अनिल ठाणेकर ठाणे : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून. ठाणे जिल्ह्यातील सर्व तलावं संवेदनाशील क्षेत्र, म्हणून जाहीर करुन, पर्यावरण दिनाचे पावित्र्य राखूया, असे आवाहन धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना केले आहे. जिल्हाधिकारी कचेरीपासून सुमारे दोनशे फुटावर अस्तित्वात असलेल्या तलाव, जो की, जेल तलाव म्हणून ठाणेकरांना प्रचलित आहे. या तलावाचे सुशोभीकरण, संरक्षण व संवर्धन याचे काम धुमधडाक्यात चालू आहे. प्रत्यक्षात या तलावाबाहेर संबंधित काम कोण करतेय व प्रस्तावित सुशोभीकरणाचे नेमकं काय काम चालू आहे? याचा बोध होत नाही; पण, याआधीच शहराच्या रस्ता-रुंदीकरण यामुळेच, तलावाचे क्षेत्रफळ कमी झाले आहे. आता तर, सुशोभीकरण, संवर्धन, संरक्षणाच्या नावाखाली सुमारे २०% पाण्याच्या क्षेत्रफळात, मातीचा भर टाकून नैसर्गिक तलावात हस्तक्षेप केला असून, हे घटनेला बाधा अणणारे आहे. घटनेनुसार व सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, नैसर्गिक तलाव व त्यावर अवलंबून असणारे पक्षी-प्राणी व जलचर यांचे संवर्धन, संरक्षण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे व शासन त्याला बांधिल आहे. जिल्हाधिकारी कचेरीपासून सुमारे ५०० फुटावर अस्तित्वात असलेल्या घोसाळे तलावाचे आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत- २ या अभियानांतर्गत तलावाचे सुशोभीकरण चालू असून, (काम करण्याची मुदत संपली आहे) या तलावातील कासवांच्या अधिवासाची नेमकी काय व्यवस्था केली आहे वा काय करणार आहे? याची फलकावर माहीती नाही. दरम्यान, शहरात आणि जिल्ह्यात वातावरण बदलाचे परिणाम चांगलेच जाणवू लागले आहेत. जिल्ह्यातील उष्णता तपमान रेकॉर्ड ब्रेक करीत असताना, संबंधित बाबींवर शासनस्तरावर निरनिराळे उपाय योजना करीत असताना नैसर्गिकरित्या लाभलेले पाण्याचे आकारमान करुन, शासन निर्णयास छेद देणारे व घटनेला बाधा पोहोचण्याऱ्यांवर, कडक कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे आम्ही करीत आहोत. पाण्याचे क्षेत्रफळ कमी करणारा, मातीचा भराव तात्काळ काढावा आणि यापुढे तलावक्षेत्रात सुशोभीकरण, संवर्धन-संरक्षणाच्या नावाखाली, घटनेचे अनेक ठिकाणी उल्लघंन होते, याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी. आंबेघोसाळे तलावापैकी, आंबे तलाव पूर्णपणे बुजविला आहे व त्यावर झोपडपट्टी उभारली आहे. याप्रकरणी, पर्यावरणप्रेमी उच्च न्यायालयात गेल्यामुळे घोसाळे तलाव वाचला आहे, याकडे आम्ही आपले लक्ष वेधत आहोत. ठाणे महापालिकेच्या महासभेत मुंब्रा येथील तलाव बुजवून “Transit Camp” बांधण्याचा ठराव संमत केला; पण, पर्यावरणप्रेमींनी वेळीच हस्तक्षेप करुन, आयुक्तांकडून ठराव रद्द करुन घेतला याची नोंद घ्यावी. जिल्ह्यातील होणारी अनियोजित वाढ, प्रदूषित वातावरण, यामध्ये जैविक साखळी, जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन ही काळाची गरज आहे. नैसर्गिक परिसंस्था अबाधित रहाण्यासाठी व घटनेनुसार संरक्षण करण्यासाठी, देशातील पहिल्यावहिल्या पर्यावरणवादी अशा, ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे आम्ही आग्रहपूर्वक उपरोक्त मागणी करीत आहोत. दरम्यान, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, ठाणे जिल्ह्यातील सर्व तलावं “संवेदनाशील क्षेत्र” म्हणून जाहीर करुन, पर्यावरण दिनाचे पावित्र्य राखूया, असे आवाहन नितीन देशपांडे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना केले आहे.