अशोक गायकवाड
नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून जाणारा सायन पनवेल महामार्ग हा जरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असला तरी या मार्गावरून दररोज बाहेरच्या शहरातील हजारो नागरिक ये – जा करीत असल्याने तो स्वच्छ असणे नवी मुंबईच्या स्वच्छ शहर मानांकनासाठी महत्वाचे आहे. त्यादृष्टीने आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रत्यक्ष सहभागातून सायन पनवेल महामार्गावर बेलापूर ते वाशी मार्गावर दोन्ही बाजूकडे सखोल स्वच्छता मोहीम लोकसहभागातून राबविण्यात आली.*
यामध्ये अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व शिरीष आरदवाड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ.अजय गडदे, परिमंडळ १ चे उपायुक्त सोमनाथ पोटरे, अति. शहर अभियंता अरविंद शिंदे तसेच सर्व विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक तसेच इतर अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र यांचेसह नागरिक व एनएसएस विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते. सायन पनवेल महामार्गावर उरण फाटा येथे बेलापूर व नेरूळ विभागाच्या अख्यत्यारितील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र, नागरिक व एनएसएस विद्यार्थी एकत्र जमले. याठिकाणी आयुक्तांनी सायन पनवेल महामार्गावरील सखोल स्वच्छता मोहीमेचे महत्व सांगत यापुढील काळात शहरातील मुख्य रस्ते तसेच विविध भागात शनिवार व रविवारी एकत्र येऊन लोकसहभागातून स्वच्छता मोहीमा राबविण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. या मोहीमांमध्ये नागरिकांच्या सहभागाला प्राधान्य देण्याची भूमिका विषद करीत नागरिकांनी यामध्ये स्वयंस्फुर्तीने सहभागी होऊन शहर स्वच्छतेत सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन केले. याठिकाणी उपस्थितांनी आयुक्त महोदयांसमवेत स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली आणि आयुक्तांसमवेत सर्वजणांनी सायन पनवेल महामार्गाकडेच्या प्लास्टिक, कागद व इतर कच-याच्या संकलनाला सुरूवात केली. तेथील उड्डाणपुलाखालील जागेतही सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सायन पनवेल महामार्गावरील नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील बेलापूर, नेरूळ, तुर्भे, वाशी विभाग कार्यालयांच्या वतीने त्या त्या ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या. आयुक्तांनी याही ठिकाणी भेट देत तेथील स्वच्छता मोहीमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. या मोहीमेत इतरही विभाग कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी उत्साहाने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *