Month: May 2024

नाल्यातून गाळ काढण्याला येणार वेग

मुंबई : नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करावीत. रेल्‍वे, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांसह विविध विभागांशी योग्‍य समन्‍वय साधून ५ जूनपर्यंत नाल्‍यातील गाळ काढण्‍याची कामे पूर्ण करा, आवश्यक तेथे अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा, असे स्‍पष्‍ट निर्देश पालिका आयुक्‍त भूषण गगराणी यांनी दिले. तसेच उपायुक्‍त, सहायक आयुक्‍तांनी आपल्या विभागात दररोज सकाळ, सायंकाळी विभागात नाल्यातील गाळ काढण्याची पाहणी करावी. पाणी साचण्‍याच्‍या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून पाण्‍याचा जलद गतीने निचरा होण्‍याकामी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आखाव्‍यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. यंदाच्‍या पावसाळ्याच्‍या पार्श्‍वभूमीवर नाल्‍यांतून गाळ काढण्‍याच्‍या कामांची आढावा बैठक पालिका आयुक्‍त गगराणी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली महापालिका मुख्‍यालयात झाली. अतिरिक्‍त पालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, डॉ. अमित सैनी, अभिजीत बांगर, डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्‍त चंद्रशेखर चोरे आदी अधिकारी बैठकीस उपस्थित होते. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये नाल्‍यातून गाळ उपशाची कामे जलद गतीने करण्यात येत आहेत. नाल्यांमधून उद्दिष्टाएवढे किंवा त्याहूनही अधिक गाळ काढण्याचे काम ५ जून अखेरपर्यंत पूर्ण करावे. या मुदतीत ही कामे पूर्ण होतील, त्या दृष्टीने नियोजन करून संपूर्ण यंत्रणेने कार्यवाहीला वेग द्यावा, अशा सूचना आयुक्त गगराणी यांनी दिल्या. नाल्यातील गाळ काढण्याची कामे योग्यरीत्या सुरू आहेत, हे पाहण्यासाठी पालिकेच्‍या उपायुक्‍त, सहायक आयुक्‍तांनी नाल्यांच्या ठिकाणी भेट द्यावी, असे स्‍पष्‍ट करतानाच आयुक्‍त म्‍हणाले की, नाल्‍यालगतच्‍या रहिवाशांकडून नाल्‍यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्‍याच्‍या तक्रारी असल्‍या तरीदेखील तरंगत्‍या कचऱ्याची योग्‍य प्रकारे विल्‍हेवाट लावावी. नाले तुंबता कामा नयेत, याची दक्षता घ्यावी, रुंद नाल्‍याच्‍या ठिकाणी ‘ट्रॅश बूम’चा वापर करावा. स्‍थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्‍यांचा सहयोग घ्‍यावा, असेही गगराणी यांनी नमूद केले. रेल्वे हद्दीतील नाले साफ करा रेल्वे प्रशासनासमवेत समन्‍वय साधून रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासह कल्व्हर्ट स्वच्छता कामांची पाहणी करावी. विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावावेत, मुंबई शहरात पाणी साचू नये, त्‍याचा जलद गतीने निचरा व्‍हावा, यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आखाव्‍यात, असे निर्देश आयुक्‍त गगराणी यांनी दिले आहेत.

गुजरातमधील रुग्णावर ठाणे जिल्हा रुग्णालयात गंभीर शस्त्रक्रिया

ठाणे : जिल्हा सामान्य रुग्णालय गरीब आणि गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. महागड्या आणि अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून या रुग्णालयातील डॉक्टर मोलाची कामगिरी बजावत आहेत. केवळ जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे; तर इतर राज्यातील गरजू रुग्णांनादेखील हे रुग्णालय आधार देत आहे. गुजरातमधील अशाच एका गरजू रुग्णावर मोठी शस्त्रक्रिया करून येथील डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवला आहे. या रुग्णाच्या यकृतावर आठ फोड आले होते. त्यात मोठ्या प्रमाणात पू तयार झाला होता. महाराष्ट्रातील काही राजकीय नेते गुजरात मॉडेलचे कौतुक करत असतात; मात्र याच राज्यातून एका रुग्णाने गंभीर आजारावर योग्य उपचार व्हावेत, यासाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आधार घेतला. गुजरातमधील सुरत शहरात वाहन चालवण्याचे काम करणाऱ्या या रुग्णावर तेथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र तेथे त्याच्यावर योग्य उपचार होत नव्हते. त्याच्या पोटात दुखत असल्याने त्याला तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवाय रुग्णाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याला तेथील खर्चदेखील परवडणारा नव्हता. त्यामुळे शांताराम चव्हाण (३०) नामक रुग्णाला या आजारावर ठाणे जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात चांगले उपचार होतात, याची माहिती मिळताच त्याने ठाणे या रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार अणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णाच्या सर्व तपासण्या केल्या असता त्याच्या यकृतावर आठ फोड झाल्याचे निदान झाले. शिवाय या फोडांमध्ये पू देखील झाला होता. ते फोड आतच फुटले तर रुग्णाच्या जीविताला मोठा धोका होता. त्याच्या छातीतही पाणी झाले होते. तज्ज्ञ डॉक्टरांनी सुरुवातीला त्याच्या छातीमधील पाणी काढून नंतर मोठ्या कौशल्याने अवघड शस्त्रक्रिया केली. तसेच त्याच्या यकृतावरील आठही फोड काढून टाकले. शस्त्रक्रियेनंतर त्याची योग्य काळजी घेऊन पंधरा दिवसांच्या उपचारानंतर त्याला घरी सोडून देण्यात आले, अशी माहिती डॉ. निशिकांत रोकडे यांनी दिली. रुग्णावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकात वरिष्ठ सर्जन डॉ. निशिकांत रोकडे, डॉ. विश्वास वासनिक, डॉ. श्रीजित शिंदे, डॉ. प्रतीक बिश्वास आदी होते.

बदलापुरात नालेसफाईला सुरुवात

बदलापूर : मागील काही वर्षांपासून अतिवृष्टी झाल्यास बदलापूर शहराला पुराचा तडाखा बसतो. त्यामुळे बदलापूर शहरात पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या नाल्यांच्या सफाईचे काम कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने हाती घेतले आहे. शहरातील १३ मोठ्या नाल्यांसहित इतर गटारे व नाल्यांच्या सफाईचे काम सुरू केल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकारी श्रेया शिरवटकर यांनी दिली आहे. पावसाळा आणि बदलापूर शहराचे जणू जुने समीकरण आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुरानंतर, २०१८, २०१९ मध्येही पूरपरिस्थिती निर्माण झाली होती; मात्र प्रत्येक वर्षीच बदलापूर शहरातील पश्चिमेकडील अनेक सखल भागांत जास्त पाऊस पडल्यास पाणी साचते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पालिकेने नालेसफाईचे काम पूर्ण करणे अपेक्षित असते. यंदा लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात पालिकेचा सगळा कर्मचारी वर्ग व्यस्त असल्याने नालेसफाईच्या कामाला उशिरा सुरुवात झाली आहे. मात्र तरीही निवडणुकीची कामे पूर्ण करत शहरातील नालेसफाईला आठवडाभरापूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. बदलापूर पूर्व येथील शिरगाव गावातून पुढे आपटेवाडी, कात्रप, स्टेशन परिसर व पुढे पश्चिमेला शनिनगर, हेंद्रेपाडा इथून निघणारा हा नाला उल्हास नदीला जाऊन मिळतो. या नाल्याची सफाई करण्यात येत आहे. तसेच शहरात एकूण १३ मोठ्या नाल्यांच्या सफाईला सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडे असणाऱ्या जेसीबी व पोकलेनच्या साह्याने नालेसफाईला सुरुवात केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. साधारण शहरातील संपूर्ण नालेसफाई ३१ मे पूर्वी पूर्ण होईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकारी श्रेया शिरवटकर यांनी दिली आहे.

गुरुवारी एका तासाचा वाहतूक ब्लॉक

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी एका तासाचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर किमी ६.००० येथे पुणे – मुंबई (मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर) गॅन्ट्री बसविण्याचे काम गुरुवारी करण्यात येणार आहे. या कामासाठी दुपारी १२ ते १ या वेळेत वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे – मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन किमी ५५.००० वरून वळवून मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जुना मुंबई – पुणे मार्गावरून जाता येईल. यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे – मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झीट किमी ३९.००० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ जुना पुणे – मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडूंग टोल नाका मार्ग मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करण्यात येतील. यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे – मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी व जड-अवजड वाहने खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झीट किमी ३२.००० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ जुना पुणे – मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका मार्ग मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करण्यात येतील. यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी व जड-अवजड वाहने पनवेल क्र. ४८ या मार्गावरून पनवेल मार्ग मुंबई दिशेने मार्गस्थ करण्यात येतील. मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून पुणे येथून मुंबईला जाणारी वाहने शेडुंग फाट्यावरून सरळ पनवेल दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.

एसटीच्या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

अवघ्या ५ महिन्यात १२ लाख ९२ हजार इतक्या ऑनलाईन तिकीटाची विक्री – अभिजीत भोसले अनिल ठाणेकर ठाणे : एसटीच्या  नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. १ जानेवारी २०२४ ते २० मे २०२४ पर्यंत म्हणजे अवघ्या पाच महिन्यात १२ लाख ९२ हजार इतक्या तिकीटाची विक्री या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनो दिली आहे. १ जानेवारी २०२४ पासून ऑनलाईन आरक्षण प्रणाली अदयावत  करुन नव्याने सुरु करण्यात आलेल्या तिकीट आरक्षण प्रणालीला उदंड प्रतिसाद मिळाला असून १ जानेवारी २०२४ ते २० मे २०२४ पर्यंत १२ लाख ९२ हजार इतक्या तिकीटाची विक्री या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे. याच काळात मागील वर्षी ९ लाख ७५ हजार तिकीटांची विक्री झाली होती म्हणजेच  मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे३ लाखाने जास्त आहे. सध्या या ऑनलाईन आरक्षण प्रणालीव्दारे दररोज १० हजार तिकीटे काढली जात आहेत. प्रवाशांना  घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करुन देण्याच्या उददेशाने एसटीने आपल्या npublic.msrtcors.com अधिक़ृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे. तसेच मोबाईलवर MSRTC Bus Reservation ॲपच्या माध्यमातून देखिल प्रवाशांना तिकीट काढता येते. या दोन्ही पध्दतीव्दारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये १ जानेवारी, २०२४ पासून अमुलाग्र बदल करुन त्या अदयावत करण्यात आल्या. परिणामी त्यातील अनेक दोषांचे निर्मुलन झाल्याने सदर ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत  सोपी व सुलभ झाली आहे. तसेच या दोन्ही प्रणालीव्दारे  प्रवाशांना अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतीचे ‍ देखिल आगाऊ आरक्षण मिळु शकते. त्यासाठी महामंडळाने npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच MSRTC Bus Reservation ॲपच्या वापर प्रवाशांनी करावा असे आवाहन केले आहे. तथापी, ऑनलाईन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास ७७३८०८७१०३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. सदर नंबर प्रवाशांना तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी २४ तास सुरु असणार आहे. तसेच ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरुन देखिल तिकीटे न येणे (पेमेंट गेट वे संदर्भात) या तक्रारींसाठी ०१२०-४४५६४५६ या दुरध्वनी क्रमांकावर  संपर्क करावा, असे आवाहन अभिजीत भोसले यांनी केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत समन्वय महत्त्वाचा-तहसीलदार आयुब तांबोळी

अशोक गायकवाड खालापूर : मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तहसिलदार तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती खालापूर आयुब तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय खालापूर येथे तालुक्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालय प्रमुखांची बैठक संपन्न झाली आपत्कालीन परिस्थितीत समन्वय महत्त्वाचा आहे, असे मत-तहसीलदार आयुब तांबोळी यांनी व्यक्त केले. सदर बैठकीस निवासी नायब तहसिलदार खालापूर सुधाकर राठोड, सहा. गटविकास अधिकारी पंचायत समिती खालापूर सी.एस. राजपूत, उपमुख्याधिकारी नगरपरिषद खोपोली गौतम भगळे, अहगिनशमन अधिकारी, म.ओ.वि.म.पाताळगंगा आशिष मोरे, आरोग्य निरीक्षक, ता.आ. कार्यालय खालापूर प्रशांत अंबुर्ले, पोलीस उपनिरीक्षक खोपोली पोलीस ठाणे कर्मराज गावडे, पोलीस निरीक्षक, खालापूर पोलीस ठाणे एम.पी. खोपडे,पोलीस निरीक्षक रसायनी पोलीस ठाणे संजय बांगर,अशोक मोरे, कनिष्ठ अभियंता, मोरबे धरण न.मु.म.पा.,सुदर्शन आगलावे, शा.अभियंता, रा.जि.प.कर्जत, रविंद्र म्हात्रे, वनपाल, वनपरिक्षेत्र खालापूर, दिक्षांत वाघ, म.रा.वि.मर्या., खालापूर, वी.जी. आंब्रस्कर, दुय्यम निबंधक खालापूर, ङिएम. मोरखंडीकर, नगरपंचायत खालापूर, ङिके.भोईर, खालापूर पोलीस ठाणे, आर.एम.भदले, रसायनी पोलीस ठाणे, डी.बी.नाईक, ग्रामीण पाणी पुरवठा रा.जि.प. उपविभाग खालापूर, ए.जी.तेलखडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग खालापूर, श्रीम. शिल्पा दास पवार, शिक्षक विभाग पंचायत समिती खालापूर, संजय पवार, अग्निशमन पाताळगंगा, अजित महारनूर, सां.बां. विभाग खालापूर, एस.बी.मेंगाळ, पाटबंधारे विभाग, कर्जत, गुरुनाथ साठेलकर, अध्यक्ष, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, निलेश कुडले, सदस्य, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, अमोल कदम, सदस्य, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था,महेश भोसले, सदस्य, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आदी उपस्थित होते. सन २०२४ च्या मान्सूनपुर्व तयारी अंतर्गत तालुक्यातील दरडप्रवण पूरप्रवण, धरणक्षेत्र, तलाव, धबधबे या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. सदर बैठकीमध्ये सर्व विभागांनाप्रमुखांना आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, नियंत्रण कक्ष स्थापन करणे, अधिकारी/कर्मचारी यांची मोबाईल नंबरसह अद्यावत माहिती सादर करण्याच्या सूचना देणेत आल्या. तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सर्व विभागाला त्यांचे कार्यालयातील नोडल अधिकारी यांची नेमणूक करुन, त्याची माहिती तालुका नियंत्रण कक्षात सादर करणेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विभागप्रमुखांनी विनापरवानगी मुख्यालय सोडू नये, भ्रमणध्वनी कायम सुरु ठेवण्याच्या व तालुक्यात उद्भवण्यात येणाऱ्या संभाव्य आपत्तीस तात्काळ प्रतिसाद देण्याचे निर्देश दिले. नैसर्गिक आपत्ती सन २०२४-२५ च्या अनुषंगाने तहसिलदार कार्यालय खालापूर येथे २४x७ तास तालुका नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. खालापूर तालुका नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक: १) ०२१९२-२७५०४८ २) ८२६२८९७८८८

उल्हासनगर महानगरपालिका अधिकाऱ्याच्या कन्येची 95 टक्क्यांना गवसणी

उल्हासनगर : मनिष हिवरे हे उल्हासनगर महानगरपालिकेत तीन महत्वाच्या पदावर अधिकारी असून त्यांची एकुलती एक कन्या सौम्या हिवरे हिने 12 वीच्या परीक्षेत 95 टक्के गुणांना गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे 10 वीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवणाऱ्या सौम्याने 12 वितही 95 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. सहायक आयुक्त प्रभाग समिती 2,सहायक आयुक्त सामान्य प्रशासन आणि सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी या तीन पदाचा पदभार मनिष हिवरे हाताळत आहेत.त्यांची कन्या सौम्या हिने 10 वि मध्ये 97 टक्के गुण मिळवून माटुंग्यातील पोद्दार महाविद्यालयात कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला आहे मनिष हिवरे यांची पत्नी व सौम्याची आई प्रज्ञा हिवरे ह्या डबल ग्रॅज्युएट असून सौम्याच्या अभ्यासाची जबाबदारी त्या लिलया पार पाडतात.कॉलेज,क्लास आणि आई कडून घेण्यात येणाऱ्या सरावाचे चीज सौम्याने 95 टक्के गुण मिळवून करून दाखवले आहे. सौम्या ही सी.ए करणार असून पुढे ती एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे.आयुक्त अजीज शेख,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,उपआयुक्त किशोर गवस,डॉ.सुभाष जाधव,नोडल अधिकारी गणेश शिंपी,सर्व विभाग प्रमुखांनी सौम्या हिवरे हिचे अभिनंदन केले आहे.

मे अखेरीस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

मुंबई : तापमानाचा पारा वाढणार असून पुढील काही दिवस मुंबईकरांसाठी उष्ण, दमट आणि अस्वस्थ करणारे आहेत. मेअखेरीस पावसाचे पुनरागमन होत असून त्याचाच हा परिणाम असल्याचे हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनी सांगितले. यामुळे मुंबईमध्ये प्री-मान्सून सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सांताक्रूझ येथे ३४.९; तर कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली; तर आर्द्रता सुमारे ६५ ते ७० टक्क्यांच्या आसपास नोंदवली गेली. यामुळे मुंबईत सध्या दमट वातावरणाचा सामना करावा लागत आहे. पुढील आठवड्यात यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सध्या सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ आणि दुपार व संध्याकाळपर्यंत आकाश निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५ अंश सेल्सिअस आणि २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

खालापूरमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र

आदिवासी वस्त्यांची पाण्यासाठी पायपीट खोपोलीः आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, अशी परिस्थिती सध्या खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने खालापूर तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. प्रशासनाकडून पाणीटंचाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी ते तोकडे पडत आहेत. सध्या खालापूरमध्ये काही वाड्या व सहा-सात दुर्गम गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे तर आणखी आठ गावांना टँकरने पाणीपुरवठ्याचा प्रस्‍ताव आहे. २० हून अधिक वाड्या व गावांमधील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विंधन विहिरींसह अन्य उपाययोजनांवर भर दिला जात असला तरी नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे. तापमानाचा पारा वाढल्‍याने विहिरी कोरड्या पडल्या असून धरणांतील पाणीसाठाही कमी झाला आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही टंचाईच्या झळा तीव्र झाल्‍या आहेत. अनेक वाड्यात सद्यःस्थितीत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तर काही ठिकाणी टँकर सुरू करण्याबाबत प्रस्‍ताव प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. या गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्‍न आहे. तालुक्यातील परखंदे वाडी, शिरवली, डोणवत ठाकूरवाडी, वावोशी बौद्धवाडा, दांडवाडी, गोहे, बीड खुर्द, नडोदे, खरीवली, नारंगी, देवकुंड, शिरवली-ढेबेवाडी, चिंचवली-गोहे, बोरगाव-तारवाडी, वरोसे आंबेवाडी या ठिकाणी दरवर्षी पाणीटंचाई भेडसावते. ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळावे, त्‍यांची वणवण थांबावी यासाठी तालुका प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. ही गावे व वाड्यांमध्ये अनेक इंधन विहिरी व पाणी साठवणूक टाक्या पूर्णत्वास आल्या आहेत, तर काही प्रकल्प प्रस्तावित असून दीर्घकालीन उपाययोजनांमुळे या ठिकाणीचा पाणी प्रश्‍न निकाली निघेल, असा विश्‍वास प्रशासनाला आहे. योजनांच्या रखडपट्टीवर मौन खालापूर तालुक्यात तीन मोठी धरणे, अनेक पाझर तलाव व बारा महिने वाहणारी पाताळगंगा नदी आहे. असे असले तरी खालापुरकरांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. दरम्यान प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असल्याचे गटविकास अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, मात्र योजना का रखडलेल्या या बाबत बोलण्यास कोणीही तयार नाही. खालापूर तालुक्यातून पाताळगंगा नदी वाहते. मोर्बा, कलोते, डोणवत या धरणांबरोबरच आत्करगाव, नढाळ यांच्यासह अनेक पाझर तलाव आहेत. असे असताना अनेक गावे व वाड्यांवर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन् मैलाची पायपीट करावी लागते. प्रशासनाने सर्वच ठिकाणी पाणी योजना राबवल्‍या असल्‍या तरी निम्म्‍याहून अधिक योजनांची कामे रखडली आहेत. बारा महिने वाहणाऱ्या पाताळगंगा नदीच्या पाण्यावर अनेक गावांच्या योजना पूर्ण होऊ शकतात. मात्र नदीतील वाढते प्रदूषण, प्रशासनाची उदासीनतेमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्‍याचे नागरिकांची तक्रार आहे.

सर्व आमदारांच्या आग्रहाखातर वरीष्ठांना अजितदादांना उपमुख्यमंत्री करावे लागले – उमेश पाटील

अजितदादांनी कुणाला न विचारता शपथविधी करण्याचा निर्णय घेतला असता, तर पुन्हा त्यांना वरीष्ठांनी उपमुख्यमंत्री केले असते का? मुंबई : अजितदादांनी घेतलेला पहाटेचा शपथविधी ही गद्दारी समजली गेली आणि तसे चित्र निर्माण करण्यात आले. अजितदादांनी तो निर्णय परस्पर घेतला होता असे सांगितले गेले परंतु वस्तुस्थिती तशी अजिबात नव्हती अजितदादांनी कुणाला न विचारता असा निर्णय घेतला असता तर पुन्हा त्यांना उपमुख्यमंत्री केले असते का? असा सवाल करतानाच यामध्ये अजितदादांची काहीही चूक नाही हे ज्यावेळी लक्षात आले त्यावेळी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर अजितदादांना उपमुख्यमंत्री करा असे ठरले त्यामुळेच वरीष्ठांना अजितदादांना उपमुख्यमंत्री करावे लागले असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. शरद पवार यांनी आपल्या मुलाखतीत अजितदादांवर जे मुद्दे मांडले त्यावर मंगळवारी संध्याकाळी उमेश पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत सर्व मुद्दे खोडून काढले शिवाय अनेक गौप्यस्फोट करत तुतारी गटाची हवाच काढली. अजितदादांना पक्षात माफी मागायला लावून परत घेतले हे जे सांगितले जाते ती वस्तुस्थिती नव्हती तर सर्व आमदारांचे समर्थन अजितदादांना होते त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारमध्ये अजितदादांना उपमुख्यमंत्री करण्यात आले ही वस्तुस्थिती आहे असेही उमेश पाटील म्हणाले. २००४ पासून २०१९ पर्यंत सातत्याने वरीष्ठांनी पक्षात यु टर्न घेतल्यामुळेच अंतर्गत कलह वाढला आणि अशी परिस्थिती निर्माण झाली. कधी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव तर कधी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव तयार केला गेला. या पुत्र आणि पुत्री प्रेमातून दोन्ही पक्षात फूट पडलेली दिसत आहे हीच कारणे त्यामागे दडलेली आहेत असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.