फडणवीसांची शरद पवारांना आणखी एक धोबीपछाड…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर अवघ्या चार दिवसात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकीय चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांना आणखी एक धोबीपछाड दिली आहे असे म्हणता येईल. या कृतीमुळे शरद पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना ब्रेक लागला आहे.
जुलै २०२३ मध्ये अजित पवार आपले काका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत बाहेर पडले. त्यांनी आपल्या सोबत चाळीस आमदारही घेतले होते. तसेच काही खासदारही त्यांनी आपल्या सोबत घेतले होते. परिणामी शरद पवारांचा पक्ष पुरता खिळखिळा झाला होता. त्याचे परिणाम २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून आला. एका काळी महाराष्ट्राच्या राजकारणात आपले वर्चस्व ठेवणाऱ्या शरद पवारांना विधानसभेत जेमतेम दहा जागा मिळू शकल्या. शरद पवारांचे वाढलेले वय, त्याच वेळी आपला पक्ष भविष्यात आपली मुलगी सक्षमपणे सांभाळू शकणार नाही याची कल्पना आल्यामुळे शरद पवारांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यायला हव्या आहेत. त्यातच एप्रिल २०२६ मध्ये शरद पवारांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत देखील संपते आहे पुन्हा त्यांना राज्यसभेत जायचे असेल तर कोणाच्यातरी कुबड्या लागणारच आहेत ते लक्षात येतच त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर हात मिळवणे करण्याचा डाव टाकला होता अजित पवारांना देखील पुढे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आपल्या ताब्यात ठेवायच्या होत्या त्यासाठी त्यांनाही तिथे काकांची मदत लागणार होती म्हणून त्यांनी निवडणुकीपूर्ती युती केली होती निवडणुकीनंतर आपण पुन्हा महाराष्ट्रात भाजपासोबतच जाऊ असे त्यांनी संकेतही दिले होते.
मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर चित्र काहीसे बदलले. त्याचाच फायदा घेऊन शरद पवार गटाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण व्हावे ही अजित पवारांची इच्छा होती आणि त्यांची शेवटची इच्छा म्हणून आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यायला हव्या अशी चर्चा सुरू केली होती.
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काहीसा सैरभैर झाला होता. अजित दादांनी पक्षाची स्थापना करून जेमतेम अडीच वर्ष झाले आहेत. त्यातही सुरुवातीचा काळ कायदेशीर लढाईतच गेला. मग आधी लोकसभा मग विधानसभा आणि मग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर होत्या. त्यामुळे संघटनात्मक बांधण्यासाठी त्यांना फारसा वेळ मिळाला नाही. परिणामी आता दादांनंतर सर्वमान्य असे नेतृत्व कोणाचे हा प्रश्न समोर आला. तीच संधी साधून आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण व्हावे अशी खेळी खेळली गेली.
मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले असते, तर सर्व सूत्रे शरद पवारांच्या हातात गेली असती. त्यावेळी मग पक्षात सहाजिकच सुप्रिया सुळे यांचे वजन राहिले असते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे यांना विरोध करणारा फार मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांना हे एकत्रीकरण नको होते. म्हणूनच इकडे अजित पवारांची चिता जळत असतानाच नरहरी झिरवाळांनी आता पक्षाचे नेतृत्व सुनेत्रावहिनींनीच करावे असे सुतोवाच करून टाकले होते.
मात्र या गोष्टी इतक्या झटपट होतील याची कोणालाच खात्री नव्हती. त्यामुळेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पुढाकार घेत हालचाली केल्या. मिळालेल्या माहितीनुसार हे पूर्ण स्क्रिप्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लिहिले होते. तुम्ही सुनेत्रावहिनींना तयार करा, आपण तातडीने त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी उरकू आणि मग पक्षाचे नेतृत्वही त्यांच्याकडे द्या, म्हणजे पक्ष विस्कटणार नाही आणि शरद पवारांच्या दावणीला पक्ष बांधला जाणार नाही. फडणवीसांची ही सूचना पटेल आणि तटकरे यांनी तातडीने अमलात आणली आणि सुनिता वहिनींना तयार करून शरद पवारांना किंवा त्यांच्या निकटवर्तीयांना कल्पना न देता त्या मुंबईत दाखल झाल्या. इकडे लगेच पक्षाच्या विधिमंडळ गटाची बैठक बोलावली गेली आणि त्यात सुनेत्रा पवारांना आपला नेता निवडून लगेचच मुख्यमंत्री आणि राज्यपालांना कळवले गेले आणि संध्याकाळी सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी सुद्धा आटोपला गेला. त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्रे सुनेत्रा पवार यांच्याच हातात राहणार हे निश्चित झाले आहे. परिणामी आता दोन्ही पक्ष विलिनीकरणाची हालचाल मंदावणार आणि प्रसंगी थांबणार सुद्धा हे चित्र स्पष्ट दिसते आहे.
त्यामुळेच शरद पवार चांगलेच नाराज झाले आहेत. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, ते आपल्याला माहीतच नव्हते असा दावा त्यांनी केला. मात्र पवारांनी हे सांगितले, त्याच्या किमान १४ ते १८ तास आधीपासूनच सर्व वृत्तवाहिन्या ओरडून ओरडून सांगत होत्या, की सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास होकार दिलेला आहे. त्यानंतर त्या मुंबईच्या दिशेने निघाल्या हे देखील वृत्तवाहिन्यांनी दृश्य दाखवले होते. शरद पवारांना ही वृत्तवाहिन्यांवर दिसले असेलच हे नक्की. तरीही ते सुनेत्रा पवारांकडूनच आपल्याला सांगितले जाईल याची वाट बघत होते का हाही प्रश्न निर्माण होतो. त्यांना वाटले असते तर ते सरळ फोन करून विचारून सुद्धा शकले असते. मात्र त्यांनी तसे का केले नाही हा प्रश्न देखील जनसामान्य विचारू शकतात. अर्थात शरद पवार त्याचे उत्तर द्यायला बांधील नाही हे देखील तेवढेच खरे.
आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. लवकरच पक्षाची सूत्रे सुद्धा त्या हातात घेतील. जरी त्या दादांची दशक्रिया आटोपेपर्यंत बारामती सोडणार नसल्या तरी त्या आता कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहतील हे नक्की आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा त्या लक्ष घालतीलच. परिणामी दादांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आता पक्षाशी बांधून राहील हे पक्के झाले आहे. अशा परिस्थितीत आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा विचार किमान दादांच्या राष्ट्रवादीकडून तरी प्रलंबितच ठेवला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात स्वतःची बळ वाढवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन महत्त्वाचे अडथळे मानले जात होते. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी हे दोन्हीही पॉवर पॉईंट्स खिळखिळे करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसन वर टाकलेली आहे. त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी देखील झालेले आहेत. त्यामुळेच आज हे दोन्ही पक्ष फक्त कांगावा करणे इतकेच काम करू शकलेले आहे. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर कदाचित भाजपला काही प्रमाणात होईना पण धोका निर्माण करू शकतील याची कल्पना आल्यामुळेच फडणवीस यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ नये यासाठी खेळी खेळली आणि सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा घाईने निर्णय घेतला. योग्य नियोजन करून त्यांनी हा निर्णय तडीला देखील नेला आहे. म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा आजवर महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यातील पहिलवान म्हणून ओळखले जाणाऱ्या शरद पवारांना पुन्हा एकदा शिंगावर घेऊन अंगावर पडले आहे हे निश्चित.
कालचक्र
अविनाश पाठक
