सिध्देश शिगवण

ठाणे : गेली 25 वर्षं ठाणेकरांनी ठाणे शिवसैनिकांकडे दिलं होतं, गद्दाराकडे दिलं नव्हतं, गद्दारी गाडण्याची ही शेवटची संधी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. ठाण्यात आयोजित संयुक्त सभेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महुयतीविरोधात एल्गार पुकारला. महापालिका निवडणुकीतील पैसे वाटप, राज ठाकरेंसोबत झालेली युती आणि भाजपचे के अण्णामलाई यांच्या वक्तव्यावरुन भाजपसहीत शिंदेंवरही हल्लाबोल केला.

गेली 25 वर्षे मुंबईकरांनी मुंबई शिवसेनेकडे दिलं, ठाणे शिवसेनेकडे दिलेलं, गद्दाराकडे दिलं नव्हतं. हा गद्दार निघेल तुम्हाला माहिती नव्हतं, मलाही माहिती नव्हतं. तुम्ही फसलात मी देखील फसलो, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मनसेच्या उमेदवारांना कोट्यावधीची आमिष दाखवली गेली जी त्या उमेदवारांनी धुडकावल्याचा दाखला दिला होता. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले उमेदवारांनी निष्ठा दाखवित आमिष नाकारली आता मतदारांची जबाबदारी आहे. कल्याणमध्ये घराघरात पैशाची पाकिटं जात आहेत, निवडणूक संपलीय नेमणुका सुरु झाल्या आहेत. आपण मतदान करतोय म्हणजे सरकार निवडतोय असं वाटत पण कदाचित शेवटची निवडणूक असेल. यापुढं देशाचे पंतप्रधान देश चालवतील असं वाटत नाही, राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालवतील असं वाटत नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

आम्ही दोन भाऊ 20 वर्षांनी एकत्र आलो आहोत. आमची युती जागावाटपासाठी झालेली नाही. मराठी माणूस जागा करण्यासाठी युती झालेली आहे. आपण सर्वजण एक मातीची लेकरं आहोत. आमचा विरोध दुसऱ्या भाषेला विरोध नाही. आमच्या घरात घुसून दादागिरी करणाऱ्यांना उत्तर दिलं नाही तर शिवाजी महाराजांचं  नाव कसं घ्यायचं. आम्ही सहनशील आहोत, सगळ्यांना आपलं मानत आलो. दादागिरी करणाऱ्यांना कानफाटा असं म्हटलं तर काय चुकलं, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

ज्या माणसानं शिवसेनेशी गद्दारी केली, तोच माणूस ठाण्याशी गद्दारी करतोय. हजार एकर जमीन त्यांनी देऊन टाकली. बाहेर पडल्यावर बावनकुळे म्हणतात या व्यव्हाराबाबत माहिती नाही. मी मुख्यमंत्री असताना वनजमीन कोणत्या उद्योगपतीला दिली नव्हती. माझ्या काळात जेवढी जंगलं वाढवली तेवढं कोणीच केलं नसेल असा दावाही ठाकरेंनी यावेळी केला.
कोस्टल रोड आपण केलेला आहे, मुंबईकरांच्या पैशातून केला आहे, त्याचं श्रेय ते घेत आहेत. हिंदूह्रदयसम्राट आपला दवाखाना ही योजना आपली होती. सरकार पाडलं आणि फित कापली. फित कापली ती कापली ठाण्यात काय झालं, ठाण्यात आपला दवाखान्यात गद्दारांनी साड्यांचं दुकान काढलं. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आत गेलो तर साड्या, नेसवा त्या गद्दाराला आणि त्याची धिंड काढा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *