आशासेविकांसाठी मतदार जनजागृतीकरिता विशेष बैठक
मिरा – भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५–२६ जाहीर झाली असून मतदान दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महानगरपालिका SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) अभियान राबविण्यात येत आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध स्तरांवर जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून, दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता, भाईंदर सेकंडरी स्कूल, भाईंदर (पश्चिम) येथे आशासेविका यांच्यासाठी मतदार जनजागृतीसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत यांनी या बैठकीत मतदानाचे महत्त्व, मतदार म्हणून असलेली प्रत्येकाची जबाबदारी, तसेच नागरिकांपर्यंत मतदानाविषयी योग्य माहिती पोहोचविण्याची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांच्या माध्यमातून मतदार जनजागृती अधिक प्रभावीपणे पोहोचू शकते, या उद्देशाने सदर बैठक घेण्यात आली. बैठकीस २०० च्यावर आशासेविका उपस्थित होत्या. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करावे, हा संदेश SVEEP अभियानाच्या माध्यमातून महानगरपालिकेमार्फत सातत्याने दिला जात आहे.
