‘घरोघरी तिरंगा’ अभियानात झाला विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम

 

ठाणे : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने काल ठाणे महानगरपालिका मुख्यालयात देशभक्तीपर गीते, नृत्य आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी गायलेल्या गीतांच्या सुरावटींनी महापालिका मुख्यालय निनादून गेले. ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानातंर्गत ०९ ते १५ ऑगस्ट या काळात विविध कार्यक्रम ठाण्यात साजरे करण्यात आले. त्याचा कळसाध्याय आज महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात साकार झाला.
ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थी, महापालिका कर्मचारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे कर्मचारी व मीनाताई ठाकरे परिचर्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी या देशभक्तीपर कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, उप माहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर तसेच कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांना उपायुक्त उमेश बिरारी यांनी ‘तिरंगा प्रतिज्ञा’ दिली. कार्यक्रमाची सुरूवात आरक्षक योगेश विसपुते यांनी खड्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर करुन केली. त्यानंतर, ठामपा शाळा क्र. ४४च्या विद्यार्थ्यांनी हे राष्ट्र देवतांचे.. हे राष्ट्र प्रेषितांचे, तर शाळा क्र. ४१च्या विद्यार्थ्यांनी ‘ओ देश मेरे’, शाळा क्र. ६४च्या विद्यार्थ्यांनी ‘तेरी मिट्टी मे..’, तर शाळा क्र.९५ च्या विद्यार्थ्यांनी ‘उंच उंच तिरंगा गगनात’ ही देशभक्तीपर गीते सादर केली.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी ‘सारे जहाँ से अच्छा.. आणि जयोस्तुते ही दमदार गीते सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या प्राची धारप व सहकारी तसेच विद्यार्थींनीनी ‘छोडो कल की बाते… आणि हम होंगे कामियाब’ ही गाणी सादर केली.
महापालिका कर्मचारी संगीता बोरसे व सहकाऱ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. तर शाळा ठामपा शाळा क्र. २९च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्ये सादर केली. अतिशय कमी कालावधीत महापालिकेचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी कार्यक्रम सादर केल्याबद्दल उपस्थित सर्वांनी त्यांचे कौतुक केले.
०९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबवित असलेल्या ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान ठामपाच्या माध्यमातून आपण शहरात राबवित आहोत. या अभियानाला नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी नमूद करीत या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
ठामपा शाळांमध्ये शिकत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण आहेत. त्यांचे कलागुण आज देशभक्तीपर गीते तसेच नृत्याच्या माध्यमातून पाहता आले. अतिशय कमी वेळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून कार्यक्रमाची तयारी करुन घेतल्याबद्दल सर्व शिक्षकांचे आभार उपायुक्त उमेश बिरारी यांनी मानले. ०९ ऑगस्टपासून स्वातंत्र्य दिनाचा सप्ताह आपण साजरा करत आहोत. घरोघरी तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून सर्वांनी घरोघरी तिरंगा फडकावयाचा असून या तिरंग्याचे महत्त्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगावे. १५ ऑगस्टनंतर जर कोणाला तिरंगा कुठेही पडलेला आढळल्यास तो सन्मानाने उचलला गेला पाहिजे. तिरंग्याचा अवमान होता कामा नये, तिरंग्याबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे, अशा पध्दतीची जनजागृती शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये करणे गरजेचे असल्याचेही उपायुक्त उमेश बिरारी यांनी नमूद केले.
अत्यंत नीटनेटक्या पध्दतीने सादर केल्याबद्दल सर्व विद्यार्थी, कर्मचारी यांचे आभार उपायुक्त जी.जी.गोदेपुरे यांनी व्यक्त केले व सर्वांनी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र पाटणकर यांनी केले.
शाळांमध्ये तिरंगा यात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम
ठाणे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ०९ ते १४ ऑगस्ट या काळात तिरंगा यात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहाने आयोजन करण्यात आले होते. त्यात तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच, तिरंगा गीतही सादर करण्यात आले.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *