शिवसेना नगरसेवक रोहन कोट यांचे केडीएमसी आयुक्त, महापौरांना पत्र
कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील काही बांधकामांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. या बांधकामांना आवश्यक परवानग्या आहेत का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना नगरसेवक रोहन कोट यांनी संबंधित बांधकामांची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल यांना पत्र दिले आहे. तसेच ही बांधकामे अनधिकृत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर एमआरटीपी अर्थात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज आणि बांधकामांच्या वैधतेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मासिक महासभेमध्ये नगरसेवक मंदारं हळवे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या अनधिकृत बांधकाम व अनागोंदी कारभाराबाबत तहकुबी ठेवलेली होती. या तहकुबी मध्ये दोन वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. याचे मुख्य कारण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण यांचा अंधाधुंदी कारभार व अनधिकृत बांधकाम. या तहकुबी मध्ये कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकामाबाबत नगरसेवक रोहन कोट यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, बाजार समितीच्या मंजूर नकाशामध्ये ८-४ येथे २० व्यापारी गाळ्याचे बांधकाम चालू आहेत. प्रत्यक्षात कृ. उत्पन्न बाजार समितीची मासिक सभा ३० जानेवारी २०२४ येथे २० गाळे बांधण्याचा ठराव करण्यात आला व त्या अनुषंगाने ११ डिसेंबर २०२४ रोजी आपल्या नगर रचना विभागाकडून बांधकाम परवानगी २० दुकाने प्लस, १८ ऑफिस अशी घेण्यात आली.
हे कोट यांनी पिठासन अधिकारी, आयुक्त व सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. नगर रचना विभागात माहिती घेतली असता संचालक मंडळाचा ठराव बांधकाम घेताना नगर रचना विभागाला दिलेला नाही. नगर रचना विभागाकडून ही बांधकाम परवानगी कोणत्या अधिकारात देण्यात आले याचा अहवाल येणाऱ्या महासभेच्या २ दिवस आधी देण्याची मागणी रोहन कोट यांनी केली आहे. तसेच हा विषय गंभीर असून या प्रकरणाची आपण कसून चौकशी करावी व ही बांधकाम परवानगी रद्द करावी, कृषी उत्पन्न बाजार समितीवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करून हे बांधकाम निष्कासित करण्याची मागणी नगरसेवक रोहन कोट यांनी केली आहे.
