100 टक्के वेबकास्टिंगची तयारी
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 संदर्भातील उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया 31 डिसेंबर रोजी पूर्ण झाली असून पुढील निवडणूक कामकाजाच्या तयारीचा सविस्तर आढावा महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी घेतला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
बैठकीस राज्य निवडणूक आयोगामार्फत नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक तथा महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भाऊसाहेब दांगडे उपस्थित होते. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निर्णय अधिकारी व विभाग अधिकारी यांना महत्त्वाच्या निवडणूक कामकाजांबाबत मार्गदर्शन केले. निवडणूक चिन्ह वाटप, अंतिम उमेदवार यादी प्रसिद्धी, मतपत्रिका छपाई, मतदान अधिकारी प्रशिक्षण, ईव्हीएम हाताळणी, स्ट्रॉंगरूम व्यवस्था आदी नियोजनावर त्यांनी भर दिला. मतमोजणी दुसऱ्याच दिवशी होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या नेमणुका व प्रशिक्षण तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
आयुक्त डॉ. शिंदे यांनी आठही विभागांतील मतदान केंद्रांची तयारी तपासली. तात्पुरत्या मतदान केंद्रांना पावसाच्या पार्श्वभूमीवर वॉटरप्रूफ करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अतिरिक्त ईव्हीएम मशिनची व्यवस्था करून त्याचे प्रशिक्षण मतदान कर्मचाऱ्यांबरोबरच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही देण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदा बहुसदस्यीय प्रभागासाठी प्रथमच मतदान होत असल्याने जनजागृती वाढवण्यासाठी विविध माध्यमांतून प्रचार वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व मतदान केंद्रांचे GPS टॅगिंग, मोठ्या मतदान केंद्रांवरील पार्किंग व्यवस्था, तसेच नवी मुंबईतील 100 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्याबाबत तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले. संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असून प्रत्येक विभागात मॉडेल पोलिंग स्टेशन उभारण्याचे निर्देश देण्यात आले. जाहिरातींसाठी जागा व मैदान उपलब्धतेत सर्वांना समान संधी देण्याचे तत्त्व अंगीकारण्याचे निर्देश देण्यात आले. जाहिरात फलकांवर जिओ-टॅगिंग पद्धत राबविणे आणि मतदारांना मतदान चिठ्ठ्या बीएलओमार्फत वितरित करण्याची कार्यवाही सुरू करण्यास सांगण्यात आले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, डॉ. राहुल गेठे, निवडणूक उपआयुक्त भागवत डोईफोडे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे तसेच विविध नोडल अधिकारी उपस्थित होते. एकूणच, नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक सुसंघटित व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *