रमेश औताडे
मुंबई : भारतात दरवर्षी कॅन्सरच्या १४ लाखांहून जास्त केसेस आढळून आल्या असून २०२५ पर्यंत त्यांची संख्या वाढून १५ लाखांवर पोहोचेल. यासाठी जनजागृती करण्यासाठी अपोलो कॅन्सर सेंटर मे जागतिक कॅन्सर दिवसाचे औचित्य साधून एक राष्ट्रव्यापी मोहीम सुरु केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
कॅन्सर हा एक अधिसूचित आजार म्हणून वर्गीकृत केला जावा. अशी मागणी ” युनिफाय टू नोटिफाय ” या मोहिमेमध्ये सरकारकडे करण्यात आली आहे. यावेळी
इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. घनश्याम दुलेरा
यांनी सांगितले की, राष्ट्रीय कॅन्सर रजिस्ट्री मध्ये भारतीयांमध्ये कॅन्सर केसेसची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारत ही जगाची ‘कॅन्सर कॅपिटल’ बनू शकते.
अपोलो हॉस्पिटल्स चे संचालक व वरिष्ठ तज्ञ डॉ.अनिल डिक्रुझ म्हणाले की, “कॅन्सरला एक अधिसूचित आजार बनवल्याने राज्यस्तरावर कॅन्सर बद्दल लोकांची समज बदलेल. तर अपोलो हॉस्पिटल चे विभागीय कार्यकारी अधिकारी अरुणेश पुनेथा म्हणाले की, यामुळे भारतातील कॅन्सर देखभाली संदर्भातील क्रांतिकारी बदल घडून येतील.
देशातील १५ राज्यांनी कॅन्सरला एक अधिसूचित आजार म्हणून आधीच घोषित केले आहे. तर जागतिक पातळीवर अमेरिका, इंग्लंड आणि वेल्स, स्कॉटलंड, डेन्मार्क, नॉर्डिक देश, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इज्राएल, क्युबा, प्युर्टो रिको आणि द गाम्बिया सहित १२ पेक्षा जास्त देशांनी अनिवार्य कॅन्सर रिपोर्टींगचे महत्त्व ओळखले आहे.
—–
आरटीई’ प्रवेशासाठी पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका – रोहन घुगे
ठाणे: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. पालकांना बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये, असे अवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया असून या प्रक्रियेत लॉटरी पध्दतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी व प्रतिक्षाधिन लाभार्थी यांची शाळानिहाय यादी घोषित केली जाते.गैरप्रकार निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक)/ प्रशासन अधिकारी मनपा/ नपा, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे (depmh2@gmail.com), आयुक्त (शिक्षण), पुणे (educommoffice@gmail.com) यांचेकडे ई-मेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदविण्यात यावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.ठाणे जिल्ह्यात कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी बालकांच्या पालकांनी सहकार्य करावे, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी आवाहन केले आहे.