Month: February 2025

मैन्युअल स्कैवेंजींग पूर्णपणे बंद करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेशाचे श्रमिक जनता संघातर्फे स्वागत – जगदीश खैरालिया

अनिल ठाणेकर देशाच्या सहा मेट्रोपॉलिटन शहरात मानवी मैला सफाई आणि सीवर चैम्बर्स माणसाकरवी करण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश नुकतेच २७ जानेवारीला सुप्रीम कोर्टाने दिले आहे. स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्षांनंतर देखील देशातील…

सेहचाळीस किलोच्या गांजासह सहा आरोपी अटकेत

मिरा  भाईंदर : भाईंदर येथील नवघर पोलिसांच्या धडक  कारवाईत सहा आरोपीना अटक करण्यात आली आहे. नवघर पोलीसांची गस्त सुरु असताना हे सहा आरोपी संशयास्पद स्थितीत फिरताना आढळले. यांच्या कडच्या तीन मोठ्या…

सुशिक्षित बेरोजगार सोसायटी यांना सक्षम करणार- शेखर निकम

केतन खेडेकर मुंबई : संपूर्ण राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांचे गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न लवकरच मार्गी लाऊन त्याना अधिक सक्षम करून त्यांचे माध्यमातून राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन चिपळूण संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी केले. राज्य बेरोजगार व स्वयंरोजगार फेडरेशन तसेच बृहन्मुंबई व मुंबई फेडरेशन यांचे वतीने नुकताच त्यांचा मुंबईत नरिमन पॉइंट येथील साखर भवन येथे मुंबई जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि बृहन्मुंबई बेरोजगार सेवा संस्थांचे मार्गदर्शक नंदकुमार काटकर यांचे हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. आज सातत्याने सरकार दरबारी या बेरोजगार संस्थांचे प्रश्न ते मांडत आहेत. नुकतेच त्यांनी राज्यातील या सेवा सोसायट्याना विना निविदा १० लाख रुपयांची कामे सरकार कडून देण्याचे आदेश ही मंजूर करून घेतले असून येणाऱ्या अधिवेशनात ही उर्वरित प्रश्नांबाबत आवाज उठविणार असल्याचे आश्वासन दिले आहे. सातत्याने सर्व खात्याच्या मंत्र्यांकडेही सदरच्या सेवा संस्थाना कामे उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करत असल्याने राज्यातील सर्व फेडरेशन च्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या  नेतृत्वाखाली राज्यातील पंजीकृत स्वयंरोजगार बेरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या प्रलंबित मागण्यांबाबत या बैठकीत चर्चा होऊन सेवा संस्थांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत मंत्री महोदयानी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या बैठकीस आमदार प्रसाद लाड, सचिव कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, सहकार आयुक्त, उपसचिव सार्वजनिक बांधकाम विभाग,  सिकंदर पटेल लातूर, शरद देवरे नाशिक, जनार्दन चांदणे ठाणे, सचिन कोल्हापुरे रत्नागिरी, समीर रजपूत औरंगाबाद, जयंत शिरीषकर, संजय कांबळे, श्रीनिवास देवरूखकर, विजय केदारे, स्मिता अंजर्लेकर मुंबई, स्वप्नील फाटक तसेच राज्यांतील जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष व संचालक यावेळी बहुसंखेने उपस्थित होते.

महापालिका, मेट्रो प्राधिकरण व वाहतूक पोलीसांच्या बैठकीत मान्सूनपूर्व कामांचा आढावा

ठाणे : मान्सूनपूर्व कामे वेळेत व्हावी व सर्व यंत्रणांचा परस्पर संबंध असावा, यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विभागांची बैठक आयुक्त दालनात आयोजित केली होती. महापालिका कार्यक्षेत्रात पावसाळ्यात खड्डयामुळे वाहतूक कोंडी होवू नये यासाठी रस्त्यांची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच खड्डे पडण्याची जी ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पाहणी करुन सर्व कामे ३० एप्रिलपर्यत करावीत, त्याचप्रमाणे मान्सून कालावधीत काही कारणास्तव खड्डे पडले तर ते तात्काळ दुरूस्त करण्यासाठी यंत्रणा सज्ज असेल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या.या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, वाहतूक  विभाग, मेट्रो प्राधिकरण, एमएमआरडीए आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महापालिका कार्यक्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांसंदर्भात नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सूचना करण्यात आल्या. त्या अनुषंगाने सर्व प्राधिकरणाने आपल्या अखत्यारितील कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत जेणेकरुन पावसाळ्यात कोणत्याही समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागणार नाही या दृष्टीने रहावे असे निर्देश आयुक्त श्री. राव यांनी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी ज्या ठिकाणच्या रस्त्यांवर, उड्डाणपुलावर खड्डे पडतात त्या ठिकाणी प्रभागसमिती निहाय कार्यकारी अभियंत्यांनी तेथे कॉक्रिटीकरण किंवा अत्याधुनिक पध्दतीने अधिक गुणवत्तापूर्वक काम होईल्‍ किंवा कसे हे पहावे. शहरात विविध ठिकाणी मेट्रो प्राधिकरणामार्फत सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच ज्या ज्या ठिकाणी डेब्रीज पडलेले आहे ते तात्काळ उचलून रस्त्याचा पृष्ठभाग समतोल करण्याच्या सूचनाही आयुक्त सौरभ राव तसेच मान्सूनच्या अनुषंगाने करावयाच्या कामांसाठी पाहणी करुन करावयाच्या कामांचा आढावा घेणे. ज्या ठिकाणी मेट्रोच्या स्टेशनची कामे सुरू आहेत, पैकी पूर्ण झालेल्या कामाच्या ठिकाणचे बॅरिगेट्स उचलण्यात यावे. माजिवडा, कासारवडवली, गायमुख, डोंगरीपाडा, आनंदनगर, ओवळा जंक्शन, वाघबीळ, कांचनपुष्प सोसायटी, हायपरसिटी मॉल, कासारवडवली फ्लायओव्हर  आदी ठिकाणी मेट्रोच्या गर्डरखाली काम पूर्ण होवून जेथे डेब्रीज पडलेले असल्याचे दिसून येते ते तात्काळ यावे,  तसेच मेट्रो मार्गावर उभारण्यात आलेल्या सर्व पिलरची पाहणी करुन ज्या ठिकाणी खड्डे असतील ते योग्य पध्दतीने बुजविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही आयुक्त श्री सौरभ राव यांनी या बैठकीत दिल्या. त्याचप्रमाणे तत्वज्ञान विद्यापीठ ते मानपाडा जंक्शन येथील सर्व्हिस रस्त्याचे डांबरीकरण करणे, दोस्ती ईम्पीरियासमोर पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्या.महापालिका कार्यक्षेत्रात नागरी विकासातंर्गत सुरु असलेली प्रकल्प कामे निधीअभावी पुर्णत्वास गेलेली नाही अशा कामांबाबतचा अहवाल संबंधित प्राधिकरणांनी तयार करावा. परिवहनमंत्री व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे आवश्यक निधीबाबत मागणी करुन सदरची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करता येईल असेही आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. एकूणच विविध प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व प्राधिकरणांनी समन्वयाने कामे करण्याचेही आयुक्त सौरभ राव यांनी सूचित केले.

ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने कुष्ठरोग शोध मोहीम सुरू

ठाणे : केंद्र शासनाने २०२७ पर्यंत कुष्ठरोग रुग्णांची संख्या शुन्य करण्याचे धोरण आखले आहे त्याअनुषंगाने आरोग्य विभागाच्यावतीने ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवरी या कालावधीत ठाणे जिल्हा ग्रामीण व शहरी विभागामध्ये कुष्ठरोग शोध मोहीम १४ दिवस राबवण्यात येणार आहे. कुष्ठरोग शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यासंदर्भांत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. गीता काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणेला निर्देशित केले आहे. समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरुग्णांचा शोध पथकांमार्फत घेवून त्याचे निदान निश्चित करणे व निदान झालेल्या कुष्ठरुग्णांना तात्काळ बहुविध औषधोपचार सुरु करण्यासाठी केंद्र शासनाने कुष्ठरोग अभियान सुरु केले आहे. ठाणे जिल्ह्यात एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२५ अखेर ७११ कुष्ठ रुग्णांची नोंद कुष्ठरोग विभागाने केली आहे. वेदना नसल्याने अनेकवेळा रुग्ण या आजाराकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळेत निदान करण्यासाठी कुष्ठरोग विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे तसेच नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचारांद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे. समाजात कुष्ठरोग विषयी जनजागृती करणे, हे या मोहिमेच मुख्य उद्दीष्ट आहे. या बाबत जिल्हा समन्वय समितीची सभा १३ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. तसेच आरोग्य कर्मचारी, आशा व स्वयंसेवक यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील मनुष्य बळाची माहिती घेवून त्यानुसार सूक्ष्म कृती आराखडा बनवुन त्याप्रमाणे कुष्ठरोग शोध मोहिमेचे नियोजन करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील २६ लाख ८४ हजार ८९४ तर शहरी भागातील १४ लाख ६४ हजार ०४१ निवडलेल्या जोखीम ग्रस्त भागातील एकूण ४१ लाख ४८ हजार ९३५ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे आणि मोहिमेचे सर्व स्तरावर प्रभावी संनियंत्रण व पर्यवेक्षण करण्यासाठी २ हजार ५३२ गटांकडून काम करण्यात येणार आहे. चौकट कुष्ठरोगाची लक्षणे :- कुष्ठरोग जिवाणूमुळे होणारा सांसर्गिक आजार आहे. अंगावर असणारा फिक्कट, लालसर रंगाचा बधिर चट्टा व हाता पायामध्ये अशक्तपणा येणे ही कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे आहेत.कानाच्या पळया जाड होणे व चेहरा लालसर, तेलकट व जाड होणे. त्वचेशी संलग्न मज्जा जाड व दुखर्‍या होणे कुष्ठरोग सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. कुष्ठरोगामुळे येणारी विकृती : Grade I विकृती : यामध्ये तळहाताला किंवा तळपायाला बधिरता येते. संवेदना नसल्याने गरम वस्तु पकडल्याने किंवा काही टोचल्याने तळ हाताला किंवा तळ पायाला जखमा पडु शकतात ज्या वर्षानुवर्षे बसत नाहीत.Grade II विकृती : या प्रकारच्या विकृती डोळ्यांनी दिसण्यासारखी असते जसे की हात पायाची बोटे वाकडी होणे, मनगट लुळे पडणे, पाय लुळा पडणे, तळहाताला तळपायाला जखमा पडणे, डोळ्यांच्या पापण्या पूर्णतः बंद न करता येणे अशा प्रकारच्या विकृती ग्रेड टु च्या कुष्ठरोगमध्ये येते कुष्ठरोग रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून अति जोखमीच्या भागात राहणार्‍या समाज घटकांना कुष्ठरोगाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे वाढदिवसानिमित्त ९ फेब्रुवारीला युवासेनेतर्फे राज्यभरात ‘कॉमन मॅन दिन’ – पुर्वेश सरनाईक

अनिल ठाणेकर शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश परिषा प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून युवासेनेतर्फे रविवार, ९ फेब्रुवारीला राज्यभरात ‘कॉमन मॅन दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील प्रत्येकी ६१ सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान युवासेनेतर्फे करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी युवासेनेतर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. यंदाच्यावर्षीही या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येत आहे. सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख संपूर्ण देशभरात पसरली. सुरुवातीला सीएम एकनाथ शिंदे अर्थात कॉमन मॅन आणि आता डिसीएम एकनाथ शिंदे अर्थात डेडीकेटेड टू कॉमन मॅन ही बिरुदावली जनतेने आपसूक  दिलेली आहे. शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणी, युवा वर्ग आणि विद्यार्थी या प्रत्येक समाजघटकासाठी अहोरात्र तत्पर राहण्याचे कार्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  सातत्याने करत आहेत. “सर्वसामान्यांचे हित सर्वतोपरी” हे ब्रीदवाक्य जोपासण्यासाठी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता बांधील आहे. याच जाणिवेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त ९ फेब्रुवारी हा दिवस ‘कॉमन मॅन दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या संकल्पनेव्दारे युवासेनेतर्फे राज्यभरातील ३६ जिल्ह्यातील ६१ ‘कॉमन मॅनचा’, सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या ६१ सन्मानमूर्तींमध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, लाडक्या बहिणी, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, असंघटीत कामगार, विद्यार्थी इत्यादी सर्वसामान्य नागरिकांचा समावेश असणार आहे. यावर्षीपासून प्रत्येक वर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस यापुढे महाराष्ट्रात ‘कॉमन मॅन दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन युवासेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस येत्या ९ फेब्रुवारी रोजी जल्लोषात साजरा होत असतानाच सामाजिक जाणिवेतून सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहण्याचा साहेबांचा आदर्श जोपासण्याचा निर्णय युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक आणि युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांच्यातर्फे घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या नियोजनासंदर्भातील विस्तृत माहिती युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

नाशिक महापालिकेवर तक्रारींचा भडीमार

अतिक्रमणांशी संबंधित सर्वाधिक तक्रारी हरिभाऊ लाखे नाशिक : शहरातील विविध समस्यांविषयी महापालिकेवर तक्रारींचा भडीमार होत असून इ कनेक्ट ॲपसह मुख्यमंत्री सचिवालय, विभागीय आयुक्त, आपले सरकार यावरून आतापर्यंत २६४४ तक्रारी आल्या आहेत. यातील जवळपास निम्म्या तक्रारी अतिक्रमणाशी संबंधित आहेत. महापालिकेच्या साप्ताहिक आढावा बैठकीत मुख्यमंत्री सचिवालय, पीएम पोर्टल, आपले सरकार, एनएमसी इ कनेक्ट ॲप या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारींची सद्यस्थिती मांडली गेली. महापालिकेच्या कामकाजात सुधारणा करून नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी कृती आराखडा करण्यात आला आहे. त्यात तक्रारींचा जलद निपटारा करण्यावर भर दिला गेला. नागरिक प्रामुख्याने इ कनेक्ट ॲपवरून तक्रारी करीत असल्याचे दिसून येते. या ॲपवरील तक्रारींची संख्या २५७७ इतकी आहे. यात अतिक्रमणशी संबंधित १२६८, घनकचरा व्यवस्थापन २५२, मलनिस्सारण १७७, उद्यान ८५, नगर नियोजन १७७, झोपडपट्टी ६६, सार्वजनिक बांधकाम १८३ या विभागांशी संबंधित तक्रारींची संख्या अधिक आहे. संबंधित विभागांना तक्रारींचा मुदतीत निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, इ कनेक्ट ॲपवर तक्रारींवरील कार्यवाहीची माहिती द्यावी लागते. कधीकधी मोघम उत्तर वा कारवाई दर्शवत तक्रारी बंद केल्या जातात. अथवा तक्रार अन्य विभागाशी संबंधित असल्याचे सांगून टोलवाटोलवी होते, असे तक्रार करणाऱ्या नागरिकांचे म्हणणे असते. विभागीय कार्यालयांविषयी तक्रारी मुख्यमंत्री सचिवालयाकडील १०, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून एकूण १७, पीजी पोर्टलवरील १२, आपले सरकार पोर्टलवरून २८ तक्रारी आल्याची माहिती बैठकीत मांडली गेली. यात नगरनियोजन, अतिक्रमण, शिक्षण, भूसंपादन, विभागीय कार्यालये, उद्यान आदी विभागांशी तक्रारींचा समावेश आहे. यामध्ये विभागीय कार्यालयांशी संबंधित सुमारे २५ तक्रारी आहेत. विभागीय कार्यालयांचे कामकाज कर्मचाऱ्यांच्या लहरींवर चालते. स्वागत कक्षात जबाबदारी सांभाळणारे कर्मचारी कार्यालयीन वेळेत अंतर्धान पावतात. कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी अकस्मात भेटीचे सत्र सुरू केल्यामुळे या प्रकारांना काहीअंशी आळा बसत आहे.

दहावी-बारावी परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांच्या अदलाबदली आदेश रद्द

शिक्षक, मुख्याध्यापकांना मोठा दिलासा कल्याण :   मध्ये होत असलेल्या दहावी बारावी परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांच्या अदलाबदली आदेश रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शिक्षण बोर्डाने घेतला आहे. यासंदर्भात राज्य…

भाजपतर्फे  नागरी सुविधा शिबिराचे आयोजन

ठाणे : भारतीय जनता पक्षाच्या वतीने रामचंद्र नगर परिसरातील जनतेसाठी नागरी सुविधा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या शिबिराचा शुभारंभ आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि भाजपचे ठाणे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या शिबिराच्या मुख्य संयोजिका ठाणे शहर भाजपच्या सरचिटणीस डॉ समीरा भारती म्हणाल्या, केंद्र शासनाने नागरिकांसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिलेल्या निर्देशानुसार जनतेच्या दारात जाऊन त्यांना नागरी सुविधा देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नविन मतदार नोंदणी, मतदार कार्डात पत्ता बदल, नविन आधारकार्ड किंवा त्यात काही बदल असतील ते, पोस्ट खात्याचा अवघ्या ५४९ रुपयांचा १० लाख रुपयांचा अपघात विमा, जेष्ठ नागरिक ओळखपत्र आणि अधिवास दाखला-डोमीसाईल सर्टिफिकेट नागरिकांना करुन घेता येणार आहे. २ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या शिबिराचा नागरिकांनी अवश्य फायदा घ्यावा. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी भाजप ठाणे शहर चिटणीस ऍड तृप्ती जोशी,  लोकमान्य-सावरकर नगर मंडळ अध्यक्ष निलेश पाटील, आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत पडवळ  विशेष परिश्रम घेत आहेत.यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४  परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज – डॉ. सुवर्णा खरात

अशोक गायकवाड मुंबई : येत्या २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज असून उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.डॉ. खरात म्हणाल्या की, २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४’ या परीक्षेच्या पूर्वीच प्रश्नपत्रिकांची उपलब्धता करुन देण्यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत. सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत आणि अशा कोणत्याही माहितीमध्ये तथ्य नाही. काही भ्रमणध्वनी क्रमांकांवरून उमेदवारांना प्रश्नपत्रिका मिळवण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस आयुक्त, पुणे यांच्या तर्फे या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारांना अशा प्रकारचे दूरध्वनी आल्यास, त्यांनी contact-secretary@mpsc.gov.in या ईमेलवर तक्रार नोंदवावी. महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी २ लाख ८६ हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त आणि व्यवस्था ठेवण्यात आली असल्याचेही डॉ खरात यांनी यावेळी सांगितले.