Month: January 2026

ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्सची विजेतेपदाची हॅटट्रिक

ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्सची विजेतेपदाची हॅटट्रिक ठाणे: ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आयोजित सब ज्युनिअर गटाच्या ठाणे जिल्हा अजिंक्यपदाच्या मैदानी स्पर्धेत तीन नवीन जिल्हा विक्रमासह ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्स संघाने सर्वसाधारण…

ग्राहकांची ऑनलाईन तक्रार प्रक्रिया ठप्प

ग्राहकांची ऑनलाईन तक्रार प्रक्रिया ठप्प रमेश औताडे मुंबई : कंझ्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडिया या नामांकित स्वयंसेवी संस्थेची ग्राहकांसाठी हेल्पलाईन सेवा सध्या खंडित झाल्याने नागरिकांना ऑनलाईन तक्रार नोंदवता येत नाही.…

 कुंभार समाजासाठी इलेक्ट्रिक चाक प्रशिक्षण व वाटप कार्यक्रम संपन्न

कुंभार समाजासाठी इलेक्ट्रिक चाक प्रशिक्षण व वाटप कार्यक्रम संपन्न पनवेल: तुपगाव येथील  संत गोरोबा काका मंदिरात खादी ग्रामोद्योग मुंबई व कुंभार समाज सामाजिक संस्था जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभार काम प्रशिक्षण व इलेक्ट्रिक चाक वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा उपक्रम कुंभार समाज सामाजिक संस्था जिल्हा अध्यक्ष अनंत महाडकर व जिल्हा कार्यकारिणी सदस्य रामदास साळवी यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला. कार्यक्रमास खादी ग्रामोद्योग मुंबईचे अधिकारी अरुण कुमार प्रमुख उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत कुंभार समाजातील २० लाभार्थ्यांची इलेक्ट्रिक चाकांसाठी निवड करण्यात आली आहे. प्रथम सर्व इलेक्ट्रिक चाकांचे पूजन करण्यात आले. या लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक चाक वापरासंदर्भात १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना इलेक्ट्रिक चाकांचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय, यापूर्वी पार पडलेल्या ३० दिवसांच्या माती काम प्रशिक्षणातील लाभार्थ्यांना शासनाकडून प्राप्त प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मुंबईचे अरुण कुमार,  ग्रामसेवक विश्वास वारे, कुंभार समाज रायगड जिल्हा अध्यक्ष अनंत महाडकर व जिल्हा सचिव रामदास साळवी यांनी इलेक्ट्रिक चाक योजनेविषयी माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास  उमेश मळवी (दादाजी फाउंडेशन, नाशिक), वसंत महाराज कुंभार (रायगड भूषण), नंदकुमार चिरनेरकर (जिल्हा उपाध्यक्ष), रविंद्र कुंभार , रमेश दहिवलीकर (जिल्हा कार्याध्यक्ष), दिलीप साळवी (जिल्हा सचिव), मधुकर कुंभार (जिल्हा महासचिव),  पनवेल तालुका अध्यक्ष बजरंग भागवत, भरत आपटेकर,  राजेंद्र साळवी,  वसंत कुंभार,  प्रविण कुंभार,  संजय शिर्के,  सविता मांडलेकर,  कांता नागावकर,  स्वप्निल नागावकर,  सिद्धेश कुंभार, प्रज्वल कुंभार (प्रशिक्षक),  सचिन साळवी, सुखदेव सारवे,  देवेंद्र कुंभार, यशवंत बिरवाडकर,  उद्धव साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमास कुंभार समाजातील बांधव, भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे कुंभार समाजातील युवकांना स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून समाजाच्या आर्थिक सबलीकरणाला चालना मिळणार आहे.

मोजणी अर्जासाठी ‘हेल्प डेस्क’स्थापन 

मोजणी अर्जासाठी ‘हेल्प डेस्क’स्थापन ठाणे: ठाणे शहरातील नागरिकांसाठी मोजणी अर्ज दाखल करण्यासाठी ‘मदत कक्ष’ नगर भूमापन अधिकारी ठाणे भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू करण्यात आले आहेत. यासह नागरिकांना मोफत तांत्रिक सहाय्य कार्यालयांमध्ये मोजणी प्रकरणे “ई-मोजणी आज्ञावली व्हर्जन २.० स्वीकारली जात आहेत. या प्रक्रियेबाबत सर्वसामान्य नागरिकांना पुरेशी माहिती नसल्याने अर्ज भरताना अनेक अडचणी येतात. नगर भूमापन कार्यालय ठाणे येथे नागरिकांसाठी ‘मदत कक्ष’ स्थापन करण्यात आला असल्याची माहिती नगर भूमापक अधिकारी सिद्धेश्वर घुले यांनी दिली. या प्रणालीत नागरिकांना अर्जासोबत जमिनीचा  मालमत्ता पत्रक, संबंधित अभिलेख, बिनशेती मोजणीसाठी मंजर रेखांकन आराखडा, पोटहिस्सा मोजणीसाठी (आवश्यक असल्यास स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नियोजन प्राधिकरणाकडील रेखांकन व ना हरकत दाखला, ओळखीचा पुरावा आदी कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करावी लागतात. मोजणी शुल्काचे चलन करून त्याची पीडीएफ फाईल अपलोड करणे आवश्यक आहे. या मदत कक्षामधून मोजणी अर्ज भरण्यापासून ते प्रकरण निकाली निघेपर्यत आवश्यक असलेली सर्व मदत नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेमुळे खाजगी यंत्रांकडून नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे. त्यामळे नागरिकांनी मदत कक्षाचा लाभ घेऊन आपले मोजणी अर्ज मोफत भरून घ्यावेत व येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन नगर भूमापन अधिकारी ठाणे कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली ठाणे :  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवाकाळात नेहमी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने शासकीय कर्तव्य पार पाडले. त्यांच्या निधनाने राज्य शासनाने एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले आहे, अशी भावना जिल्हाधिकारी डॉ. कृष्ण पांचाळ यांनी उपस्थितांच्या वतीने यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारीप डॉ.संदिप माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शशिकांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव म्हस्के-पाटील, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ. संतोषी शिंदे, तहसिलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, उमेश पाटील, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आनंद पाटील यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करण्यात येवून त्यांना हे दु:ख सहन करण्याचे बळ लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील  मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

केडीएमसी महापौर पदासाठी शिवसेनेच्या वतीने हर्षाली चौधरी थविल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

केडीएमसी महापौर पदासाठी शिवसेनेच्या वतीने हर्षाली चौधरी थविल यांचा उमेदवारी अर्ज दाखल तर उपमहापौर पदासाठी भाजपाच्या वतीने राहुल दामले यांनी दाखल केला अर्ज कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून महापौर पद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. या महापौर पदासाठी शिवसेनेच्या वतीने नगरसेविका हर्षाली चौधरी थविल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी भाजपाच्या वतीने नगरसेवक राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात पालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे हे दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. कांत शिंदे, आमदार राजेश मोरे, मनसेचे माजी आमदार राजू पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नंदू परब, नरेंद्र सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. मात्र दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराचे अर्ज दाखल झाल्याने, या महत्त्वाच्या पदांवरील निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेतील निवडणूक प्रक्रिया ही केवळ औपचारिकता ठरणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून असून, नव्या महापौर आणि उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास खासदार डॉ कांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान ॲड.हर्षाली चौधरी थविल या प्रभाग क्र. 3 ब मधून निवडून आल्या असून त्या उच्चशिक्षित वकील आहेत. यंदाची त्यांची नगरसेवक पदाची दुसरी टर्म असून मागील नगरसेवक कारकिर्दीचा अनुभव आहे.  मुंबई हायकोर्ट येथे, 1० वर्षांपेक्षा अधिक वकिली अनुभव, नगरसेवक म्हणून स्थायी समिती सदस्यां म्हणून कामकाज केले आहे. तर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेले भाजपाचे जेष्ठ नगरसेवक राहुल दामले हे उच्चशिक्षित असून बांधकाम व्यावसायिक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  सक्रिय सदस्य आहेत. राहुल दामले विधानसभा निवडणूक लढण्यासाठी दावेदार होते. २००५ साली स्विकृत नगरसेवक होते. २०१०, २०१५ आणि २०२६ साली नगरसेवक पदी निवडून आले. २०१३ -१४ साली उपमहापौर पदी होते. २०१८ साली स्थायी समिती सभापती पदी होते. २०१९ साली विरोधी पक्ष नेते पदी होते. आत्ता पुन्हा त्यांच्या गळयात दुसऱ्यांदा उपमहपौर पदाची माळ पडली आहे.…

दहावी-बारावी परीक्षेत कॉपी झाल्यास केंद्राची मान्यता रद्द

दहावी-बारावी परीक्षेत कॉपी झाल्यास केंद्राची मान्यता रद्द बोर्डाचा ‘कडक’ इशारा हरिभाऊ लाखे नाशिक: फेब्रुवारी-/मार्चमध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षांवेळी ज्या केंद्रांवर गैरप्रकार आढळतील, त्यांची मान्यता रद्द करण्याचा इशारा विभागीय शिक्षण मंडळाने दिला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय मंडळ आणि जिल्हा मुख्याध्यापक संघ यांची संयुक्त बैठक झाली. मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाष बोरसे, सचिव मोहन देसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व केंद्रांवरील खोल्यांमध्ये आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. २०२५ च्या परीक्षेत ज्या केंद्रांवर गैरप्रकार आढळले होते, त्यांची मान्यता रद्द करण्याबाबत कठोर भूमिका मांडण्यात आली. राज्यातील अतिवृष्टी व आपत्तीमुळे बाधित झालेल्या १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच परीक्षक आणि नियामकांची संख्या वाढवून कामाचा ताण कमी करण्यासाठी, एका परीक्षकास जास्तीत जास्त २०० तर नियामकास १००० उत्तरपत्रिका तपासणीसाठी देण्याबाबत चर्चा झाली. सातत्याने परीक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांऐवजी आतापर्यंत हे काम न केलेल्या नवीन शिक्षकांना संधी देण्याबाबत विचार विनिमय झाला. केंद्र संचालक, कर्मचारी आणि पर्यवेक्षक यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. ५३ वर्षांवरील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना परीक्षक आणि नियामक कामातून सवलत देण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत मुख्याध्यापक संघाचे एस. बी. देशमुख यांनी, परीक्षा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मुख्याध्यापक आणि मंडळ यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. शिक्षकांवर पडणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी मांडलेल्या मागण्यांवर मंडळ सकारात्मक विचार करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांची शुल्क माफी आणि मानधन वाढ या विषयांकडे आम्ही प्राधान्याने लक्ष वेधले असल्याचे त्यांनी नमूद केले. विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. बोरसे यांनी, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य असून यासाठी स्थानिक खासदार, आमदार यांच्याकडून निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी सूचना केली. कंपनी उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून घ्यावेत तसेच वेतनेतर अनुदानात सीसीटीव्हीसाठी तरतूद करण्यात यावी, अशी सूचना डॉ. बोरसे यांनी केली. मुख्याध्यापक संघाकडून मांडलेल्या मागण्यांबाबत मंडळ सकारात्मक असून याविषयी वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठविण्यात येईल, असे डॉ. बोरसे यांनी सांगितले.

सीटीसीच्या शताब्दी समिटला मुंबईत प्रारंभ

सीटीसीच्या शताब्दी समिटला मुंबईत प्रारंभ रमेश औताडे मुंबई : चेंबर ऑफ टॅक्स कन्सल्टंट्स या अग्रगण्य व्यावसायिक संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘द शताब्दी समिट सेंटेनरी कॉन्फरन्स’ या दोन दिवसाच्या भव्य परिषदेला शुक्रवारी प्रारंभ झाला. परिषदेचे प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते इंडसइंड बँकेचे नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन डिझिग्नेट अरिजित बसू यांनी  भारताच्या आर्थिक प्रवासात लवचिक वित्तव्यवस्था व जबाबदार विकास या विषयावर बोलताना त्यांनी नैतिकता, दीर्घकालीन दृष्टिकोन आणि व्यावसायिकांच्या जबाबदारीवर भर दिला. बदलत्या आर्थिक व व्यावसायिक वातावरणात कर, कायदा व लेखा क्षेत्रातील तज्ज्ञांनी तंत्रज्ञान, प्रशासन आणि उत्तरदायित्वाशी सुसंगत राहणे आवश्यक आहे. शताब्दी समिट हे या दृष्टीने मार्गदर्शक ठरेल असे सीटीसीचे अध्यक्ष सीए जयंत गोखले यांनी सांगितले. उपाध्यक्ष सीए नेहा राजेन गडा, संयुक्त मानद सचिव सीए मेहुल शेट्टी व सीए अंकित संघवी तसेच मानद खजिनदार सीए वितांग शाह उपस्थित होते. शताब्दी वर्ष समितीचे अध्यक्ष सीए विपुल चोक्सी यांनी सांगितले की, परिषदेत भांडवली बाजार, स्टार्टअप्स, जीएसटी, संबंधित पक्ष व्यवहार, कर नियोजन तसेच व्यावसायिक सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावावर सखोल चर्चा झाली.

टेंभरे (बु.) ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला उपसरपंचपदी सुनंदाताई गायकवाड विराजमान

टेंभरे (बु.) ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला उपसरपंचपदी सुनंदाताई गायकवाड विराजमान राजीव चंदने मुरबाड: तालुक्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या तंटामुक्ती तथा हागणदारी मुक्त ग्राम सन्मानित टेंभरे (बु.) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनंदाताई कैलास गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला उपसरपंच होण्याचा मान त्यांनी पटकावला आहे. ग्रामपंचायतीच्या ज्येष्ठ सदस्या असलेल्या सुनंदाताई गायकवाड यांच्या निवडीमुळे गावातील अनेक प्रलंबित विकासकामे जलद मार्गी लागतील, असा विश्वास सरपंच सुहास केंबारी यांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीबद्दल गावात सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून विशेषतः महिला वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. या निवडीप्रसंगी माजी सरपंच दिलीप केंबारी, शरद केंबारी, माजी उपसरपंच सुरेश जाधव, अभय केंबारी, धनाजी टोहके, ग्रामपंचायत सदस्य संजय केंबारी, नंदा केंबारी, शुभांगी पवार, मंगला खुटारे, तसेच राजेश केंबारी, दामोदर जाधव, भगवान जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेविका ज्योती पवार, अंगणवाडी सेविका मोनिका केंबारी तसेच गावातील महिलांनी सुनंदाताई गायकवाड यांचे विशेष अभिनंदन केले. प्रथमच महिला उपसरपंचपदाचा मान मिळाल्याने गावातील महिलांमध्ये आत्मविश्वास व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या उपस्थितीत मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली

अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या उपस्थितीत मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अशोक गायकवाड रत्नागिरी : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात २ मिनिटे मौन पाळून आज आदरांजली वाहण्यात आली. अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण विश्वजीत गाताडे, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मौन सुरु होण्यापूर्वी सकाळी ठीक १०.५९ ते ११ वाजता इशारा भोंगा वाजविण्यात आला. त्यानंतर ११.०३ वाजता मौन संपल्या संबंधिताचा इशारा भोंगा वाजविण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी रोजी २ मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते.