Month: July 2024

ठाणे बाजारपेठेतील ८० वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळला

ठाणे : ठाण्यातील जांभळीनाका बाजारपेठेतील ८० ते ९० वर्ष जुन्या इमारतीचा भाग रविवारी कोसळला. ही इमारत रिकामी असल्याने दुर्घटना टळली. सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी इमारतीजवळ धोकापट्टी बांधली आहे.…

उल्हास खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे

उल्हास, भातसा, भारंगी, काळू नद्यांच्या पाणी पातळीत वाढ     कल्याण : रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातील उल्हास खोरे आणि ठाणे जिल्ह्यातील सह्याद्री डोंगरांच्या रांगेत रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे या खोऱ्यातून वाहणाऱ्या उल्हास, भातसा, काळू, भारंगी नद्यांच्या पाणी पातळीत शनिवारी रात्री पासून वाढ झाली आहे. कल्याण-डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोहिली, मोहने येथील पाणी पुरवठा केंद्रांच्या समतल पाण्याची पातळी वाढली आहे. मोहने ते टिटवाळा परिसर जोडणाऱ्या उड्डाण पुलाच्या कठड्यांना पाणी लागले आहे. पुलावरून पाणी वाहून जाण्यासाठी एक ते दीड फुटाची उंची बाकी आहे. पाण्याच्या पातळीमुळे टिटवाळा भागातील सावरकर नगर भागातील वस्तीत रात्रीपासून पाणी घुसले आहे. हा परिसर नद्यांच्या समतल पातळीत येतो. रात्रीपासून रहिवासी घरातील पाणी उपसण्यासाठी व्यस्त आहेत. सतत मसुळधार पाऊस सुरू राहिला तर कल्याणमधील दुर्गाडी परिसरातील बाजारपेठ, बैलबाजार भागात पाणी घुसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खाडी किनारच्या रहिवाशांनी स्थलांतराची, तबेले चालकांनी सावध राहून पाणी पातळी वाढील तर तबेल्यातून म्हशी बाहेर काढण्याची तयारी सुरू केली आहे. मुसळधार पावसामुळे पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. माहुली किल्ला परिसरा रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने सावरोली, शहापूर भागातून वाहणारी भारंगी नदी दुथढी वाहत आहेत. या नदी किनाऱ्याच्या वस्तीत पाणी शिरले आहे. अनेकांची वाहने पाण्याखाली गेली आहेत. तर काहींच्या दुचाकी वाहून गेल्या आहेत. भातसा, काळू नद्यांच्या पात्रात वाढ झाला आहे. या मुसळधार पावसामुळे भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे. रविवार सकाळपासून पावसाने उसंत घेतल्याने नद्यांच्या पाण्याच्या पातळीत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडकसागर या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला नसल्याने धरणांची तळ गाठला आहे. या धरणांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. धरणांमध्ये पाणी नसल्याने सध्या मृत साठ्यांमधून शहराला पाणी पुरवठा केला जातो. रेल्वे मार्गांवर अडथळे मध्य रेल्वेच्या कसारा ते आसनगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे मार्गावर झाड कोसळले होते. ते कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून या रेल्वे मार्गावरील वाहूतूक सुरळीत केली. वासिंद आणि खडवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान डोंगराच्या खचलेल्या मातीचा भाग रेल्वे रूळावर येऊन पडला होता. त्यामुळे रेल्वे रूळ ढिगाऱ्याखाली गेला होता. रेल्वे कामगारांनी तातडीने घटनास्थळी येऊन या रूळावरील चिखलमय मातीचा ढीग बाजुला काढला. कल्याण ते आसनगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान तिसऱ्या, चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामामुळे डोंगरभागात खोदकाम करण्यात आले आहे. हा खोदलेला भाग पावसाळ्यात खचून तो रेल्वे मार्गात मातीसकट वाहून येत आहे. ०००००

पावसामुळे जनजीवन विस्कळीत कल्याण कसारा रेल्वे सेवा 6 तास ठप्प

कल्याण : रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज पहाटे आटगाव रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे ट्रकवर झाड पडल्याने कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक 2 तासाहून अधिक काळ ठप्प होती. सकाळी 8 वाजता रेल्वे…

 ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’

अभियानात रेल्वे स्टेशन, बस डेपो व वर्दळीच्या जागी सखोल स्वच्छता मोहीमा     नवी मुंबई : दररोज नियमितपणे करण्यात येणा-या स्वच्छतेप्रमाणेच काही दुर्लक्षित जागांची सफाईदेखील विशेष मोहीमेव्दारे करण्यात यावी अशा प्रकारच्या नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या सूचनांनुसार आठही विभागांमध्ये सखोल स्वच्छता मोहीमा (Deep Cleaning) राबविण्यात येत आहेत. यामध्ये नागरिकांना सहभागी करून घेऊन शहरात स्वच्छतेची चळवळ उभी करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त  सुनिल पवार आणि घनकचरा व्यवस्थापनाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली घणसोली विभागात विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त  संजय तायडे यांच्या पुढाकाराने घणसोली रेल्वे स्टेशन व परिसरात विशेष सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रेल्वे स्टेशन्सच्या स्वच्छतेची जबाबदारी सिडको महामंडळाची असली तरी नवी मुंबईच्या स्वच्छ शहर मानांकनात कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये याकरिता आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका सखोल स्वच्छता मोहीमेंतर्गत रेल्वे स्टेशन स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत आहे. या अनुषंगाने घेण्यात आलेल्या घणसोली रेल्वे स्टेशन स्वच्छता मोहीमेत पोलीस प्रशिक्षण घेत असलेले दळवी ॲकेडमीचे होतकरू युवक – युवती सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सहभागी झाले होते. तसेच राजीव गांधी महाविद्यालयातील एन.एस.एस. चे विद्यार्थी आणि स्वच्छताप्रेमी नागरिकही उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग अधिकारी  संजय तायडे यांच्या समवेत उप मुख्य स्वच्छता अधिकारी  राजेंद्र इंगळे, स्वच्छता अधिकारी  विजय पडघन तसेच स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र यांनी विशेष योगदान दिले. सखोल स्वच्छता मोहीमेंतर्गत विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त  भरत धांडे यांच्या नियंत्रणाखाली तुर्भे येथील पेट्रोल पंपांवरील शौचालय सफाईची विशेष मोहीम स्वच्छता अधिकारी  संजीव रोकडे यांनी स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता मित्रांसह राबविली. तसेच कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी  सुनिल काठोळे यांनी स्वच्छता अधिकारी राजूसिंग चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता मित्रांच्या सहयोगाने कौपरखैरणे बस डेपोमध्ये सखोल स्वच्छता मोहीम राबविली. अशा सखोल स्वच्छता मोहीमांव्दारे दुर्लक्षित जागांप्रमाणेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते अशा ठिकाणांचीही स्वच्छता केली जात आहे. ०००००

कपिल पाटील फाऊंडेशनतर्फे मुरबाडमध्ये मंगळवारी विद्यार्थी गौरव

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची उपस्थिती     मुरबाड : भाजपा व कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने मुरबाड येथे मंगळवारी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते दहावी, बारावी आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा ट्रॉफी व कॉलेज बॅग देऊन गौरव केला जाईल. तसेच अॅड. अदिती निटुरे यांच्याकडून विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन केले जाईल. मुरबाड येथील माऊली गार्डन येथे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होत आहे. त्यात मुरबाड तालुक्यातून चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकाचे गुणवंत विद्यार्थी, तालुक्यातील विद्यालयात दहावी व बारावीमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकातील गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व कॉलेज बॅग आणि दहावीत ७५ व बारावीत किमान ७० टक्के गूण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज बॅग देऊन गौरविण्यात येईल. त्याचबरोबर पदवी, पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंत आणि कला-क्रीडा क्षेत्रातील विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या व्यक्तिमत्वांचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक अॅड. अदिती निटुरे यांच्याकडून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनही केले जाणार आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी एस. एल. पाटील यांच्याबरोबर दूरध्वनी क्र. ९६२३०४१६४७ व एकनाथ खाटेघरे क्र. ८३०८५१७८८८ यांच्याबरोबर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 0000

मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांना जप्तीच्या नोटीस

जप्त केलेल्या मालमत्तांचा उल्हासनगर मनपा करणार लिलाव     उल्हासनगर : उल्हासनगर मनपा प्रशासनाने अनेक वेळा अभय योजना राबवून मालमत्ता करात भरघोस सूट देऊनही मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकबाकी आहे. आता यापुढे सक्तीने मालमत्ता कर वसूल केले जाईल अशी आक्रमक भूमिका मनपा प्रशासनाने घेतली आहे. मोठ्या मालमत्ताधारक थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्या असून असून लवकरच अशा मालमत्तांचा लिलाव मनपा प्रशासन करणार आहे अशी माहिती मनपा आयुक्त अजित शेख यांनी दिले आहे. मालमत्ता कर हा उल्हासनगर मनपाचा महत्त्वाचा उत्पन्नाचा स्तोत्र असून त्यादृष्टीने मालमत्ता कर वसूल करण्यासाठी मनपा प्रशासनाने मालमत्ता कर मध्ये व्याजमाफी करून तब्बल पाच,सहा वेळा अभय योजना राबविली आहे. काही अपवाद वगळता सर्वसामान्य नागरिक मालमत्ता कर वेळोवेळी भरतात मात्र मोठे मालमत्ताधारक मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करीत असतात. शहरात एकूण  1,83,138 मालमत्ता आहेत,त्यातील निवासी – 1,38,920 व वाणिज्य व धर्मादाय संस्थाची संख्या – 44218 आहे एकूण थकबाकीसह मालमत्ता कर  936,99,92,498 रुपये असून केवळ थकबाकी 819,18,98,455 रुपये आहे त्याचप्रमाणे चालू वर्षाचा मालमत्ता कर  117,80,94,043 रुपये एवढा आहे. 1 कोटी पेक्षा जास्त थकबाकीदार 15 असून त्यांच्यावर 73,51,61,025 रुपये एवढी थकबाकी आहे. मोठ्या प्रमाणात थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांना धारकांना मनपा प्रशासनाने वेळोवेळी नोटीसा बजावल्या आहेत मात्र तरी देखील  असे मालमत्ताधारक त्याला जुमानत नाहीत आता अशा मालमत्ता धारकांच्या विरोधात मनपा प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत कर निर्धारक व संकलन अधिकारी नीलम कदम – बोडारे यांच्या मार्गदर्शनाखाली नोटीसा बजावणे व जप्ती करणे याबाबत कारवाई सुरू केली आहे.  उल्हासनगर- 5 च्या नटराज पॅलेसमधील 10  मालमत्ता, महादेव पॅलेसमधील 5 मालमत्ता साई रेसिडेन्सीमधील 1 मालमत्ता, प्रभु आस्था अपार्टमेंटमधील 1 मालमत्ता अशा एकूण 17 मालमत्ता  कायद्यानुसार मालमत्ता जप्ती मनपा प्रशासनाने केली आहे  अशा मालमत्तांचा येत्या 10 जुलै रोजी उल्हासनगर मनपाच्या सभागृहामध्ये लिलाव होणार असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी पत्रकारांना दिली आहे. 0000

तरुणांनी आता फिरकायचं  कुठे ?

ठाणे : ठाणे जिल्हा प्रशासनाने ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच पर्यटन स्थळावर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे मागील आठवड्यात सर्वत्र चर्चेत राहिलेले लोणावळ्यातील भुशी डॅम च्या पाठीमागच्या बाजूला धबधब्यातून एकाच घरातील नऊ ते दहा जण अचानक आलेल्या महाभयानक धबधब्याच्या पाण्यातून वाहून गेली नऊ ते दहा पैकी पाच जण जिवंत सापडली तर बाकीचे चार जणांचा मृत्युंजय काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे अजूनही एका जणांचा पत्ता लागलेला नाही. ही घटना ताजी असतानाच जिल्हा प्रशासनाने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळावरील होणाऱ्या दुर्घटनेमुळे जिल्हा प्रशासनाचा भार हलका होईल. हे मात्र खरे पण दुसरीकडे सामान्य सामान्यता पर्यावरण प्रेमी पर्यटक ट्रेकर्स आणि तरुणाई मध्ये नाराजी आहे ठाणे जिल्हा हा स्वच्छ व सुंदर अशा पर्यटन स्थळ आणि व त्याचबरोबर उंच उंच डोंगर घाट व धबधब्यांनी सजलेला नटलेला आहे. पावसाळ्यात जी मजा या धबधब्यात डोंगरावर नदीकिनारी धरणावर येते ती मजा घेण्यासाठी ठाणेकर मुंबईकर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हे खूप उत्सुक असतात कधी एकदाचा पाऊस पडतो आणि कळत नकळत मित्राचे मैत्रिणीचे प्लॅन्स बनतात एरवी शिमला कुल्लू मनाली हिमाचल जम्मू-काश्मीरला फिरायला जाणारी माणसे पावसाळ्यात मात्र आपला ठाणे जिल्हा स्वरा असे म्हणून ठाणे जिल्ह्यातील किमान एका तरी पर्यटन स्थळाला आवर्जून भेट देत असतात. ठाणे जिल्ह्यातील कांदा पावशेपाडा खडवली नदी परिसर टिटवाळा नदी परिसर गणेश घाट गणेशपुरी नदी परिसर वज्रेश्वरी भातसा धरण माहुलीगड व पायथा अशोक धबधबा आजा पर्वत कसारा घाट व घाटात घाट परिसरातील सर्व धबधबे गोरखगड नाणेघाट बारवी धरण परिसर सिद्धगड डोंगर नावे सोनाळे सुप्रसिद्ध असा हरिश्चंद्रगड व सर्वात जास्त पसंतीचे माळशेज घाट या सर्व परिसरात ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने या परिसराच्या एक ची पर्यंत दोन महिन्यासाठी प्रतिबंध लावला आहे. काही अत्युट साई तरुणांमुळे मोठ्या प्रमाणात हातचे होतात पाण्यात उतरणे पावसामुळे वाहत्या पाण्याचा अंदाज न येणे यामुळे हानिकारक घटना घडत असतात व काही जणांना आपला जीव गमावा लागतो असा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने हे निर्बंध लावले आहे या निर्बदामुळे सर्व पर्यटकांना एक मोठा प्रश्न पडला आहे की आता फिरकायचे कुठे. ००००

ज्येष्ठ पत्रकार कपील राऊत यांना पितृशोक

वडील अनंत राऊत यांचे निधन     ठाणे : ठाणे – मुंबईत झी २४ तासमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार कपिल राऊत यांना पितृशोक झाला. कपील याचे वडील अनंत राऊत यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ७६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, पुतणे आणि नातवंडे असा परिवार आहे. ठाणे पुर्वेकडील कोपरी परिसरात राहणारे अनंत राऊत यांच्यावर गेल्या काही दिवसांपासुन खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावल्याने उपचारा दरम्यान शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर  कोपरी ठाणेकरवाडी येथील स्मशानभूमीत दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी निरंजन डावखरे,माजी नगरसेवक भरत चव्हाण, भाजप प्रवक्ते अजित चव्हाण आदिसह राजकीय पक्षाचे पदाधिकारी, तसेच अनेक पत्रकार मित्रांनी उपस्थित राहून पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. अत्यंत मीतभाषी, मनमिळाऊ स्वभावाचे अनंत राऊत यांच्या जाण्याने कोपरी भागात हळहळ व्यक्त होत आहे. 00000

कोपरी शांती नगर भागात अद्यावत शौचालय

ठाणे : कोपरी शांती नगर परिसरात सार्वजनिक शौचालयाची चांगली व्यवस्था नसल्यामुळे गैरसोय होत होती. परंतु माजी ज्येष्ठ नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी ठाणे महापालिकेने सुसज्य सार्वजनिक शौचालय बांधून दिले…

 घोडबंदर रोडवरील वाहतुकोंडी दूर होणार-प्रताप सरनाईक

२० हजार कोटींच्या गायमुख ते फाऊंटन हॉटेलपर्यंत भुयारी मार्ग व फाऊंटन हॉटेल जंक्शन ते उन्नत भाईंदर मार्गाला मंजूरी ! अनिल ठाणेकर     ठाणे : २० हजार कोटी खर्चुन गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येणार असून आठ पदरी उन्नत मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्यावरून वसई, विरार, मीरा रोड तसेच भाईंदरकडे जाणाऱ्या प्रवाश्यांची, वाहतुक कोंडीपासून सुटका होईल, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भुयारी मार्गासाठी अंदाजे ११५०० कोटी रूपये व भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या उन्नत मार्गासाठी अंदाजे ८५०० कोटी असे दोन्ही प्रकल्पांना अंदाजे २० हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येणार असून गायमुख ते फाऊंटन हॉटेल या भागाची एकूण लांबी ५.५ किमी असून या अंतर्गत प्रत्येकी ३.५ किमी लांबीचे दोन स्वतंत्र बोगदे ३+३ असे सहा पदरी बांधण्यात येणार आहेत. तसेच भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंतच्या रस्त्याची एकूण लांबी १० किमी असून ४+४ असे आठ पदरी उन्नत मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्यावरून वसई, विरार, मीरा रोड तसेच भाईंदर कडे जाणार्या प्रवाश्यांची वाहतुककोंडीपासून सुटका होईल, असे आमदार  प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या दोन्ही प्रकल्पांना एम.एम.आर.डी.ए.चे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी मंजुरी दिल्याबद्दल आमदार  प्रताप सरनाईक यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व एम.एम.आर.डी.ए.चे महानगर आयुक्त  संजय मुखर्जी यांचे आभार मानले. घोडबंदर रोडवर होत असलेल्या वाहतुककोंडीवर उपाय योजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मंगळवार २ जुलै, २०२४ ला एम.एम.आर.डी.ए. च्या प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंत भुयारी मार्ग व फाऊंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदर उन्नत मार्ग या दोन्ही प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात चार पदरी मार्गिका असून या मागील ठाणे शहरातील घोडबंदर रस्त्याचा भाग व पुढील राष्ट्रीय महामार्गाचा भाग विस्तृत रूंदीचे आहेत. त्यामुळे गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतुककोंडी होते. तसेच या रस्त्याचा काही भाग घाट स्वरूपातील असून या भागात अवजड वाहनांची वाहतुक देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याने वाहतुकीची गती धीमी असते. या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी या रस्त्याच्या भागाचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे तथापि, रस्त्याच्या एका बाजुला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व दुसर्या बाजुला ठाणे खाडी असल्याने रस्त्याचे रूंदीकरण करणे अश्यक्य आहे त्यामुळे गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्ग होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे भाईंदर  ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात देखील वाहतुककोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे वर्सोवा ते भाईंदर  या प्रकल्पाचे काम सुरू असल्याने भाईंदर  ते घोडबंदर रोडपर्यंत येण्याकरिता अंतर्गत रस्त्याचा वापर करण्यात येणार असून खाडी किनारा लगत असणारा खारफुटीचा भाग लक्षात घेता वाहतुककोंडीवर उपाय योजना करण्यासाठी भाईंदर  ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंत उन्नत मार्ग होणे गरजेचे आहे. ठाणे शहरातून घोडबंदर मार्गे वसई, विरार, मीरा रोड तसेच ठाणे ते भाईंदर  येथे जाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतुककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. घोडबंदर रोडवरील वाहतुककोंडी दुर करण्यासाठी गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्ग बांधण्यात यावा तसेच भाईंदर  ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंत उन्नत मार्गाची निर्मिती व्हावी यासाठी आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या ७-८ वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन मंगळवारी झालेल्या एम.एम.आर.डी.ए.च्या बैठकीमध्ये वसई, फाऊंटन हॉटेल जंक्शन ते गायमुख या भागात भुयारी मार्ग बांधण्यासाठी तसेच गायमुख ते वसई भुयारी मार्गाने येणार्या वाहनांना पुढे मीरा रोड, भाईंदर ला अतिवेगाने जाता यावे यासाठी फाऊंटन हॉटेल जंक्शन, वसई ते भाईंदरपर्यंत उन्नत मार्गाची निर्मिती करण्यासाठी एम.एम.आर.डी.ए.चे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी मंजुरी दिलेली आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. ०००००