त्या चार जागांवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता
पक्षाचा आदेश न मानणाऱ्या ठाकरे गटातील त्या चार नगरसेवकांविरोधात पक्ष आक्रमक
बेपत्ता ४ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
कल्याण : पक्षाचा आदेश न मानणाऱ्या ठाकरे गटातील त्या चार नगरसेवकांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून, बेपत्ता ४ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बाळा परब, गटनेते उमेश बोरगावकर आणि पक्ष प्रतोद संकेश भोईर यांनी दिली. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील त्या चार प्रभागांत पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले. मात्र निवडून आल्यापासून कल्याण मधील मनसेतून ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक राहुल कोट आणि नगरसेविका स्वप्नाली केणे या नॉटरिचेबल आहेत. तर शिवसेना शिंदे गटातील ठाकरे गटातून निवडून आलेले मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे नगरसेवक देखील बेपत्ता आहेत. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना पक्षाच्या बैठकीला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र या बैठकीला आणि कोकण विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणीला देखील हे चारही नगरसेवक गैरहजर राहिल्याने ठाकरे गटाने त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
याबाबत आज कल्याणच्या शिवसेना शहर शाखेमध्ये नगरसेवक आणि शहर प्रमुख यांच्यासोबत बैठक पार पडली. जे चार नगरसेवक मशाल चिन्हावर निवडून आले आहेत मात्र त्यांना व्हीप मान्य नाही अशा चारही नगरसेवकांवर कारवाई करणार असून या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केले असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बाळा परब, केडीएमसीचे गटनेते उमेश बोरगावकर, पक्ष प्रतोद संकेश भोईर यांनी दिली.
