२८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. त्यांच्यासारखा विकासाची दृष्टी असलेला नेता विमान अपघाताने हिरावून घेतल्याने महाराष्ट्र काही वर्ष मागे गेला. त्यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे. अर्थात विमान अपघातात मृत्यू झालेले अजितदादा हे पहिले नेते नाहीत याआधीही अनेक नेत्यांना विमान अपघाताने हिरावून नेले आहे. मागील वर्षी जून महिन्यात सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेने निघालेले बोईंग ७८७ – ८ हे विमान उड्डाणानंतर अवघ्या ३१ सेकंदात मेघानीनगर येथील नागरी वस्तीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह २७५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या भीषण अपघाताने देखील सर्वांचेच मन हेलावले होते. हे विमान बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळल्याने त्या हॉटेलमधील ३४ विद्यार्थ्यांचाही दुर्दैवी अंत झाला होता. दोन वर्षापूर्वी जेजू एअरचे बँकॉक ते मुआन या मार्गावरचे विमान कोसळून भीषण अपघात झाल होता. या अपघातात विमान भस्मसात होऊन १७९ प्रवाशी दगावले होते. २०२३ साली ऐन संक्रातीच्या दिवशी नेपाळमध्ये एक मोठी दुर्घटना घडली होती. नेपाळमधील प्रमुख शहारांपैकी एक असलेल्या पोखर या शहराजवळ एक प्रवाशी विमान कोसळून झालेल्या अपघातात ६० हुन अधिक प्रवाशांचा दुःखद अंत झाला होता. अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात हा विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. अजितदादांच्या विमानाला झालेल्या अपघाताचे कारण शोधण्याची विनंती महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. या अपघाताची सखोल चौकशी लवकरच होईल आणि त्यात या अपघाताचे खरे कारण समोर येईल. बहुतेक विमान अपघात हे खराब हवामानामुळेच झाल्याचे सिद्ध झाले आहे. खरे तर उड्डाणापूर्वी प्रत्येक वैमानिकाला हवामानाचा अंदाज सांगितला जातो. या आधारावर तो आपली रणनीती ठरवत असतो. या विमानाचे सारथ्य करणारे वैमानिक आणि सहवैमानिक दोघेही अनुभवी होते. त्यामुळे त्यांच्याकडून चूक झाली असावी असे वाटत नाही अर्थात विमान अपघातात केवळ वैमानिकाचीच चूक असते असे नाही. पक्षी विमानाला धडकून अपघात झाल्याच्याही अनेक घटना घडल्या आहे. ऐनवेळी इंजिनमध्ये बिघाड झाल्याने अपघात होतात. वातावरणात बदल झाल्यानेही अपघात होतात. वातावरणाची दृश्यमानता अचानक कमी होऊन अपघात घडल्याच्याही घटना घडल्या आहेत.
वातावरणाची दृष्यमानता कमी असेल तर वैमानिक उड्डाण करत नाहीत. अर्थात पर्वतीय भागात दृष्यमानता कमी असतेच. डोंगराची कमी, जास्त उंची असल्याने आणि सतत बदलणारे हवामान, धुके यामुळे अपघात होण्याची शक्यता असते मात्र अलीकडे अद्ययावत संगणक प्रणाली असल्याने विमान किती उंचावरून जात आहे. हवामानात काय बदल घडत आहे याचा अंदाज वैमानिकांना येतच असतो तरीही काही वैमानिक अतिआत्मविश्वासाने विमान उड्डाण करतात. हवामानाची पर्वा न करता स्वतःसह प्रवाशांचा जीव धोक्यात घालतात. तांत्रिक कारण, खराब हवामान, पक्षाची धडक कारण काहीही असले तरी विमान अपघातात ज्या प्रवाशांचा जीव जातो तो मात्र परत येत नाही. अलीकडे विमान अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे. १९७० पासून आजवर ११ हजारांहून अधिक लहानमोठे विमान अपघात झाले असून त्यात ८३ हजारांहून अधिक प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत. हा आकडा चिंताजनक आहे. आपल्या देशातही विमान अपघातात अनेक लोकांना जीव गमावावा लागला आहे. त्यात अनेक राजकीय आणि महनीय व्यक्तींचा समावेश आहे. काँग्रेस नेते संजय गांधी, माजी केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया, लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष आणि तेलगु देसमचे नेते जी एम सी बालयोगी, मेघालयाचे ग्रामीण विकास मंत्री सायप्रियम संगमा, हरियाणाचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश जिंदाल, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी हे त्यातील काही महत्वाची नावे आहेत. त्यात आता अजितदादा पवार यांच्या नावाचीही भर पडली आहे. चार वर्षापूर्वी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ( सिडीएस ) जनरल बिपीन रावत यांचे एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. विमान अपघातात अशा मोठ्या व्यक्तींचे निधन होणे ही देशाची मोठी हानी आहे. केवळ मोठे सिलिब्रेटीच नव्हे तर सर्वसामान्य प्रवाशांचा जीव देखील तितकाच महत्वाचा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकांसाठी तर विमान प्रवास हे स्वप्न असते आणि जर असे अपघात झाले तर त्या स्वप्नांचीच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचीच राखरांगोळी होते त्यामुळे असे अपघात होणार नाही याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यायला हवी.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *