राज्यातून १३६ खेळाडूंचा सहभाग
धाराशिव : ३४ व्या किशोर व किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेकरिता मैदान निवड चाचणी धाराशिव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मैदानावर सुरु झाली. या चाचणीत राज्यातील विविध जिल्ह्यातून ६० किशोर व ७६ किशोरी असे १३६ खेळाडूंनी भाग घेतला आहे. यातून भारतीय खो खो महासंघाच्या वतीने ३४ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे किशोर व किशोरी संघ निवडण्यात येणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धा २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान झारखंड येथे होणार आहेत.
राष्ट्रीय स्पर्धेबरोबर वडोदरा, गुजरात येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय खेलो इंडिया महिला लीग करिता किशोरी संघ निवड होणार आहे. अशा प्रकारे किशोरीचे दोन संघ निवडण्यात येणार आहेत. अमोल मुटकुळे (हिंगोली), विशाल पाटील (जळगाव), राजाराम शितोळे (सोलापूर) व वर्षा कछवा (बीड) हे निवड समिती सदस्य महाराष्ट्राचे संघ निवडणार आहेत. किशोर व किशोर संघाचे सराव शिबिर मुंबई येथे १८ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
महाराष्ट्र खो खो संघटनेचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून चाचणीस सुरुवात झाली. यावेळी यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे चेअरमन सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा, माजी सचिव संदीप तावडे, सहसचिव डॉ. पवन पाटील, डॉ. राजेश सोनवणे, कार्यालयीन सचिव डॉ. प्रशांत इनामदार, धाराशिव जिल्हा खोखो संघटनेचे सचिव प्रवीण बागल आदी उपस्थित होते.