अनिल ठाणेकर
विशाळगड आणि परिसरातील सामान्य जीवन पूर्ववत करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि समविचारी पक्ष व संघटना पुढे सरसावल्या आहेत.
जुलै २०२४ मध्ये विशाळगड आणि परिसरात जाणिवपूर्वक घडवून आणलेल्या संघटित हिंसाचाराने या परिसरातील समाजजीवन उध्वस्त झाले आहे. या परिसरातील नागरिकांचा काहीही गुन्हा नसताना गेले सहा महिने त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने बहिष्कार टाकण्यात आला आहे. इतके महिने ते जणू कैदेची शिक्षा भोगत आहेत. सर्व जातिधर्माच्या नागरिकांना देण्यात येणारी ही शिक्षा त्वरित थांबवली पाहिजे. या शिक्षेतून सुटका करून घेण्यासाठी कित्येक निरपराध नागरिकांना वडिलोपार्जित घरदार सोडून जावे लागत आहे. दैनंदिन गरजा भागविणे दुरापास्त झाले आहे. शिवप्रेमी आणि भाविकांचे पर्यटन हे आणि एकमेव हेच या परिसरातील काही हजार नागरिकांच्या उपजीविकेचे साधन आहे. या नागरिकांची जीवन वाहिनी असलेल्या पर्यटनावर बंदी घालून स्वतः शासनानेच या भारतीय नागरिकांचा संविधानाने दिलेला जगण्याचा मूलभूत अधिकार काढून घेतला आहे. हा संविधानाने दिलेला अधिकार पुन्हा प्रस्थापित करण्याची पहिली पावले म्हणून शासनाने नागरिकांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी मागणी माकप आणि समविचारी पक्ष, संघटना यांनी केली आहे. विलंब न करता विशाळगड पर्यटन सुरु करण्यात यावे. या परिसरातील दैनंदिन समाजजीवन पूर्ववत होण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत विशाळगडावर साजऱ्या होणाऱ्या सर्व समाजांच्या सण समारंभ उत्सवांत सर्वांना सहभागीहोण्याची मुभा असावी. १२-१३-१४ जानेवारी रोजी येणाऱ्या वार्षिक उरुसात सर्व भाविकांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात यावी. या उरुसात जिल्ह्यातील खासदार, मंत्री आणि सर्व आमदारांनी सहभागी होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने खास प्रयत्न करण्यात यावेत. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्ववत सुरु करावी. शालेय सहलींना त्वरित परवानगी देण्यात यावी. विशाळगडावर घालण्यात आलेली मांसाहार बंदी त्वरित उठवण्यात यावी.विशाळगड येथील प्राथमिक शाळेत सात इयतांसाठी फक्त तीन खोल्या आहेत. त्यातील एक खोली पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. त्याऐवजी पोलीस प्रशासनाने वेगळी व्यवस्था करावी, अश्या मागण्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
00000
