स्व. उमेश शेणॉय चषक राज्यस्तरीय कुमार कबड्डी स्पर्धा

श्री स्वामी समर्थ, सिद्धार्थ मंडळ उपांत्यपूर्व फेरीत दाखल.

मुंबई : श्री स्वामी समर्थ, सिद्धार्थ मंडळ यांनी अमरहिंद मंडळ आयोजित स्व. उमेश शेणॉय चषक राज्यस्तरीय कुमार कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. दादर (प.) येथील अमर हिंद मंडळाच्या मैदानावर सुरु असलेल्या कुमारांच्या उपउपांत्यपूर्व फेरीत ठाण्याच्या श्री स्वामी समर्थ मंडळाने अतितटीच्या लढतीत पालघरच्या इच्छाशक्ती मंडळाला ४०-३८ असे चकवीत आगेकूच केली. पूर्वार्धात पहिला लोण देत स्वामी समर्थने २२-१३ अशी आश्वासक आघाडी घेतली. त्यामुळे उत्तरार्धात आहे, ती आघाडी टिकविण्यावर भर देण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्री स्वामी समर्थ मंडळावर हा डाव उलटणार होता. उत्तरार्धात इच्छाशक्तीने टॉप गिअर टाकत श्री स्वामी समर्थ मंडळावर दोन लोण देत सामन्याची उत्कंठा शिगेला नेली. पण सामना काय आपल्या बाजूने झुकविता आला नाही. अखेर श्री स्वामी समर्थ मंडळाने २ गुणांनी बाजी मारत सुटकेचा निःश्वास सोडला. विवेक शिंदे, दवान चव्हाण यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. इच्छाशक्तीकडून अनुप मिश्रा, प्रेम जाधव यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कडवी लढत देत कबड्डीरसिकांना सामन्यात खिळवून ठेवले.

दुसऱ्या उपउपांत्यपूर्व सामन्यात उपनगरच्या सिद्धार्थ मंडळाने मुंबईच्या जय भारत या बलाढ्य संघाला ४४-३५ असे नमवत आपली घोडदौड कायम राखली. विश्रांतीला १९-१३ अशी आघाडी घेणाऱ्या सिद्धार्थने विश्रांतीनंतर देखील आपले वर्चस्व कायम राखत ९ गुणांनी विजय मिळविला. नरेश चौहान, संकेत यादव यांच्या नेत्रदीपक चढायांना अमित ब्रीद, करण मरानो यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे त्यांनी ही किमया साधली. आर्यन बावडेकर, अथर्व कदम, श्रेयस मटकर यांनी जय भारतचा पराभव टाळण्याचा निकराचा प्रयत्न केला. पण त्यात ते अपयशी ठरले.

या अगोदर झालेल्या साखळी लढतींचा संक्षिप्त निकाल-

१)अ गट :- अमर मंडळ (मुंबई) वि. वि. श्रीराम विश्वस्त (मुंबई) -३५-३३,

२)ब गट :- ग्रीफिन्स जिम. (ठाणे) वि. वि. नवोदित संघ (मुंबई) – ४९-४४,

३)ड गट :- इच्छाशक्ती(पालघर) वि. वि. साऊथ कॅनरा (मुंबई) – ४५-२९,

४) इ गट :- कुर्डाई (पालघर)वि. वि. विजय क्लब (मुंबई) – ४२-२७,

५) फ गट :- जय भारत (मुंबई) वि. वि. आकांक्षा (मुंबई) – ४०-१५.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *