अशोक गायकवाड
अलिबाग : डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांस शाळा पूर्ववत सुरु करण्याचे स्पष्ट आदेश त्वरित देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. शाळेचे विद्यार्थी, पालक तसेच समाजाच्या विविध स्तरावरून शाळेच्या भवितव्याविषयी विचारणा होत असल्याने आरसीएफ व्यवस्थापनातर्फे वस्तुस्थिती निर्देशक सदर निवेदन देण्यात येत आहे, अशी माहिती मुख्य प्रशासकीय व्यवस्थापक –आरसीएफ थळ भालचंद्र देशपांडे यांनी दिली आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित एक शाळा आरसीएफ वसाहत कुरुळ येथे गेली ४३ वर्षे सुरू आहे. आरसीएफचा थळ-वायशेत प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्यावेळी या परिसरात इंग्रजी माध्यमाची शाळा नसल्याने आरसीएफ कर्मचार्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सदर शाळा सुरू करण्यात आली होती. शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाच्या आवश्यक सर्व परवानग्या व शाळेची नोंदणी डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांचे नावे करण्यात आली. यानुसार शासन नियम व शैक्षणिक धोरणानुसार शाळा चालविण्याचे संपूर्ण दायित्व डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांचे असल्याने शाळेसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांची नेमणूक देखील डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी केली आहे. तत्कालीन परिस्थितीत या शाळेत बहुतांश विद्यार्थी आरसीएफ कर्मचार्यांची मुलेच होती त्यामुळे शाळेसाठी पायाभूत सुविधा, संपूर्ण वार्षिक खर्चाइतके अर्थसहाय्य आणि व्यवस्थापन शुल्क आरसीएफने डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांना देण्याबाबत आरसीएफ व्यवस्थापन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्यात एक द्विपक्षीय करार १९८१ साली करण्यात आला. या कराराची मुदत २०११ पर्यन्त होती. कालांतराने सदर शाळेत शिकणार्या आरसीएफ कर्मचार्यांच्या मुलांच्या संख्येत लक्षणीय रित्या घट झाली असली तरीही परिसरातील आरसीएफ कर्मचारी व्यतिरिक्त नागरिकांची मुले शिकत असल्याने करारानुसार शाळेसाठी पायाभूत सुविधा आणि आवश्यक अर्थसहाय्य आरसीएफ व्यवस्थापनातर्फे करण्यात येते. २०११ पासून सदर करारात दोन्ही पक्षांच्या सम्मतीने कालानुरूप आवश्यक बदल करून दर पाच वर्षासाठी या कराराचे नूतनीकरण करण्यात येत होते. यानुसार विद्यमान कराराची मुदत ३१ मे २०२४ पर्यन्त होती. मात्र २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून सदर शाळेसंदर्भात आरसीएफसोबत करार नूतनीकरण करण्यास डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी अनाकलनीय कारणांनी असमर्थता दाखविली. शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यादृष्टीने सदर करार किमान दोन वर्षे मुदतीने पुन्हा करण्यात यावा म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांना आरसीएफ व्यवस्थापनातर्फे लेखी स्वरुपात वारंवार विनंत्या करण्यात आल्या. मात्र सदर करार नूतनीकरण न करण्याबाबत डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे ठाम राहिली. सदर शाळा सुरू राहावी यासाठी आरसीएफ व्यवस्थापन विविध स्तरावर प्रयत्नशील आहे. मा. शिक्षणाधिकारी (रायगड) यांना दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी व्यवस्थापनाने पत्र पाठवून डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे द्वारा शाळा पूर्ववत सुरू ठेवणेबाबत आरसीएफची कोणतीही हरकत नसल्याचे कळविण्यात आले. तसेच मा. शिक्षण आयुक्त महाराष्ट्र शासन यांनी सदर प्रकरणात हस्तक्षेप करून संबंधित शैक्षणिक संस्थेस योग्य ते निर्देश द्यावेत अशी विनंती दिनांक २७ मे २०२४ च्या पत्राद्वारे व्यवस्थापनातर्फे करण्यात आली आहे. दरम्यानच्या कालावधीत डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या कार्यकारिणीसोबत बैठका घेऊन शाळा सुरू ठेवण्याचे यथोचित प्रयत्न करण्यात आले. शाळा सुरू ठेवण्याबाबत आरसीएफ व्यवस्थापनाचा सातत्याने सकारात्मक दृष्टीकोण असताना आरसीएफसोबत करार नूतनीकरण न करण्याबाबत डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या भूमिकेमुळे आगामी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पुढे शाळा सुरू ठेवण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या अनिश्चित परिस्थितीमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने आरसीएफ व्यवस्थापनातर्फे मा. विभागीय शिक्षण संचालक, मुंबई यांना दिनांक ४ जून २०२४ रोजी पत्र देण्यात आले आहे. यात डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांस शाळा पूर्ववत सुरु करण्याचे स्पष्ट आदेश त्वरित देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. शाळेचे विद्यार्थी, पालक तसेच समाजाच्या विविध स्तरावरून शाळेच्या भवितव्याविषयी विचारणा होत असल्याने आरसीएफ व्यवस्थापनातर्फे वस्तुस्थिती निर्देशक सदर निवेदन देण्यात येत आहे, असे मुख्य प्रशासकीय व्यवस्थापक, आरसीएफ थळ, अभय देशपांडे यांनी सांगितले आहे.
