बारामती : आजचा दिवस हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे माजी खासदार सुजय विखे- पाटिल आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांच्या बेताल वक्तव्यांनी चर्चेत राहीला… भिकारी, मालक अन् वेश्या अशा सुमार शब्दांची उधळण या तिन्ही नेत्यांनी केल्यामुळे समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांनी या तिघांनाही चांगलेच ट्रोल केले.
आज बारामतीतील एका कार्यक्रमात अजित पवार हे व्यासपीठावर भाषण करताना त्यांना एकामागोमाग एक अशी विविध निवेदने कार्यकर्त्यांकडून दिली जात होती. भाषणादरम्यान सतत येणारी निवेदने पाहून अजित पवार वैतागले अन् “मत दिलं म्हणजे तुम्ही माझे मालक नाही झाला” असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्याची खरडपट्टी काढली.
दुसरीकडे शिर्डीत मिळणाऱ्या साईंच्या भंडाऱ्यातील मोफत जेवणामुळे देशातील अवघ्या भिकाऱ्यांनी येथे गर्दी केली आहे. शिर्डीतील हे मोफत जेवण बंद केले पाहिजे अशी मागणी सुजय विखे यांनी केली.
तर मतदार संघाच्या दौऱ्यादरम्यान वादग्रस्त विधानासाठी प्रसिध्द असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी त्यांना गावात अपेक्षित मत न मिळाल्यामुळे आपली नाराजी व्यक्त करताना तुमच्यापेक्षा त्या वेश्या बऱ्या अशी टोकाची टिका केली.
या तिन्ही नेत्यांच्या अशा या बेजबाबदार वक्तव्यांमुळे सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी यांची चांगली चंपी केली.