नाईक हे चतुर होते, त्यांनी चव्हाण यांना सांभाळून घेत दीर्घकाळ आपल्या मनाप्रमाणे कारभार चालवला. मात्र त्यांची चतुराई चव्हाण यांच्या लक्षात येऊ लागली, त्यावेळी चव्हाणांनीच विदर्भ मराठवाडा वाद उभा केला, आणि वसंतराव नाईकांना राजीनामा द्यायला भाग पाडले असे म्हटले जाते. नंतर मुख्यमंत्री झालेले शंकराव चव्हाण हे देखील यशवंतरावंना ऐकत नव्हते. त्यावेळी आणीबाणी होती. त्यामुळे यशवंतरावंना जास्त बोलता आले नाही. मात्र आणीबाणी संपताच यशवंतरावंनी शंकररावंना राजीनामा द्यावा लागेल अशी परिस्थिती आणली, आणि आपल्या सोयीचे वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री केले होते, असे दाखले तत्कालीन पत्रकार देतात.
शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे शिष्य आहेत. त्यामुळे त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरच शरद पवारांची वाटचाल सुरू राहिलेली आहे. हे बघता आपण दिल्लीत गेलो तरी राज्याचा रिमोट कंट्रोल आपल्याच हातात राहिला पाहिजे, या भावनेतून त्यांनी दीर्घकाळ राज्यकारभार चालवला आहे. मग ते १९९१ चे मुख्यमंत्री असोत किंवा १९९९ ते २०१४ पर्यंतचे उपमुख्यमंत्री असोत, त्यांचा रिमोट कंट्रोल आपल्याच हाती राहील ही काळजी शरद पवार कायम घेत आले आहेत. अजित पवार हे शरद पवार यांचे सख्खे पुतणे आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनात अजित पवारांनी आपली राजकीय वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे पवारांच्या राजकीय खेळी अजित पवारांशिवाय दुसऱ्या कोणाला इतक्या चांगल्या माहीत असणार? म्हणूनच २00४ मध्ये जास्त जागा मिळूनही उदार अंतःकरणाने शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद का देऊन टाकले या मागचे रहस्य अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेसमोर उघडे केले आहे हे या प्रकारातून स्पष्ट दिसते आहे. कोणत्याही राजकीय नेत्याला पक्षावर आपलीच अनिर्बंध सत्ता राहावी असे वाटत असते, यशवंतराव चव्हाण यांनाही तसेच वाटत होते, त्यांनी सत्तेचा हा रिमोट कंट्रोल दीर्घकाळ सांभाळला. मात्र एका क्षणी त्यांच्या हातून हा रिमोट कंट्रोल निसटला होता. आणि नंतर शेवटली चार-पाच वर्ष ते दिल्लीत असताना जवळजवळ राजकीय विजनवासातच होते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्याच मार्गाने शरद पवारांनी वाटचाल केली. आज त्यांच्या सख्ख्या पुतण्यानेच त्यांच्या विरोधात बंड केले आहे, आणि त्यांचे अनेक जवळचे साथीदार त्यांच्यापासून दूर चालले आहेत, हा प्रकार असाच सुरू राहिला तरत्यांच्यावरही यशवंतराव चव्हाण यांसारखीच विजनवासात जाण्याची वेळ येईल असे तर होणार नाही ना. शरद पवार हे सुज्ञ आहेत. ते या सर्व घटनाक्रमातून बोध घेतील अशी आशा करूया.