मुंबई : सदामंगल पब्लिकेशन या संस्थेतर्फे उद्या मुंबईत संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत भूपेश गुप्ता भवनात प्रज्ञा जांभेकर लिखित ‘यांत्रिकाच्या सावल्या’ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. हे एक कौटुंबिक चित्रण असलं तरी त्यात महाराष्ट्राचा औद्योगिक इतिहास, स्वातंत्र्यचळवळ, त्याकाळचे समाजजीवनाचं प्रतिबिंबही या पुस्तकात उमटलं आहे.
प्रज्ञा जांभेकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक, राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली, तसंच ज्येष्ठ पत्रकार, लेखक विनय हर्डीकर आणि सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यांत्रिकाच्या सावल्या या पुस्तकात किर्लोस्कर उद्योग समूहाचे पहिले महाव्यवस्थापक आणि एक संस्थापक शंभोराव जांभेकर आणि त्यांच्या पत्नी गंगाबाई, त्यांचे चिरंजीव आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते काॅम्रेड रामकृष्ण जांभेकर आणि त्यांच्या पत्नी काॅम्रेड सुहासिनी जांभेकर यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. या पुस्तकाबरोबरच प्रज्ञा जांभेकर यांच्या ‘ऑपरेशन एक्स’ या पुस्तकाच्या सुधारित तिसऱ्या आवृत्तीचं प्रकाशनही होईल.