अपक्ष उमेदवाराकडून आचारसंहितेचा भंग
निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी
दिवा: ठाणे महानगरपालिका निवडणुकीत दिवा प्रभाग क्रमांक २७ (क) मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सीमा गणेश भगत यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला असून, याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे.
सीमा गणेश भगत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला असतानाही, त्यांच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रचार पत्रिकेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगीराज यांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. विशेष म्हणजे, त्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार नसताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, निवडणूक आयोगाकडून सीमा भगत यांना “हेलिकॉप्टर” हे निवडणूक चिन्ह देण्यात आले असून, ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरण्यात येत आहे. सदर प्रकार हा निवडणूक आचारसंहिता व निवडणूक नियमांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित प्रचार साहित्य जप्त करावे, आचारसंहितेचा भंग सिद्ध झाल्यास सीमा गणेश भगत यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारचा प्रचार त्वरित थांबवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही मूल्ये जपण्यासाठी निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
