मुंबई  : राज्यातील मोफत रुग्णवाहिका सेवा ”१०८” आणखी मजबूत होणार आहे. ही सेवा देण्यासाठी राज्य सरकारने नवीन कंपनीची निवड केली आहे. राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी म्हणजे रुग्णवाहिकांची संख्या पूर्वीपेक्षा जवळपास दुप्पट होणार आहे. नागरिकांना रस्त्यापासून पाण्यापर्यंत मोफत रुग्णवाहिका सेवा दिली जाणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीत आणि रस्ते, रेल्वे अपघात आणि इतर अनुचित घटनांमध्ये रुग्णांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी ”१०८” रुग्णवाहिका शासनाकडून चालवली जाते. १०८ क्रमांकावर कॉल करताच रुग्णवाहिका तातडीने रुग्णाला रुग्णालयात पोहोचवते. सरकारने यासाठी कंपनी नेमली होती. कंपनीसोबतचा करार काही महिन्यांपूर्वी संपला होता, त्यानंतर राज्य सरकार नवीन पुरवठादाराच्या शोधात होते. प्राप्त माहितीनुसार, राज्य सरकारने ही सेवा देण्यासाठी सुमीत फॅसिलिटीज लिमिटेड आणि ग्रुप्स एसएसजी मॅट्रिक्स, स्पेन यांची निवड केली आहे. आता महाराष्ट्रात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर सोपवण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत ही नवीन सेवा पाच टप्प्यांत सुरू होणार आहे.
राज्यात आतापर्यंत ९३७ रुग्णवाहिका सेवा देत होत्या, मात्र आता रुग्णवाहिकांची संख्या १७५६ होणार आहे. सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसचे उपाध्यक्ष सुमीत साळुंखे म्हणाले की, ”सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या उपक्रमाचा रुग्ण सेवेवर दूरगामी प्रभाव पडेल, तसेच शहरी आणि ग्रामीण भागात आपत्कालीन प्रतिसाद मिळण्याच्या वेळेत सुधारणा होईल.
या विशेष रुग्णवाहिकांचा समावेश
१७५६ पैकी यामध्ये १२७३ मूलभूत जीवन सपोर्ट, २५५ प्रगत जीवन सपोर्ट, ३६ नवजात रुग्णवाहिका, १६६ बाईक रुग्णवाहिका, १० समुद्री बोट आणि १५ नदी बोट रुग्णवाहिका यांचा समावेश आहे. या सर्व रुग्णवाहिका आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. सरकार त्याच्या ऑपरेशन खर्चावर अंदाजे ४२५ कोटी ते ८०० कोटी रुपये खर्च करेल.
राज्याच्या आरोग्य विभागाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, सरकार लवकरच एअर ॲम्बुलन्स (हेलिकॉप्टर) आणि ड्रोनचा वापर करण्याचा विचार करत आहे. यासोबतच, रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी रुग्णालयांना माहिती दिली जाईल, जेणेकरून ते रुग्णाला तत्काळ उपचार देण्यासाठी तयार होतील, अशी यंत्रणा तयार करण्याचीही योजना आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *