मुंबई :  मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी  पत्रकार परिषद घेत आचारसंहिता भंग केल्याच्या भाजपच्या तक्रारीची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

भाजप नेते आशिष शेलारांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे कारस्थान असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला मतं मिळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जाणूनबूजून मतदानाला वेळ लावला जातोय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.

 भाजपच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला नेमकं त्यादिवशी पत्रकार परिषदेत काय झाले याची माहिती मागवली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यानंतर  केंद्रीय निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश  दिले आहेत.

शेवटच्या ४८ तासात ज्यावेळी आदर्श आचारसंहीतेमुळे ज्या वेळी प्रचार संपतो आणि प्रत्यक्षात मतदान संपल्यानंतर एक तासाचा जो काळ असतो त्या काळात कोणीही प्रचार करायचा नसतो. प्रतिक्रिया जरी दिली तरी त्यामध्ये मतदारांना मतदानाला येण्याचे आवाहन करता येते. मात्र थेट कोणत्या पक्षावर, व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे आरोप करता येत नाही.

निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई केली जाण्याची शक्यता असते. राज्य निवडणूक आयोग त्या व्यक्तीवर निवडणुकीच्या काळात प्रचारबंदीसारखे निर्बंध लागू करु शकते.  जर फौजदारी गुन्हा दाखल झाला तर खटला देखील चालवला जाऊ शकतो.

उद्धव ठाकरेंनी आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं नाही

कुठल्या आचारसंहितेचं उल्लंघन उद्धव ठाकरेंनी केलं? २० मे रोजी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, पण तो काही प्रचाराचा भाग नव्हता. पत्रकारांशी त्यांनी चर्चा केली. मात्र मुंबईतले भाजपाचे पदाधिकाऱ्यांनी पत्र लिहिलं आणि निवडणूक आयोगाने लगेच कारवाई केली. उद्या ४ नंतर निवडणूक आयोगासारख्या भाजपाच्या सगळ्या शाखा बरखास्त होतील. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *