अनिल ठाणेकर
ठाणे : ठाणे – मुंबईसह विविध शहरांत असंघटीत कामगारांचे सामाजिक आणि आर्थिक स्तरावर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. गेली अनेक वर्षे घरकामगार महिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी पाठपुरावा करत असून येत्या अधिवेशनात त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबत आग्रही मागणी करणार आहे, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त राष्ट्रीय घरेलू कामगार चळवळ महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन यांच्यावतीने १६ जून रोजी श्रम सन्मान सोहळ्याचे आयोजन दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे करण्यात आले होते. मंचावर संघटनेचे अध्यक्ष फादर फेलिक्स डिसूझा, आमदार संजय केळकर, कार्यक्रमाचे समन्वयक ज्ञानेश पाटील, असंघटित कामगार क्षेत्रातील अभ्यासक आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिसे तसेच जेष्ठ पत्रकार संजय शिंदे हे ही मान्यवर उपस्थित होते.
सोहळ्यात उपस्थित घरकामगार बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार संजय केळकर म्हणाले, ठाणे-मुंबईसह राज्यभरात लाखो घरकामगार असंघटित असून त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास दुर्लक्षित झाला आहे. घर कामगार महिला या घरातील जबाबदाऱ्या पार पाडून घरकाम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणकारी योजना कशा देता येतील, त्यांच्या रोजच्या अडीअडचणी कशा सोडवता येतील यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. येत्या पावसाळी अधिवेशनात देखील मी त्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी आग्रह धरणार आहे. जोपर्यंत हे मंडळ स्थापन होत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन श्री. केळकर यांनी केले.
इतर कामगारांप्रमाणे या महिलांना देखील किमान वेतन, भरपगारी साप्ताहिक, प्रासंगिक, आजारपणाच्या सुट्ट्या, भविष्य निर्वाह निधी आदी सुविधा, विविध बँकांमार्फत कर्ज योजना, आरोग्य विमा, मातृत्व लाभ अनुदान, निवृत्ती वेतन आदी सुविधांचा लाभ या महिलांना मिळायला हवा यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे, असेही केळकर यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय घरकामगार चळवळ महाराष्ट्रचे अध्यक्ष फादर फेलिक्स डिसोझा यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. ज्येष्ठ पत्रकार संजय शिंदे यांनी समाजातील या घटकांच्या प्रश्नांची दखल फार कमी घेतली जाते, असे सांगितले. या लढ्यात नेहमीच आपल्या सोबत असल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.
सोहळ्यात घरकामगार महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे समन्वयक ज्ञानेश पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. मेळाव्यासाठी मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर आदी भागातून घर कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका जांभळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन साधना मोरे यांनी केले.
