मुंबई : लोकसभा निवडणुकीप्रमाणे पिपाणी चिन्हाचा फटका विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाला बसल्याचे समोर येत आहे. पिपाणीमुळे शरद पवार गटाचे उमेदवार नऊ ठिकाणी पडल्याचे दिसून आले आहे. यावरून मतदारांनी पिपाणीलाच तुतारी समजून मतदान केल्याची चर्चा रंगू लागली आहे.
– शहापूर मतदारसंघात शरद पवार गटाकडून पांडुरंग बरोरा निवडणूक रिंगणात होते. बरोरा यांचा १६७२ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला ३८९२ मते मिळाली.
– बेलापूर मतदारसंघात शरद पवार गटाचे संदीप नाईक यांचा अवघ्या ३७७ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला २८६० मते पडली. या ठिकाणी भाजपाच्या मंदा म्हात्रे या विजयी झाल्या.
– अणुशक्ती नगर मतदारसंघात शरद पवार गटाकडून फहाद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा ३३७८ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला ४०७५ मते मिळाली. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक विजयी झाल्या.
– जिंतूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे विजय भांबळे उभे होते. त्यांचा ४ हजार ५१६ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणीला ७ हजार ४३० मते मिळाली. त्यामुळे भाजपाच्या मेघना बोर्डिकर या विजयी झाल्या.
– घनसावंगी मतदारसंघात शरद पवार गटाचे राजेश टोपे निवडणूक रिंगणात होते. राजेश टोपे यांचा २३०९ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला ४८३० मते मिळाली. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले.
– आंबेगाव मतदारसंघात शरद पवार गटाच्या देवदत्त निकम यांचा १५२३ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला २९६५ मते मिळाली. या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील विजयी झाले.
– परांडा मतदारसंघात शरद पवार गटाचे राहुल यांचा १५०९ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला ४४४६ मते मिळाली. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत विजयी झाले.
– पारनेर मतदारसंघात शरद पवार गटाकडून राणी लंके यांचा १५२६ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला ३५८२ मते मिळाली. या मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काशिनाथ दाते विजयी झाले.
– केज मतदारसंघात शरद पवार गटाकडून पृथ्वीराज साठे यांचा २६८७ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला ३५५९ मते मिळाली. भाजपाच्या नमिता मुंदडा विजयी झाल्या.
