Month: May 2024

शिवसेना कुणाची ? आज फैसला !

स्वाती घोसाळकर मुंबई : लोकसभेच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यासाठी उद्या सोमवार २० मे रोजी मतदान होत आहे. उद्या महाराष्ट्रातील होणाऱ्या १३ लोकसभेच्या जागेपैकी मुंबई आणि ठाण्यातील लोकसभा जागेकडे अवघ्या देशाचे लक्ष…

भयमुक्त मतदानासाठी ठाणे पोलिस सज्ज

ठाणे : ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवारी (ता. २०) होणारे मतदान भयमुक्त आणि शांततेत पार पडावे, यासाठी ठाणे पोलिस आयुक्तांनी कंबर कसली आहे. स्वतःच्या हक्काच्या फौजफाट्यासह जिल्ह्याबाहेरील सात हजारांहून अधिक पोलिसांची कुमक मदतीला मागवली आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, नाशिक, पुणे आदी पोलिसांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर मुंबई आणि ठाण्यात राजकीय नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधींपर्यंत विविध पक्षांचे मोठे नेते ठाणे, मुंबईत प्रचाराला आले. आता या मतदारसंघात इतर जिल्ह्यांतील पोलिसदेखील दाखल झाले आहेत. ठाणे, मुंबईत शिगेला पोहोचलेला प्रचार आणि २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या वेळी काही अनुचित प्रकार घडू नयेत, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयात जिल्ह्याबाहेरील सात हजारांहून अधिक पोलिस कुमक मागवण्यात आली आहे. त्यामध्ये तीन पोलिस उपायुक्त, नऊ सहायक पोलिस आयुक्त आणि १९ पोलिस निरीक्षक, तसेच नाशिक प्रशिक्षण केंद्रातील ८० प्रशिक्षण उपनिरीक्षक, पिंपरी- चिंचवडमधील ६९० अंमलदार, तीन हजार ४९१ होमगार्ड असा सात हजारांहून अधिकचा फौजफाटा आहे. त्याचप्रमाणे ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात सध्या पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, सात पोलिस उपायुक्त यांच्यासह आठ हजार पोलिसांचे संख्याबळ आहे. राखीव पोलिसांच्या २५ कंपन्या तैनात ठाणे ग्रामीण पोलिसांचेही चार हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या मदतीला असणार आहेत. हा संपूर्ण फौजफाटा मतदान केंद्र आणि ईव्हीएम मशीन असलेल्या स्ट्रँगरूमच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून पहारा देणार आहे. ठाणे जिल्ह्यात राज्य राखीव दलासह केंद्रीय राखीव पाेलिसांच्या २५ कंपन्या राहणार आहेत. यातील एका कंपनीत १२० कर्मचारी असल्यामुळे सुमारे तीन हजारांहून अधिकचा हा फाैजफाटा यात राहणार आहे. असा असेल पहारा ठाणे शहर परिमंडळ एकमध्ये सातारा, पुणे शहरामधून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या तीन कंपन्या, राज्य राखीव दलाची एक कंपनी तैनात आहे. परिमंडळ दोन भिवंडीत सीआयएसएफच्या पुणे आणि धाराशिवच्या चार कंपन्या तैनात आहेत. परिमंडळ तीन कल्याणमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या रत्नागिरी आणि धाराशिवच्या दोन, कर्नाटकची एक आणि पुणे ग्रामीणची एक अशा पाच कंपन्या तैनात आहेत. उल्हासनगर परिमंडळमध्ये सिुंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे ग्रामीणच्या चार एसआरपीएफ तसेच बीएसएफच्या कंपन्या आहेत. वागळे इस्टेट परिमंडळ पाचमध्ये कोल्हापूर आणि पुणे ग्रामीणच्या रेल्वे सुरक्षा दल, बीएसएफ आणि राज्य राखीव दल अशा तीन कंपन्या नेमल्या आहेत. याशिवाय, ठाणे, कल्याण उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या चार परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक, तर भिवंडीमध्ये दोन अशा सहा एसआरपीएफच्या प्लाटून आहेत.

मिरा-भाईंदर शहरात कडेकोट बंदोबस्त

भाईंदर : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. २०) होत असलेल्या मतदानासाठी मिरा-भाईंदरमधील पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी अडीच हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे. शहरात मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ आणि ओवळा-माजिवडा मतदारसंघाचा काही भाग समाविष्ट आहे. या दोन्ही मतदारसंघात मिळून सुमारे ११७ ठिकाणी ६८१ मतदान केंद्रे आहेत. विशेष म्हणजे यातील एकही केंद्र संवेदनशील नाही. संपूर्ण परिसराचे पोलिस बंदोबस्ताच्या दृष्टीने २६ विभाग करण्यात आले आहेत. या सर्व विभागांसाठी मिळून मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयातील १०६ अधिकारी, ७४२ कर्मचारी, १६२ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, ८०० होमगार्ड, केंद्रीय सशस्त्र दलाचे २०० जवान असे सुमारे २,७१९ अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त ६७६ पोलिस कर्मचारी आणि ३३ अधिकारी अन्य ठिकाणाहून मागविण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर प्रत्येकी एक पोलिस कर्मचारी, होमगार्ड नियुक्त केला जाणार असून त्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नजर असणार आहे. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी ३५ वाहने व पाच बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल अथवा वाहन आणण्यास मनाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त या मनाई क्षेत्रातील दुकाने, त्याचप्रमाणे अन्य व्यावसायिक आस्थापनाही मतदानाच्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहेत. या आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मिरा-भाईंदर शहरात सुमारे १९६ बंदुकीचे परवाने देण्यात आले आहेत. त्यातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व बंदुका पोलिसांकडून जमा करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली. प्रतिबंधात्मक कारवाई निवडणुकीची खबरदारी म्हणून गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती, गुन्हे दाखल असणारे अथवा संशयित गुन्हेगार अशा ५०० व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त याआधीच्या लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून गुन्हे प्रवृत्तीच्या नऊ व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

लाखो कामगार मतदानापासून वंचित

भिवंडी : भिवंडी शहर आणि परिसरात मोठ्या संख्येने विविध क्षेत्रांतील कामगार राहत आहेत. कुटुंबासह स्थायिक झालेले कामगार सोमवारी (ता. २०) मतदान करणार आहेत. मात्र, लाखोंच्या संख्येने असलेले अस्थायिक कामगार मतदानापासून वंचित राहणार आहेत. कारण या कामगारांना गावीसुद्धा जात येत नसल्याने मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम व भिवंडी ग्रामीण हे तीन विधानसभा मतदारसंघ भिवंडी शहर आणि परिसरात येत आहेत. या मतदारसंघाच्या क्षेत्रात मोठ्या संख्येने यंत्रमाग, सायझिंग, डाईंग, मोती कारखाने, गोदाम, औद्योगिक कारखाने आणि छोटे-मोठे व्यवसाय आहेत. या ठिकाणी काम करणारे सर्व कामगार येथील सर्व सुविधांचा लाभ घेत आहेत. मात्र, त्यांचे स्थायी राहण्याचे ठिकाण नसल्याने त्यांची नावे मतदार यादीत नाहीत. परप्रांतीय असल्याने काही कामगारांची नावे गावी नोंदवलेली आहेत. मात्र, त्यांना तेथेही जात येत नसल्याने नेहमी मतदानापासून वंचित राहतात. अनेक कामगार वर्षानुवर्षे काम करूनही रोजंदारी कामगार म्हणून त्यांची गणती होत असते. तर काही कामगारांची कायमस्वरूपी नोकरी असली, तरी या सर्व प्रकारच्या आस्थापना मतदानाच्या दिवशी बंद ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांना भरपगारी रजा मिळत नाही. या दिवसाचा पगार दिला नाही, तर सरकारी स्तरावरून कोणतीही कारवाई होत नसल्याने येथील मालकवर्ग निर्ढावलेले आहेत. त्यामुळे अशा मालकांवर निवडणूक निर्णय अधिकारी कारवाई करणार काय? अशी विचारणा कामगारांकडून होत आहे. भिवंडीत यंत्रमाग कारखान्यात काम करणारे आणि येथे कुटुंबासह स्थायिक झालेले कामगार मतदान करणार आहेत. मात्र, काही अस्थायिक कामगारांना मतदान करता येत नाही. असे अनेक कामगार विविध ठिकाणी काम करत आहेत. त्यांना यंत्रमाग मालक मतदानासाठी सुट्टी देत नाही. त्यासाठी मालकाचे नावही कामगारास माहिती नसते. अनेक वर्षांपासूनची ही शोकांतिका आहे. – विजय कांबळे, लाल बावटा असंघटित कामगार संघटना

विक्रमगड पोलिस ठाण्यातर्फे रूट मार्च

विक्रमगड : पालघर लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने विक्रमगड नगरपंचायत हद्दीत पोलिस ठाण्यातर्फे रूट मार्च काढण्यात आला. पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी पिंगळे यांच्या सूचनेनुसार विक्रमगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये केरळचे सीएफएफचा एक अधिकारी, ५० जवान आणि विक्रमगड पोलिस ठाण्याचे चार अधिकारी, १५ पोलिस सहभागी झाले होते.

शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करा- किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार ६ जून व तिथीनुसार १९ जून रोजी आयोजन करण्यातयेणार आहे. मागच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळासाडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याने येथील कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची लाखोच्या संख्येने उपस्थिती होती. यंदा होणाऱ्या कार्यक्रमांची पूर्वतयारी करताना संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळा २०२४ च्या अनुषंगाने नियोजन बैठक संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकारी जावळे बोलत होते बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घागें, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड , अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन आर नामदे, राष्ट्रीय महामार्ग चे कार्यकारी अभियंता दिलीप चौरे, पोलीस उपअधीक्षक एस बी काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी जावळे म्हणाले शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक रायगड येथे येत असतात या वर्षी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमांसाठी आयोजकांकडून तयारी केली जात आहे. मागील वर्षी १५ हजार व्यक्तींची क्षमता असलेल्या गडावर अडीच लाखापेक्षा जास्त जण आल्यामुळे सुरक्षा व पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला होता . हा अनुभव लक्षात घेऊन या वर्षी कोणतीही समस्या उद्भवू नये या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी केली जावी. येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी यांनी सुचित केले. पोलीस अधीक्षक घार्गे यांनी महाड व माणगाव मार्गे येणाऱ्या खाजगी वाहनांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांची कामे, पार्किंगच्या जागा व तेथून गडाकडे जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था संबंधित विभागांनी पूर्ण करावे तसेच आवश्यक ते माहिती देणारे फलक लावले जावेत असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी गडावर नागरिकांच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन, औषधे डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी या साठी करावयाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. मागील वर्षी झालेला सोहळ्याबाबत केलेली कार्यवाही व यंदाच्या पूर्वतयारी बाबत विविध प्रमुख अधिकाऱ्यांनी माहिती सादर केली. तत्पूर्वी जावळे आणि उपस्थित सर्व अधिकारी यांनी रायगड किल्ल्याची पाहणी केली. तसेच आवश्यक तयारीच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित यंत्रणाना निर्देश दिले.

पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी एसटीच्या १,१६१, तर बेस्टच्या ६२९ बस धावणार

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होत असून निवडणूक कर्मचारी, सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी; तसेच मतदान यंत्र, साहित्य मतदान केंद्रात सोडण्याचे आणि मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परत घेऊन येण्यासाठी एसटी, बेस्ट बस धावणार आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात बेस्ट बसच्या ६२९ बस धावणार असून, एसटीच्या पाचव्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात १,१६१ बस धावतील. बेस्टच्या बसमधून दिव्यांग मतदारांना मोफत प्रवास करता येणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होत असून पहिल्या टप्प्यापासून ते पाचव्या टप्प्यांपर्यंत एसटी महामंडळाने राज्यभरात एकूण ८,९४५ बस निवडणुकीच्या कामासाठी वापरल्या. पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक २० मे रोजी एकूण १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यासह ठाणे, भिवंडी, कल्याण, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघात मतदान होईल. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठी १२७ बसचे आरक्षण करण्यात येणार आहे. तर, पालघर लोकसभा मतदारसंघात २५४ बस, ठाणे, भिवंडी, कल्याण ६५ बस, नाशिक आणि दिंडोरी ५१५ बस, धुळ्यासाठी २०० बस धावणार आहेत. अशा एकूण एसटीच्या १,१६१ बस धावणार आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी बेस्ट उपक्रमाची बससेवा उपलब्ध असणार आहे. या सेवेसाठी मतदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तसेच ही सेवा मुंबई शहरांसह उपनगरांतही लागू आहे. मुंबई उपगनरात ३८२ बस मुंबई शहरात २१२ बस अशा एकूण ५९४ बस धावणार आहेत. तर, मुंबई शहर भागात व्हीलचेअर असलेल्या १० आणि उपनगरांत २५ अशा एकूण ३५ बस धावणार आहेत. १८ ते २० मेपर्यंत बेस्ट उपक्रमाच्या ६२९ बसगाड्या संपूर्ण मुंबईभर धावणार आहेत. एसटी महामंडळाला प्रत्येक बसमागे २४ ते ३० हजार रुपये मिळणार आहेत. तसेच बेस्ट बसलाही तेवढीच रक्कम मिळणार असल्याने एकूण महसूल कोट्यवधीच्या घरात जाण्याचा अंदाज आहे, असे बेस्ट उपक्रमातील आणि एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. २० मे रोजी मुंबईकरांचा प्रवास अवघड निवडणुकीच्या कामात बेस्ट उपक्रमातील बस उपलब्ध केल्याने २० मे रोजी मुंबईतील रस्त्यांवर बेस्ट बसची संख्या अपुरी असेल. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी मुंबईकरांचा प्रवास अवघड होण्याची शक्यता आहे.

सलग तिस-या दिवशीही अनधिकृत होर्डिंगविरोधी  कारवाईत 10 मोठे होर्डींग निष्कासित

3 दिवसात 31 आकाराने मोठे होर्डींग हटवले – वाशीगावाजवळील अवाढव्य होर्डींगचाही समावेश नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डींगविरोधी धडक मोहीम राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सलग तिस-या दिवशीही प्रभावीपणे राबविण्यात येऊन मोठ्या आकाराचे 10 होर्डींग निष्कासित करण्यात आले. मुंबईतील घाटकोपर येथे वादळी वारे आणि अकाली पर्जन्यवृष्टी कालावधीत होर्डींग पडून घडलेल्या दुर्घटनेनंतर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तातडीने बैठक घेत परवाना विभाग तसेच अतिक्रमण विभागाला सतर्क राहून कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार अतिक्रमण विभागामार्फत लगेचच अनधिकृत होर्डिंग विरोधातील कारवाई सुरू करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त यांच्या समुहाने धडाकेबाज कारवाई करीत पहिल्या दिवशी सायं. 6 पासून पहाटे 5 वाजेपर्यंत नमुंमपा क्षेत्रातील 15 मोठ्या आकाराचे अनधिकृत होर्डींग निष्कासित केले. दुसऱ्या दिवशीही सकाळपासून पहाटेपर्यंत अथक कारवाई करीत 6 मोठे होर्डींग हटविण्यात आले. ही अनधिकृत मोहीम तिस-या दिवशीही तितक्याच तीव्रतेने चालू ठेवत 18 मे रोजी पहाटेपर्यंत 10 मोठे होर्डींग सुरक्षितपणे निष्कासित करण्यात आले असून सलग 3 दिवसांच्या धडक मोहीमेत एकूण 31 अनधिकृत होर्डींग हटविण्यात आले आहेत. 17 मे पासून 18 मे रोजी पहाटेपर्यंत राबविण्यात आलेल्या या मोहीमेत सायन पनवेल रोडनजिक वाशीगाव येथे आकाराने अवाढव्य असलेले होर्डींग हटविण्याची कारवाई 2 दिवस अहोरात्र काम करून करण्यात आली असून त्याठिकाणचे 4 होर्डींग निष्कासित करण्यात आले आहेत. नेरूळ विभागातही हर्डिलिआ कंपनीनजिक सायन पनवेल रोडशेजारी लक्ष्मीवाडी या ठिकाणी असलेले 3 मोठे अनधिकृत होर्डींग निष्कासित करण्यात आलेले आहेत. ऐरोली विभागात ऐरोली – पटनी रोड येथील पदपथावर असणारे सेक्टर 20 येथील होर्डींग तसेच ऐरोली सेक्टर 9 दिवागाव येथे वंदना अपा. येथील होर्डिंग अशी 2 मोठी अनधिकृत होर्डींग हटविण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे घणसोली कार्यक्षेत्रातील रबाले रेल्वेस्टेशन समोर मोनार्क हॉटेल नजिक असलेले अनधिकृत होर्डींगवर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे अनिधकृत होर्डींग विरोधातील धडक मोहीमेत तिस-या दिवशी 10 मोठे अनधिकृत होर्डींग हटविण्यात आले असून त्यामध्ये वाशीगाव येथील प्रचंड मोठ्या होर्डींगचाही समावेश आहे. अशाप्रकारे 15 तारखेपासून 18 मे रोजी पहाटेपर्यंत 3 दिवसांच्या धडक मोहीमेत एकूण 31 मोठ्या आकाराचे अनधिकृत होर्डींग हटविण्याची कारवाई करण्यात आली असून होर्डींग काढताना सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासोबतच हायवे लगतची मोठी होर्डींग काढताना रहदारीला व वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये याचीही काळजी घेत अशा ठिकाणची होर्डींग मध्यरात्रीपासून पहाटेच्या कालावधीत काढण्यात आली आहेत. ही अनधिकृत होर्डींग विरोधातील कारवाई आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार अशीच कार्यान्वित राहणार असून प्रसंगी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली या कारवाईची प्रत्यक्ष अंमलबजावणी अतिक्रमण विभागाचे सहा. आयुक्त व सर्वच विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि त्यांचे अधिनस्त अधिकारी, कर्मचारी व तांत्रिक कर्मचारी आणि कामगार करीत आहेत

देशासाठी सैनिक करतात बलिदान…तुम्ही करा ना मतदान…

जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांचे आवाहन ठाणे : देशासाठी  सैनिक करतात बलिदान… तुम्ही करा ना मतदान .. असा संदेश मतदान जनजागृती करण्यासाठी एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात “संवाद मतदारांचा… संकल्प मतदानाचा” या सुसंवाद कार्यक्रमात ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी मतदारांना दिला. देशाच्या सीमेवर सैनिक आपले रक्षण करीत असल्यामुळे आज आपण इथे सुरक्षित आहोत. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता प्रत्येक सैनिक डोळ्यात तेल घालून आपले रक्षण करीत आहेत. सैनिक देशासाठी बलिदान देत आहेत..आपण निदान मतदान तरी करावे, असा संदेश या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून मनोज शिवाजी सानप यांनी दिला. सीमेवर देशाचे रक्षण करताना शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री अनुराधा गोरे या वीरमातेची गाथा त्यांनी आपल्या एकपात्री अभिनयातून उभी केली. देशासाठी सैनिक म्हणून मुलाचे बलिदान हा अभिमान आणि दुसरीकडे मुलगा गमावल्याचे आईचे दु:ख हा प्रसंग एका वीरमातेच्या भूमिकेतून त्यांनी साकारला. आज सीमेवर सैनिक रक्षण करताना आपल्या प्राणाचे बलिदान देत आहेत, मग आपल्याला तर फक्त मतदान करावयाचे आहे, असे आवाहन करीत मतदान नक्की करा आणि आपली भारतीय लोकशाही बळकट करा, हे असे आवाहन वीरमाता मतदारांना करीत असल्याचा प्रसंग मनोज सानप यांनी साकारला. मतदान हे आपले पहिले कर्तव्य आहे, त्यामुळे ते प्रत्येकाने बजावणे आपला अधिकार आहे. सैनिक सीमेवर बलिदान करीत आहेत, आपल्याला फक्त मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचे आहे, असे जनजागृतीपर आवाहन त्यांनी सर्व उपस्थितांना केले.

महेंद्र थोरवे मार्गदर्शनाखाली शिवमंदिराचा जीर्णोद्धार

माथेरान : कर्जत तालुक्यातील पोसरी गावातील शिव मंदिराच्या जीर्णोद्धाराचा सोहळा शनिवार दि. 18 मे रोजी उत्साहात आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने संपन्न झाला. शनिवारी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना, होम हवन, भजन कीर्तन यासह भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शिव मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी श्रीरंग आप्पा बारणे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून यथोचित सत्कारही केला.तीन दिवस जीर्णोद्धार कामी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.कर्जत (पोसरी) येथील मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्यासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून श्री महादेवाचे दर्शन घेतले. त्यामुळे पोसरी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांकडून आमदार महेंद्र थोरवे यांच्या आध्यात्मिक कामाबाबत समाधान व्यक्त होत आहे. पोसरी येथे पुरातन काळापासून असलेल शंभू महादेवाच मंदिर हे आम्हा ग्रामस्थांच नेहमीच श्रद्धास्थान राहिल आहे त्यामुळे या शिव मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी अत्यंत जवळून काम करण्याची संधी मला मिळाली आणि आज हे शिव मंदिर पूर्ण झाल्यानंतर एक ग्रामस्थ म्हणून मलाही मनस्वी समाधान मिळत आहे -महेंद्र थोरवे आमदार, कर्जत विधानसभा