अशोक गायकवाड

 

 

 

नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशनच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ’सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानास जागतिक डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून १ जुलैपासून प्रारंभ करण्यात आला असून नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता आणि आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत.

अशाच प्रकारचा हाफ मॅरेथॉनचा अभिनव उपक्रम ’हेल्थकॉम’ या वैद्यकीय क्षेत्रात काम करणा-या डॉक्टरांच्या संघटनेच्या माध्यमातून, लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या सहयोगाने, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरूळ जिमखाना ते नमुंमपा मुख्यालय ते परत नेरूळ जिमखाना अशा स्वरूपात राबविण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी झेंडा दाखवून या ’हेल्थकॉम हाफ मॅरेथॉन’चा शुभारंभ केला. यावेळी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर, क्रीडा विभागाच्या प्र. उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल व डॉ. अमोल पालवे, कार्यकारी अभियंता राजेश पवार तसेच हेल्थकाॅन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.‌ राम, लेट सेलिब्रेट फिटनेस संस्थेच्या प्रमुख श्रीम.रिचा समित, नेरुळ जिमखाना अध्यक्ष शशी पांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ’सफाई अपनाओ, बिमारी भागाओ’ अभियान स्वच्छतेप्रमाणेच आरोग्य विभागाशी निगडीत आहे. विशेषत्वाने पावसाळी कालावधीत उद्भवणारे जलजन्य आणि किटकजन्य आजार उद्भवूच नयेत यादृष्टीने करावयाचे प्रतिबंधात्मक उपचार व घ्यावयाची काळजी या अनुषंगाने अभियानांतर्गत स्वच्छता व आरोग्य विषयक व्यापक जनजागृती केली जात आहे तसेच सखोल स्वच्छता मोहीमा राबवून, डासनाशक फवारणी करून, आरोग्य तपासणीवर भर देऊन रोगप्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे. याकामी डॉक्टरांची भूमिका अतिशय महत्वाची असून त्यादृष्टीने हेल्थकॉन या डॉक्टरांच्या राष्ट्रीय संस्थेने पुढाकार घेऊन लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या सहयोगाने हेल्थकॉन हाफ मँरेथॉन आयोजित केली होती. सकाळी ५.३० वा. २१ किमी अंतराच्या हाफ मँरेथॉनला प्रारंभ झाला. त्यानंतर १० किमी. व ६ किमी. मॅरेथॉन घेण्यात आली. यामध्ये ५०० हून अधिक डॉक्टर्स उत्साहाने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याकरिता दिल्लीसह इतर राज्यातून १५० हून अधिक डॉक्टर्स आले होते. या हेल्थकाॅन हाफ मॅरेथाॅनमध्ये नवी मुंबईतील डॉक्टरांनी विविध पारितोषिके संपादन करीत उल्लेखनीय कामगिरी केली. यामध्ये डॉ. अनिता बजाज २१ कि.मी. अंतराच्या प्रथम क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या. डॉ. चेतन सिंघल, डॉ.अमित घरत, डॉ. नचिकेत जाधव यांनी २१ किलोमीटरच्या मॅरेथॉन मध्ये पारितोषिके संपादन केली. तसेच दहा कि.मी. अंतराच्या मॅरेथॉनमध्ये डॉ. प्रवीण गायकवाड, डॉ. आरती गायकवाड, डॉ. वैशाली लोखंडे, डॉ. केतकी दवे यांनी पारितोषिके पटकावली.हेल्थकॉन हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणा-या सर्व धावपटू डॉक्टर्सना मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रत्येक वयोगटातील विजेत्या पहिल्या ३ क्रमांकांच्या पुरूष व महिला धावपटूंना सन्मानचिन्हे प्रदान करून गौरविण्यात आले. विशेष म्हणजे या ठिकाणी मान्यवरांच्या स्वागतासाठी पर्यावरण आणि आरोग्य या दोन्ही दृष्टीने उपयुक्त अशी फळांची करंडी स्नेहभेट म्हणून देण्यात आली. ’सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ हे अभियान आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे असलेले महत्व दर्शविणारे आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची जपणूक करणारे डॉक्टर्सच स्वच्छतेचे महत्व सांगत हेल्थकॉन हाफ मॅरेथॉनमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेश प्रसारित करीत ‘रन फॉर हेल्थ’ म्हणत स्वत: धावले तेव्हा निश्चितच या उपक्रमाला नवा आयाम लाभलेला दिसून आला. हेल्थकॉन हाफ मॅरेथॉनव्दारे डॉक्टर्सच्या माध्यमातून स्वच्छतेचा व आरोग्य रक्षणाचा संदेश गांभीर्याने प्रसारित झाला.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *