प्रभू प्रतोद 0 भास्कर जाधव गटनेते
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सभागृह नेतेपदी आदित्य ठाकरे यांची तर प्रतोदपदी सुनील प्रभु आणि विधानसभेच्या गटनेतेपदी भास्कर जाधव यांनी निवड करण्यात आली. पक्षाच्या नवनिर्वाचित २० आमदारांची बैठक मातोश्रीवर बोलावण्यात आली होती. मातोश्रीवरील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत ही निवड करण्यात आलीय.
राज्यातील विधानसभेच्या निकालाने महाविकास आघाडीचं पाणीपतं झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, राज्यात भाजप महायुतील तब्बल २३६ जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने तब्बल १३२ जागांवर विजय मिळवला आहे. तर, शिवसेना शिंदे गटानेही तब्बल ५७ जागांवर विजय मिळवला असून गत कार्यकाळात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर जेवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले होते, त्यापेक्षा जास्त आमदार आता विजयी झाले आहेत. तर, उद्धव ठाकरेंकडे बंडानंतर १५ आमदार राहीले होते त्यात वाढ होऊन यंदा त्यांचे २० आमदार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार असलेला पक्ष म्हणून शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर १६ जागांसह काँग्रेस असून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ १० जागांवर यश मिळालं आहे.
