ना.एकनाथजी शिंदे यांची मुख्यमंत्री पदी द्विवर्षपूर्ती

संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी संभाजीराव शिंदे यांनी कोरोना काळात तनमनधनाने रुग्णसेवा करून राज्यातील लाखो लोकांचे जीव वाचविले.त्यामुळे जनमानसात *अनाथांचे नाथ एकनाथ* अशी ओळख झालेल्या रुग्णदुत मा.एकनाथजी शिंदे यांची राज्याच्या *मुख्यमंत्री* पदावर द्विवर्षपूर्ती झाली आहे.याबद्दल त्यांचे राज्यातील सर्वधर्मीय लोकांच्यावतीने हार्दिक अभिनंदन अन् पुढील वाटचालीसाठी भगव्या शुभेच्छा!

मित्रहो,अनाथांचे नाथ – एकनाथया साताऱ्याच्या संभाजीरावांच्या सुपुत्रानं शिवछत्रपतींच्या सातारच्या कर्मभूमीची माती ललाटी लावून शून्यातून विश्व निर्माण करण्याचं स्वप्न साकारण्यास ठाणे या सांस्कृतिक नगरीत पदार्पण केलं अन् बघता..बघता त्यांच्या जीवनाला मोठी कलाटणी मिळाली.या शाश्वत घटनेला समस्त ठाणेकर साक्षीदार आहेत.शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जहाल,परखड अन् ओजस्वी वाणीनं प्रेरित होऊन,तर धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या भगव्या विचाराच्या
शिकवणीने वयाच्या अवघ्या २० व्या वर्षीच त्यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला आणि बघता-बघता त्यांचं राजकीय-सामाजिक जीवन भगवामय झाले.
दरम्यान आपल्या सामाजिक कार्य करण्याच्या आवडीने अन् निष्ठा व कठोर परिश्रमाने त्यांनी दिघेसाहेबांचा विश्वास संपादन केला.त्यांना शाखा प्रमुख होण्याची संधी दिली.त्या पदास देखील त्यांनी न्याय दिला.तेथेही भाईंनी शिवसेनेसाठी रात्रंदिवस निष्ठेने काम करून वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांची मने जिंकली,अन् तेथूनच त्यांच्या भाग्याची कवाडं उघडलीत.
परंतु दुर्दैवानं एक काळा दिवस उजाडला.अन् २००१ मध्ये दिघेसाहेबांचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू होऊन ठाणेकरांवर दुःखाची अवकळा पसरली.संपूर्ण ठाणे शहर सुन्न झालं.प्रत्येकाला आपल्या घरातील थोरली व्यक्ती गेल्याचे दुःख झालं.यानंतर शिवसेनाप्रमुखांनी ठाणे जिल्हा प्रमुखाची जबाबदारी शिंदेसाहेबांना सोपविली.ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख पदाचं उत्तरदायित्व यांच्या हाती आलं.गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा पूर्णक्षमतेचे चालवत,सर्वांना बरोबर घेऊन मोठ्या आत्मविश्वासाने एकनाथजी राजकारणातून समाजकारण करत आहेत,म्हणजे हीच खरी स्व.दिघेसाहेबांना मानवंदना ठरेल.
धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या पश्चात ठाणे जिल्ह्यातली शिवसेना सावरून शिंदेसाहेबांनी पुनश्च भक्कम पायावर उभी केली आहे. शाखा प्रमुख,नगरसेवक,आमदार,ठाणे जिल्हा प्रमुख, कॅबिनेट मंत्री आणि आता मुख्यमंत्री असा त्यांचा यशस्वी राजकीय प्रवास आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरणारा आहे.शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्र-बेळगाव सीमा आंदोलनात अग्रेसर असताना बेल्लारी तुरुंगात ४ महिने तुरुंगवास भोगला.त्यांचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाविषयी असलेले गांभीर्य पाहून त्यांना समन्वयक मंत्री म्हणून तेथे नियुक्ती करण्यात आली.याशिवाय लोकांच्या न्याय्य मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलनांचे नेतृत्व करताना त्यांनी अनेक गुन्हे आपल्या अंगावर घेतले.जिल्हा प्रमुख म्हणून विविध आव्हानांना समर्थपणे तोंड देत,त्यांनी ठाणे जिल्ह्यात व आसपासच्या क्षेत्रात शिवसेनेचा गड कायमस्वरुपी राखला आहे. संवेदनशीलता,संयम,साहस अन् संघर्ष हे गुण अंगी आकारून त्यांनी *शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं.*आम्ही ठाणे जिल्ह्यातले सर्वधर्मीय लोक खरोखर भाग्यवान आहोत की,ज्यांना शिंदेसाहेबसारखा लोकहितवादी नेता मिळाला.
ना.एकनाथजी शिंदे यांच्यात प्रचंड चिकाटी अन् कठोर परिश्रम करण्यास मनाची तयारी असल्याने त्यांनी गेल्या १५ वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत लोकांचा जिव्हाळ्याचा *क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रश्न* अखेर मार्गी लावला.यातून किसन नगर मधील नागरिकांना या योजनेअंतर्गत लवकरच सदनिकांच्या चाव्या मिळणार आहेत.त्यांना राज्यातील गोरगरीब,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मूलभूत प्रश्नांविषयी मोठी कणव आहे.शिंदेसाहेब हे राजकारणी कमी,तर समाजकारणी जास्त वाटतात.त्यामुळेच त्यांच्या हातून गोरगरीब लोकांची
तनमनधनाने सेवा होत आहे,ही मराठीजनांसाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे.
कोरोना महामारीमुळे सारं जग मोठ्या संकटात सापडले असता,नगरविकास मंत्री या नात्याने शिंदेसाहेबांनी ठोस उपाययोजना करून ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कोरोनाला नियंत्रित करण्यात यश मिळविलं.कोरोना काळातील भाईंनी केलेली रुग्णसेवेची कामे राज्यातील सर्वधर्मीय लोकांना ज्ञात आहेत.सुरुवातीच्या काळात पुरेशा आरोग्य सुविधा नव्हत्या,कारण या महामारीवर कोणतीही लस वा औषध जगात उपलब्ध नव्हतं.मा.शिंदेसाहेबांच्या संकल्पनेतून साकारलेल्या *वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन* या द्वय सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राज्यात जागोजागी आरोग्य शिबिरे आयोजित करून लोकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली.तसेच कोरोनाविषयक जनजागृती करून लोकांना राज्य सरकारच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केलं.त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगून स्वतःची व आपापल्या कुटुंबांची काळजी घेतली.आतापर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये सुमारे एक हजाराहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित केल्याने लाखों लोकांनी या शिबिरांचा लाभ घेतला.त्यामुळे कोरोना काळात लोकांच्या आरोग्याचे एका अर्थाने रक्षण झाले,असे म्हणणे उचित ठरेल.
राज्यातील गोरगरीब लोकांचे व त्यांच्या पाल्यांचे महागडे ऑपरेशन्स पैशांअभावी होऊ न शकल्याने दुर्दैवाने त्यांना आपले जीव गमवावे लागायचे.यावर रामबाण उपाय शोधून रुग्णदुत ना.एकनाथजी शिंदे यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यातल्या विविध रुग्णालयांमध्ये गोरगरीब,निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे महागडे ऑपरेशन्स मोफत किंवा अल्पदरात होऊ लागले आहेत.त्यातून जीवन जगण्याची एक नवी उमेद त्यांच्यात निर्माण झाली,ही दिलासा देणारी गोष्ट आहे.हे सत्कर्म मा.एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हातून झाले असून,त्यास डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख श्री.मंगेश चिवटे व त्यांच्या वैद्यकीय टीमचे भरीव योगदान लाभत आहे.परिणामी साऱ्या राज्यात त्यांचे कौतुक होत आहे.सदर आरोग्य मोहिमेस सर्वधर्मीय लोक अन् सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांकडून व्यापक प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.या पार्श्वभूमीवरच राज्यातल्या लोकांनी शिंदेसाहेबांना *अनाथांचे नाथ..एकनाथ* ही उपमा दिली आहे.ही रुग्णसेवा जात,धर्म,पंत आणि राजकारण ह्या गोष्टी बाजूला सारून होत आहे,हीच पुरोगामी महाराष्ट्राची खरी ओळख आहे.रुग्णसेवेचं हे नेत्रदीपक कार्य राज्यातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींना अन् संस्थांना पथदर्शक ठरेल,हे निश्चित.
राज्यातील लोकांचे आरोग्याचे रक्षण करण्याबरोबरच त्यांना पंचतारांकित दळणवळणच्या पायाभूत सुविधा देण्यासंदर्भात देखील शिंदेसाहेब हे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) म्हणून पूर्णक्षमतेने कृतिशील राहिले.राज्यातील रस्त्यांचा विकास,त्यांचं बांधकाम अन् देखरेखीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कार्यरत आहे.
एवढं करून भाई थांबले नाहीत.मुंबई-सिंधुदुर्ग असा रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा *ग्रीन फिल्ड कोकण द्रुतगती* चा महामार्ग तयार होत असून,त्यामुळे कोंकण विभागातील औद्योगिक व पर्यटन विकासासह या क्षेत्राचे दळणवळण अधिक गतिमान होणार आहे.या व्यतिरिक्त ठाण्याहून घोडबंदरमार्गे बोरिवलीला जाणारा रस्ता ; शीळ- कल्याण रुंदीकरण ; ठाणे घोडबंदर उन्नत रस्ता ; वडाळा- घाटकोपर ठाणे मेट्रो ; ठाणे शहरअंतर्गत मेट्रो प्रकल्प ; कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक ;ठाण्यातील कोपरी पुल ;वांद्रे-वर्सावा सी लिंक प्रकल्प ; मुंबई पश्चिम किनारपट्टीवरील कोस्टल महामार्ग प्रकल्प आदी तत्सम पब्लिक प्रोजेक्ट प्रगतीपथावर आहेत.त्यामुळे राज्यभरातील दळणवळण प्रक्रिया गतिमान होईल,हे नक्की.वास्तवात नागरी जीवन अधिक सुखकर,विना अडथळ्याचं आणि समृद्ध करण्याकडे शिंदेसाहेबांचा मानस असल्याचे निष्पन्न होते.
समृद्धी महामार्ग हा *ड्रीम प्रोजेक्ट* सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने शिंदेसाहेबांनी या प्रकल्पाची उभारणी जलदगतीने व्हावी,या उद्देशाने अधिक लक्ष घातले आहे.यावर सुमारे ५५ हजार कोटी रुपये अंदाजित खर्च अपेक्षित आहे.त्यामुळे १० जिल्हे,२६,तालुके अन् ३९३ खेडींची दळणवळणाची मोठी सोय झाली आहे.हा प्रोजेक्ट राज्यातील लोकांना वरदान ठरला आहे.त्यामुळे अवघ्या ८ तासात मुंबई-नागपूर अंतर पार करता येत आहे.त्यास वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे.वास्तवात हीच खरी ना.एकनाथ शिंदेसाहेबांच्या कारकिर्दीतल्या सार्वजनिक बांधकाम खात्याची विकासगाथा होय.
शिंदे सरकारचा सर्वात महत्वाकांक्षी निर्णय म्हणजे स्त्रियांना वयाची अट न ठेवता,एस टी बसने अर्ध्या तिकीटावर प्रवास सवलत आणि ७५ वर्षांवरील वृद्धांना एस.टी.प्रवास मोफत करण्याची मुभा दिल्याने त्यांना देवदर्शनासाठी जाणे सुकर झाले आहे.याशिवाय स्त्रिया अन् वृद्धमंडळीची एस.टीने प्रवास करणाऱ्यांची संख्या अनेक पटीने वाढली आहे.यास्तव विविध संघटनांनी शिंदे सरकारचे शतश:आभार मानले आहेत.
ठाणे शहरातील धोकादायक अन् मोडकळीस आलेल्या इमारतींतल्या लोकांचे जीवन सुरक्षित करून त्यांना त्यांच्या हक्काचे घर देण्यासाठी नगर विकास मंत्री या नात्याने त्यांच्या प्रयत्नांतून *क्लस्टर डेव्हलपमेंट योजना* कार्यान्वित करण्यात आली. त्यासाठी सिडको व ठाणे महापालिका यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.*गेली दोन दशके क्लस्टर योजनेसाठी जो लढा दिला,त्याची ही फलश्रुती आहे*,असे विधान शिंदेसाहेबांनी याप्रसंगी केले.या महत्वाकांक्षी योजनेमुळे सुमारे ८ ते १० लाख ठाणेकरांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळून,त्याचे नवे व सुंदर घर मिळण्याचे स्वप्न साकार होईल,हे निश्चित.*आमदार झाल्यानंतर २००४ साला पासून मी सदर योजनेसाठी लढत आहेत.अखेर आज या योजनेस मान्यता मिळाली,ही माझ्या दृष्टीने समाधानाची तर,ठाणेकरांसाठी भाग्याची गोष्ट आहे,असे उदगार त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना काढले.खरं तर,ते समाजातील दुर्बल घटकांचे कैवारी आहेत,असे म्हणणे उचित ठरेल.
महाड दुर्घटनेत मरण पावलेल्या दोन कुटुंबियांच्या दोन्ही मुलांना दत्तक घेऊन शिंदेसाहेबांनी त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडे सोपविली.इतकेच नव्हे तर,त्या मुलांच्या नावे प्रत्येकी १० लाखाची एफ.डी.काढून दिली.चिमुकल्या प्रियांशीची गोष्ट तर वेगळीच होती.ह्या नवजात मुलीच्या कुटुंबातील आईसह प्रत्येक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह अन् ही एकटी निगेटिव्ह होती.ही गोष्ट कळताच शिंदेसाहेब त्या चिमुकलीच्या मदतीला धावून आले.भाईंनी तातडीने त्या मुलीला घेऊन शिवसेना महिला आघाडीच्या सौ.मुदलियार यांच्याकडे जाऊन ती चिमुकली सोपविली.त्यानंतर वीस दिवसानंतर तिची आई बरी झाल्यावर भाईंनी स्वत:च्या हाताने ती चिमुकली आईकडे सोपविली.सदर प्रसंग अतिशय हृदय हेलवणारा होता.मुलीला पाहिल्यावर आईच्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते.खरं तर,त्यावेळी सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू झळकत होते.*त्या* आईनं शिंदेसाहेब आणि सौ. मुदलियार मॅडमचे पदस्पर्श करून आभार मानले. असच एक उदाहरण ठाणे येथील नौपाडा परिसरातील आहे.जेथेही पालकमंत्री मदतीला धाऊन गेले.नौपाडा स्थित पार्वती निवासस्थानाला मोठी आग लागली होती.त्यात दोन घरे बेचिराख झाले होते.या पार्श्वभूमीवर त्यांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने शिंदेसाहेबांनी तत्कालिन महापौर नरेश म्हस्के यांच्याशी बोलून सदर दोन्ही पिडित कुटुंबांना घर देण्याच्या सूचना दिल्या.लगेचच नुकसानग्रस्त कुटुंबियांना नवीन घराच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. खरं तर,या पार्श्वभूमीवरच शिंदेसाहेबांना *अनाथांचे नाथ एकनाथ* असे गौरवाने संबोधिले जाते.
गेल्या दोन वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ना.एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून ३२,०००हून अधिक गोरगरीब,निर्धन,गरजू लोकांच्या महागड्या शस्त्रक्रियेंसाठी २६७ कोटी ५१लाख रुपयांचे अर्थसहाय्य अदा केलं आहे,ही अतुलनीय गोष्ट असून,आरोग्य क्षेत्रात एक विक्रम प्रस्थापित केला आहे,असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.याशिवाय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे *आपला दवाखाना* या उपक्रमाअंतर्गत राज्यात ७०० दवाखाने सुरू होणार असून,मुंबईत १६० आरोग्य केंद्रे कार्यान्वित आहेत.त्याचा आजमितीपर्यंत लाखों लोकांनी लाभ घेतला आहे.महात्मा ज्योतिराव फुलेजनआरोग्य योजनेअंतर्गत असंख्य गोरगरीब लोकांना महागडे ऑपरेशन करण्यास अर्थसहाय्य प्राप्त झालं आहे.आता पांढऱ्या रेशन कार्डधारकांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.त्यामुळे गरजू रुग्णांमध्ये जगण्याची एक नवी उमेद निर्माण होत आहे.गेल्या काही वर्षांत राज्यातील गोरगरीब,निर्धन लोकांच्या सुमारे ५००० महान मुला मुलींच्या हृदयावरील छिद्राचे ठाण्याचे प्रसिद्ध ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मोफत ऑपरेशन करून दिले आहे.त्यामुळे ती मुलं आता निरोगी जीवनाचा श्वास घेत सुदृढ जीवन जगत आहेत. खऱ्या अर्थाने ही आरोग्य क्षेत्रातील क्रांतीच म्हणावी.
राज्यातील गोरगरीब,गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे घरकुल, रोजगार
स्वयंरोजगार,शिक्षण,आरोग्य हे मूलभूत प्रश्न शिंदे सरकारच्या काळात मार्गी लागत आहेत,ही कौतुकास्पद गोष्ट आहे.त्याचप्रमाणे बळीराजाच्या कृषी वीजपंपाचे बिलं माफ करण्यात आली आहेत.अतिवृष्टी अन् गारपिटीमुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वेळोवेळी अर्थसहाय्य देण्यात आले आहे.त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखावला आहे. वारकरी मंडळांना प्रत्येकी 20 हजार रुपये
अर्थसहाय्य दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थ यात्रा जाण्याची तरतूद करण्यात आली आहे. सर्वसामान्यांचे नेते ना.एकनाथजी शिंदेसाहेब यांची मुख्यमंत्री पदी द्विवर्षपूर्ती झाली आहे. याबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी भगव्या शुभेच्छा!
जय 🇮🇳हिंद ! जय 🚩महाराष्ट्र!

शुभेच्छा !

रणवीर राजपूत

गवर्नमेंट मिडिया,महाराष्ट्र शासन(एक्रिडेशन-मावज/०४७३),मंत्रालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *