जालना : ज्या गावातून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला, ज्या गावातून या आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटला, ज्या गावकऱ्यांच्या ताकदीमुळे मनोज जरांगे यांच्या पाठिशी महाराष्ट्रातील मराठा समाज एकटवला, ज्या गावात मनोज जरांगे यांनी ऐतिहासिक सभा घेऊन राज्याचे लक्ष वेधले, ज्या गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते शरद पवारांपासून राज ठाकरेंपर्यंतचे दिग्गज पोहोचले. आता, त्याच अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनीच मनोज जरांगे यांच्या आंदोलनास विरोध केला आहे. आज ४ जूनपासून मनोज जरांगे उपोषणास बसणार असले तरी गावातील ७० जणांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या उपोषणाविरोधात लेखी तक्रार केली आहे.त्यामुळे, जरांगे पाटील यांचं उपोषण अंतरवाली सराटी गावात होणार की ते आपला उपोषणसाठीचं ठिकाण बदलणार?, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. मनोज जरांगेंच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलेल्या अंतरावाली सराटी गावातील लोकांनीचा आता त्यांच्या आंदोलनास विरोध केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जरांगे यांनी ४ जूनपासून उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. तत्पूर्वीच, गावकऱ्यांनी जरांगेंच्या उपोषणाला विरोध दर्शवत जिल्हाधिकाऱ्याना निवेदन दिले आहे. प्रशासनने या उपोषणास परवानगी देऊ नये, गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने उपोषणास परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी या निवेदनातून केली आहे. अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून या निवेदनावर ७० गावकऱ्यांच्या सह्या आहेत.
