यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३१ वा दीक्षान्त सोहळा ४ फेब्रुवारीला
एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार
हरिभाऊ लाखे
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३१ वा दीक्षान्त समारंभ येत्या बुधवार ०४ फेब्रुवारीला सकाळी साडेनऊ वाजता विद्यापीठ आवारात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह व न्याय विभाग) तथा राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद – एनसीव्हीईटी (NCVET – National Council for Vocational Education and Training) चे माजी अध्यक्ष डॉ. निर्मलजित सिंह कलसी (सेवानिवृत्त आय.ए.एस.) हे उपस्थित राहून स्नातकांना दीक्षान्त भाषण देणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे राहणार असून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांची उपस्थिती असणार आहे. यावर्षी विद्यापीठाचे एकूण एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थी पदवी प्राप्त करीत आहेत. त्यात ७७ दृष्टीबाधित, राज्यातील विविध कारागृहातील ६८ बंदीजनांसह ११ सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या समारंभामध्ये ऑनलाईन नोंदणी केलेले स्नातक उपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे व परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांनी दिली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील १४ विद्याशाखा व राज्यभरातील आठ विभागीय केंद्रे आणि सुमारे १६८४ अभ्यासकेंद्रे यांच्यामार्फत राज्यभरात ज्ञानदानाचे कार्य केले जात आहे. या ३१ व्या दीक्षान्त समारंभांसाठी पीएच. डी., पदव्युत्तर पदवी, पदवी व पदविका अशा विविध प्रकारच्या १०१ शिक्षणक्रमांतील एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना यंदा पदवी प्रदान केली जाणार आहे.
३१ व्या दीक्षान्त समारंभाची वैशिष्ट्ये :–
- १ लाख २३ हजार ९२१ पैकी पदविकाधारक १२ हजार ६३७, पदवीधारक ९० हजार ७०८, पदव्युत्तर पदवीधारक २० हजार ५७१, पीएच. डी. धारक – ५ विद्यार्थी. ७१ हजार ७९१ पुरुष व ५२ हजार १३० स्त्री विद्यार्थी. पदवीधारकात ६० वर्ष वयावरील २०८ विद्यार्थ्यांचा समावेश.
- या दीक्षांत समारंभापासून विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणारी पदवी व पदविका प्रमाणपत्रे वैशिष्ट्यपूर्ण असून त्यावर १६ अंकी अपार / एबीसी आयडी अंकित राहील. तसेच त्यावर ब्लॉकचेन प्रणालीवर आधारित क्यूआर कोड छापलेला असून, तो स्कॅन करून प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करता येऊ शकेल.
- NAD अंतर्गत डीजीलॉकर पोर्टलवर पदवी/पदविका प्रमाणपत्राची डीजीटल ई-कॉपी दीक्षान्त समारंभ संपल्यानंतर लगेचच उपलब्ध राहणार आहे. याव्यतिरिक्त पदवी / पदविका प्रमाणपत्राची डीजीटल कॉपी, ई-सुविधा मोबाईल ॲपमध्ये कायमस्वरूपी उपलब्ध राहणार आहे. प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याचा रंगीत फोटो व आईचे नाव देखील असणार आहे.
- विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मदतकक्ष, हिरकणी कक्ष व सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
स्नातकांसाठी महत्वाची सूचना ;- या दीक्षान्त समारंभासाठी ऑनलाइन नोंदणी करून ज्या स्नातकांनी शालसाठी अनामत रक्कम रु. ५००/- भरलेली आहे. फक्त अशा स्नातकांनाच शाल देण्यात येईल. संबंधित स्नातकांनी अनामत रक्कम भरल्याची पावती विद्यापीठातील परीक्षा विभागात दाखवून सकाळी ०८.०० ते ०८.४५ वाजेच्या दरम्यान शाल प्राप्त करून घ्यावी व स्नातकांनी पांढरा शुभ्र पोशाख व शाल परिधान करून सभामंडपात सुरक्षितेच्या दृष्टीने सकाळी ०९.०० वाजता स्थानापन्न व्हावे. स्नातकांना समारंभाच्या शिष्टाचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व सूचना https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=२८३२९ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या समारंभाचे थेट प्रक्षेपण हे विद्यापीठाच्या https://youtube.com/@ycmouofficialyoutubechannel या अधिकृत युट्यूब चॅनेलवर व https://www.facebook.com/ycmouniversity या फेसबुक पेजद्वारे करण्यात येणार आहे.
दीक्षान्त समारंभासाठी मोफत वाहन व्यवस्था :-
सर्व स्नातकांना विद्यापीठात दीक्षांत समारंभ स्थळी पोहचता यावे याकरिता विद्यापीठातर्फे विनामूल्य बस व टेम्पोट्रॅव्हलर वाहनाची सोय करण्यात आलेली आहे. त्यानुसार सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत बारदान फाटा (गंगापूर रोड) ते विद्यापीठ व दीक्षान्त समारंभ कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान विद्यापीठ ते बारदान फाटा अशी वाहतूक व्यवस्था राहील. विद्यार्थ्यांनी या समारंभाच्या अधिक माहिती साठी www.ycmou.ac.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी. काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत (०२५३)२२३०५८०, २२३१७१५, २२३०१०६, २२३१७१४ या विद्यार्थी मदत केंद्रावरील दूरध्वनी क्र्मांकावर किंवा ९३०७५७९८७४, ९३०७५६७१८२ अथवा ९२७२०४६७२५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.
