चेंबूर जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धा २०२४
चेंबूर जिमखान्याच्या वतीने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला २० जुलै २०२४ रोजी सकाळी ९ वाजता पुरुष एकेरी गटाने सुरुवात होत आहे. तर महिला गटांच्या सामन्यांना २१ जुलै २०२४ रोजी प्रारंभ होईल. पुरुष एकेरी गटात ३२० तर महिला एकेरी गटात ५० खेळाडूंनी भाग घेतला असून पुरुष एकेरी गटातील विजेत्याला रोख रुपये २५ हजार तर महिला एकेरी गटातील विजेतीला रोख रुपये ८ हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेतील सुरुवातीच्या काही महत्वाच्या सामन्यांचे तसेच उप उपांत्य फेरीच्या पासूनच्या सामन्यांचे थेट प्रसारण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून करण्यात येणार आहे. चालू वर्षी महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आपले ७० वे वर्ष साजरे करत असून यंदाच्या मोसमातील हि चौथी स्पर्धा आहे.
पुरुष एकेरी गटात ५८ गुण
मिळविणाऱ्या मुंबईच्या महम्मद घुफ्रानला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. तर ४३ गुण मिळविणाऱ्या मुंबईच्या विकास धारियाने द्वितीय मानांकन प्राप्त केले आहे. महिलांमध्ये ७१ गुणानिशी आघाडीवर असणाऱ्या मुंबईच्या काजल कुमारीला अग्र मानांकन देण्यात आले असून ५८ गुण प्राप्त करणाऱ्या ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने द्वितीय मानांकनाचा मान मिळविला आहे.
स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे.
पुरुष एकेरी : १) महम्मद घुफ्रान ( मुंबई ), २) विकास धारिया ( मुंबई ), ३) अभिजित त्रिपणकर ( पुणे), ४) प्रशांत मोरे (मुंबई), ५) संदीप दिवे (मुंबई उपनगर), ६) झैद फारुकी (ठाणे), ७) रहिम खान ( पुणे), ८) पंकज पवार ( मुंबई)
महिला एकेरी : १) काजल कुमारी (मुंबई), २) समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ), ३) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ४) अंबिका हरिथ ( मुंबई ), ५) आकांक्षा कदम (रत्नागिरी ), ६) श्रुती सोनावणे ( पालघर ), ७) उर्मिला शेंडगे ( मुंबई ), ८) ऐशा साजिद खान (मुंबई)
