महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बँक प्रशासनाकडे केली कारवाईची मागणी
उल्हासनगर : येथील उल्हासनगर -४ मधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत अधिकारी व कर्मचारी ग्राहकांशी उद्धट वर्तन करून हिंदी भाषेत बोलण्याची सक्ती केल्याचा आरोप काही ग्राहकांनी केला आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख व शहर अध्यक्ष संजय घुगे यांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने बँक व्यवस्थापकाला याबाबत जाब विचारून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या उल्हासनगर शाखेत ग्राहक मराठीतून अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बोलतात मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील अधिकारी व कर्मचारी आम्हाला मराठी भाषा येत नाही हिंदीत बोला असे धमकावतात त्याचप्रमाणे अरेरावीची भाषा करतात अशा अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत.
याबाबत आणि ग्राहकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधून ही गंभीर बाब निदर्शनास आणली. मनसेचे बंडू देशमुख, संजय घुगे,अनिल गोधडे,उपविभाग अध्यक्ष रवी बागुल,विभाग अध्यक्षा विशाखा गोधडे,सिमा तिवारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बँक व्यवस्थापकाची भेट घेतली.
महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे महाराष्ट्र राज्यात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक सरकारी व खाजगी आस्थापनेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मराठी भाषा येणे अनिवार्य आहे
हिंदी भाषा बोलण्याची सक्ती करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल, ज्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी हिंदीत बोलण्याची सक्ती केली आहे त्यांच्यावर बँकेने त्वरित कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.
