जळगाव : एक्झिट पोलमध्ये देशात मोदींच्या भाजपाला घवघवीत यश मिळत असले तरी महाराष्ट्रात मात्र भाजपाप्रणित महायुतीला बसलेला फटका हा प्रामुख्याने काही ठिकाणी उमेदवार न बदलल्यामुळेच आहे अशी स्पष्ट कबुली गिरीश महाजन यांनी दिली.

राज्यात आमच्या जागा कमी असल्याचं दाखविले जात असले तरी किमान पस्तीस जागा आम्हाला मिळणार आहेत.. राज्यात जागा कमी येत आहेत हे खरे आहे. त्या मागील कारण बघितले तर वाढती महागाई, शेतकरी प्रश्न आणि आरक्षण प्रश्न याचबरोबर काही उमेदवार बदलायला पाहिजे होते ते झाले नाही. यामुळे या जागा कमी होत असल्याचं दिसत असल्याची कबुली गिरीश महाजन यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले असून देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एनडीला 350 हून अधिक जागा मिळणार असून महायुतीला राज्यात फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात महायुतीला 22 ते 26 जागा मिळतील तर महाविकास आघाडीला 23 ते 25 जागांचा अंदाज आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला हे फारसे रुचलेले दिसत नाही. त्यामुळं काही जागा कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे.  खडसे यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. ते कोणत्या पक्षात आहेत, हे त्यांना ही कळत नाही. ते जे बोलत आहेत ते त्यांचे वैयक्तिक मत आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *