मुंबई : “आज जागतिक खोके आणि धोके दिवस साजरा होत आहे. निर्लज्जपणे आज खोके दिवस साजरा केला जातोय.”, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य फेसबूकवर टीका केली आहे.
शिवसेनेत पडलेल्या फुटीला आणि राज्यातील महायुतीच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुती सरकारच्या दोन वर्षांच्या काळातील कामासंदर्भात भाष्य केलं आहे. ‘विचार..विकास..आणि विश्वास… राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्षे होत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली’, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या या पोस्टवर आदित्य ठाकरे यांनी भाष्य करत ‘आज जागतिक खोके आणि धोके दिवस साजरा होत आहे’, असा खोचक टोला लगावला आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
“आज जागतिक खोके आणि धोके दिवस साजरा होत आहे. निर्लज्जपणे आज खोके दिवस साजरा केला जातोय. जे घाबरट आहेत, डरपोक आहेत. ते पक्ष चोरतात. वडील चोरतात. स्वत:च्या बॅनरवर दुसऱ्यांचे वडील यांना लागतात. हे अशी लोक आहेत”, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.