कोळशेवाडी पोलिसांची धडक कारवाई; आरोपीकडून अवैध पिस्टल जप्त
कल्याण : कल्याण पूर्व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोळशेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध पिस्टल विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली आहे. आरोपीकडून एक पिस्टल जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक तरुण कल्याण पूर्वेतील १०० फूटी रोड परिसरात पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने परिसरात सापळा रचला.
रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास संशयित तरुण घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याची ओळख निलेश शिरसागर अशी पटली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक पिस्टल जप्त करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश शिरसागर याच्याविरोधात यापूर्वीही गुन्हा दाखल आहे. जप्त करण्यात आलेली पिस्टल कुठून आणण्यात आली होती, ती कोणाला विकली जाणार होती आणि या अवैध शस्त्र व्यवहारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत.
याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांनी सांगितले की, परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अवैध शस्त्रे बाळगणारे तसेच त्यांची खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.
