वसई:- वसई-विरारच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी बहुजन विकास आघाडी, काँग्रेस व मनसे यांच्यातील आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असून ११५ जागांच्या वाटपाचा ही तिढा सुटला आहे. यात बविआ १०५, काँग्रेस ८ आणि मनसे २ जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी ज्याप्रमाणे भाजप आणि सेनेत महायुती झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), मनसे यांच्यात आघाडी होण्याबाबत वाटाघाटी सुरू होत्या. मात्र ११५ जागांमध्ये शिवसेना ठाकरे गटाला अपेक्षित जागा मिळत नसल्याने त्यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उर्वरित तिन्ही पक्षात एकजूट होईल की नाही याबाबत चर्चा सुरू होती.
अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी बविआ, काँग्रेस, आणि मनसे यांच्यात एकमत होऊन आघाडी करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याशिवाय ११५ जागा आहेत त्यांचे वाटपही जवळ निश्चित झाले आहे. यात बविआ १०५, काँग्रेस ८ तर मनसे २ अशा जागांवर निवडणूक लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेसला अधिकच्या जागा मिळाव्यात यासाठी अजूनही आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला ज्या जागा मिळाल्या आहेत त्या बहुतांश जागा वसई विधानसभा मतदार संघातील आहेत असे काँग्रेस नेते विजय पाटील यांनी सांगितले आहे. आम्ही बविआकडे सन्मानजनक जागांची मागणी केली होती. आता दोन जागेचा तिढा सुटला असून प्रभाग १९ आणि २१ मधून आमचे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. यातील प्रफुल्ल पाटील यांचा प्रभाग २१ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे मनसेचे जयेंद्र पाटील यांनी सांगितले.
आमची आघाडी झाली असून ११५ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याचे बविआचे प्रवक्ते अजीव पाटील यांनी सांगितले.
