आज सकाळीच एका वृत्तपत्रात ठाण्यातल्या कौस्तुभ साठे यांच्या आगळ्यावेगळ्या सह्यांच्या संग्रहाबाबत वाचण्यात आले. कौस्तुभने आतापर्यंत ४५०० मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्या असून त्या व्यवस्थित जतन केले आहे. अजूनही अशा स्वाक्षऱ्या गोळा करणे हे सुरूच आहे. हा एक आगळावेगळा संग्रहच म्हणावा लागेल.
यावरून मला आठवले की खूप वर्षांपूर्वी मला साताऱ्याहून एका प्राध्यापकाचे पत्र आले होते. त्यांचा देखील असाच स्वाक्षऱ्या जमवण्याचा छंद आहे. त्यांनी अनेक मान्यवर साहित्यिकांच्या अशा स्वाक्षऱ्या गोळा केल्या असून त्याची ते प्रदर्शने देखील आयोजित करीत असतात. २०१२ मध्ये मी संपादित केलेल्या “मराठी वांङमय व्यवहार: चिंतन आणि चिंता” या पुस्तकाला राज्य शासनाचा रा.ना. चव्हाण उत्कृष्ट संपादित ग्रंथ पुरस्कार मिळाला होता. हा ग्रंथ या प्राध्यापकांच्या महाविद्यालयाच्या वाचनालयात पोहोचला, आणि तिथे त्यांनी तो पाहिला. तो बघून त्यांनी मला पत्र पाठवले होते. सोबत लिफाफ्यात एक वेगळा कागद पाठवून त्यावर माझी स्वाक्षरी देखील त्यांनी मागवून घेतली होती. अशा मान्यवर साहित्यिक आणि साहित्य प्रेमाच्या स्वाक्षऱ्या आपण गोळा केल्या असून अजूनही आपण अशा स्वाक्षऱ्या जमवतो हे त्यांनी सांगितले होते. त्यांचा हा संग्रह बघून त्याचे प्रदर्शन नागपुरात आयोजित करावे असा मी विचारही केला होता. मात्र तो फलद्रूप झाला नाही.
असाच आगळावेगळा संग्रह करणारा माझा पत्रकारितेतील सहकारी महेश उपदेव हा आहे. महेश हा दैनिक सामनाचा विदर्भातील प्रतिनिधी आहे. महेशला पेन गोळा करण्याचा छंद असून त्याने आतापर्यंत ९००० पेक्षा जास्त वेगवेगळे पेन गोळा केलेले आहेत. त्याच्याजवळ पाच रुपयाच्या पेन पासून तर ८००० रुपयांच्या पेन पर्यंत वेगवेगळे पेन जमा आहेत.
महेश आज साठीला पोहोचला आहे. त्याने शाळेत शिक्षण सुरू केले तेव्हा दौत टाकाचा जमाना होता. त्यामुळे त्याने मुळाक्षरे गिरविली ते दौतीतल्या शाईत टाक बुडवून त्याने वहीवर अक्षरे काढत. त्यावेळी पेन हा फक्त वडीलधाऱ्यांच्या खिशाला असायचा. तो बघून आपल्या जवळही असे चांगले पेन असावे अशी इच्छा महेशला झाली. त्यातूनच त्याला असे पेन जमवण्याचा छंद लागला. त्याच्या वडिलांनी त्याला पहिला पेन तीन किंवा चार रुपयांचा खरेदी करून दिला होता. तो एबोनाईटचा पेन होता. तेव्हापासून महेश असे पेन जमवायला लागला. आणि आज लवकरच त्याचा संग्रह दहा हजारावर जाईल अशी त्यालाही आशा आहे.
महेशच्या या पेन जमावण्याच्या छंदाबाबत अनेकांना माहिती कळली. तेव्हा लोक आवर्जून त्याच्यासाठी काही वेगळे पेन दिसले तर घेऊन येत असतात. मला आठवते २०१२ मध्ये मी हैदराबादला गेलो होतो. तिथे एका दुकानात मला एबोनाइटचे पेन दिसले. मी आवर्जून महेशसाठी एक इंक पेन आणि एक बॉल पेन विकत घेतला होता. फक्त मीच नाही तर अनेक मान्यवरांनी देखील त्याच्या या संग्रहाला हातभार लावला आहे. मुख्यमंत्री मनोहर जोशी चीनला गेले असताना त्यांना काही वेगळे पेन दिसले. त्यांनी आवर्जून महेश साठी एक वेगळा पेन आणला. तसेच राज्यसभा सदस्य आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे प्रबंध संचालक विजय दर्डा यांनी अमेरिकेतून महेश साठी पेन आणला होता. नागपूरचे एक मंत्री अनिल देशमुख यांनी देखील महेश साठी असे वेगवेगळे पेन आणले होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे देखील महेश साठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले की आवर्जून तिथले पेन आणतात. इतरही अनेक मान्यवरांनी महेशच्या या शब्दाला छंदाला हातभार लावला आहे.
कौस्तुभ साठे किंवा महेश उपदेव यांच्यासारखे अनेक छंदवेडे आपल्याला अवतीभवती दिसतात. कोणी पोस्टाचे नवे तिकीट विकत घेऊन जमवतो, कोणी परदेशातली तिकिटे जमवतो, तर कोणी रेल्वेची तिकिटे जमवते. अशाच एका छंदवेड्या व्यक्तीजवळ मी बरीच जुनी रेल्वेची तिकिटे पाहिलेली आहेत. आणखी एक छंदवेडा हा विविध देशातील आणि विविध काळातील चलनी नाणी जमवत असतो. त्याच्याजवळ अगदी शिवकालीन नाण्यांपासून सर्व काही संग्रह आहे. तर विविध पुस्तके जमवण्याचा छंद अनेकांना आहे. त्यांच्याजवळ अशी विविध लेखकांची विविध पुस्तके तुम्हाला सापडतील.
या अशा अनेक छंदवेड्यांना जनसामान्यांकडून छंदिष्ट म्हणून हिणवले जाते. मात्र त्यांनी जमवलेला हा एक अमूल्य साठा असतो. त्याचे मोल लोकांना आज कळणार नसेलही. मात्र दीर्घ काळानंतर त्याचे मूल्य काही वेगळेच असते. ते मूल्य आपण समजून घ्यायला हवे. तरच आपण कौस्तुभ साठे किंवा महेश उपदेव सारख्यांचे मनमोकळे कौतुक करू शकू.

अविनाश पाठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *