माथेरान : माथेरानचा संपूर्ण भाग हा जंगलाने व्यापलेला असून यामध्ये काही प्रमाणात विषारी सापांचे प्रमाण असल्यामुळे थंडीच्या दिवसात हे साप कधी कधी चुकून घरामध्ये शिरतात. आणि या विषारी सापांपासून कुणालाही याची इजा पोहचू नये यासाठी सावधगिरी म्हणून नगरपरिषदेच्या माध्यमातून कार्यक्षम मुख्याधिकारी तथा उत्तम प्रशासक राहुल इंगळे यांच्या प्रयत्नांनी नागरिकांना मच्छर दाणीचे वाटप करण्यात आले.
काही दिवसापूर्वी येथील आर्या योगेश गोरे या सहावीत शिकणाऱ्या मुलीला घरात झोपेत असताना मन्यार जातीच्या विषारी सापाने पायाला दंश केला होता. त्यावेळेस तिला तातडीने मुंबईतील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब शर्तीचे प्रयत्न केल्यामुळे तिचे प्राण वाचले. त्यामुळे असा कठीण प्रसंग अन्य कुणावर येऊ नये. यासाठी सावधगिरी बाळगून प्रशासक राहुल इंगळे यांनी गावातील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले आहे.
परंतु सद्यस्थितीत सरसकट सर्वच लोक मोफत मिळणाऱ्या मच्छरदाणी घेण्यासाठी नगरपालिकेत धाव घेताना दिसत आहेत. गावातील ज्या व्यक्ती स्वखर्चाने या मच्छरदाणी विकत घेऊ शकतात त्यांनी या वाटपाचा लाभ न घेता जे खरोखरच गरजवंत आहेत त्यांनीच याचा लाभ घ्यावा जेणेकरून सर्व गरजवंतांना याचा फायदा होऊ शकतो असे नागरिकांमधून बोलले जात आहे.