ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर खड्डे आणि वाहतुक कोंडी यामुळे वाहन चालक हैराण झाले असताना, आता येथील असमतल रस्त्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहतुक करावी लागत आहे. येथील रस्त्याचा अर्धा भाग डांबरी आणि अर्धा भाग काँक्रीटचा आहे. त्यामुळे रस्ता असमतल झाला असून दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटून गंभीर अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
घोडबंदर मार्गावरून दिवसाला हजारो वाहने वाहतुक करतात. गेल्याकाही वर्षांमध्ये या भागात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. विविध राजकीय पक्षाचे नेते, सरकारी अधिकाऱ्यांचे घोडबंदर भागात निवासस्थान आहेत. ठाणे शहरातील इतर भागाच्या तुलनेत घोडबंदर भागात उंच इमारती उभ्या राहत असून विविध प्रकल्पांची कामे देखील या भागात केली जात आहेत. गेल्याकाही वर्षांपासून या मार्गावर वडाळा-घाटकोपर- कासारवडवली मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे मुख्य तसेच सेवा रस्त्याजवळील दुभाजकांमध्ये मेट्रो मार्गिकेचे खांब उभारण्यात आले आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. या कामांमुळे येथील सेवा रस्ते तसेच मुख्य रस्त्यांची स्थिती वाईट झाली असून मुख्य मार्गिका देखील अरुंद झाली आहे. त्यातच पावसाळ्यात येथील वाघबीळ, पातलीपाडा, आनंदनगर सिग्नल, कासारवडवली भागातील चौकामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. दररोज येथून प्रवास करणाऱ्या चालकांना कोंडीचा फटका सहन करावा लागत आहे. एमएमआरडीएकडून येथील खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती केली जात आहे. परंतु येथील रस्ते दुरुस्त करताना काही काँक्रिटच्या रस्त्यावर काही भागात डांबर टाकले गेले आहे. त्यामुळे अर्धा रस्ता डांबरी आणि अर्धा रस्ता काँक्रीट असा झाला आहे. रस्त्यावरील डांबरी भागाचा थर रस्त्याला समतल नसून एक भाग खाली आणि दुसरा वर अशा स्थितीत आहे. तसेच काँक्रिटच्या रस्त्याला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. येथून वाहतुक करणाऱ्या दुचाकी चालकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *