शिरसाठ सिडकोचे अध्यक्ष तर अडसूळ, पाटलांना महामंडळ

मुंबई : विधानसभा निवडणुकीपुर्वी पक्षातील नाराज नेत्यांची नाराजी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिशन पुनर्वसन सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून संजय शिरसाठ यांना थेट सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. तर राज्यपालपदाची आस लावून बसलेल्या आनंद अडसूळ आणि खासदारकीचे तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. ही तिन्ही पदांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला आहे.

 रामटेक लोकसभा मतदारसंघातून तिकीट कापण्यात आलेल्या कृपाल तुमाने यांना विधान परिषदेवर घेत शिंदेंनी राजकीय पुनर्वसन केले. त्यानंतर आता अमरावती आणि हिंगोलीच्या माजी खासदारांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून आनंदराव अडसूळ निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण, भाजपाने दावा करत नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अडसूळ नाराज झाले. अनेकदा त्यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली.

आनंदराव अडसूळ यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोलीतून तिकीट कापण्यात आलेल्या हेमंत पाटील यांची हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे असलेल्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला मंत्रि‍पदाचा दर्जा देण्यात आला आहे.

मंत्रि‍पदाच्या प्रतिक्षेत असलेले शिरसाट सिडकोचे अध्यक्ष

शिवसेनेचे प्रवक्ते आणि औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांची सिडको अर्थात शहर व औद्योगिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला मंत्रि‍पदाचा दर्जा आहे.

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या नेत्यांपैकी एक संजय शिरसाट होते. महायुती सरकार स्थापन झाले, त्यावेळी शिरसाट यांना मंत्रिपद मिळेल, असे म्हटले जात होते. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची मंत्रि‍पदी वर्णी लागेल, असेही म्हटले गेले. अखेर शिंदेकडून त्यांचे सिडको अध्यक्षपदी पुनर्वसन करण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या तिन्ही नेत्यांच्या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *