तेलंगणा : उद्योगपती गौतम अदानी यांनी देऊ केलेली १०० कोटी रुपयांची देणगी तेलंगणा सरकारने नाकारली आहे. गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप गौतम अदानी यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे तेलंगणा सरकारने हा निर्णय घेतला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले की, यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीसाठी अनेक कंपन्यांनी निधी दिला होता. यामध्ये अदानी समूहानेही १०० कोटी रुपयांची देणगी दिली होती. मात्र, अदानी यांनी दिलेले १०० कोटी रुपये स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजेच अदानी समूहाचे १०० कोटी रुपये परत केले जातील, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील आपल्या कंपनीसाठी सौरऊर्जेशी संबंधित प्रकल्प आणि कंत्राट मिळवण्यासाठी गौतम अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना २१०० कोटी रुपयांची लाच दिली होती. ही गोष्ट त्यांनी त्या अमेरिकन बँकांच्या गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवल्याचा आरोपही आहे. हे कंत्राट मिळवण्यासाठी कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना पैसे देण्याचे मान्य केले होते, असा दावा अमेरिकन वकिलांनी केला आहे.