राष्ट्रवादीने विलिनीकराणाआधी
भाजपाशी चर्चा करावी: फडणवीस
मुंबई : अजित पवार भाजपशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा निर्णय करतील का? असा प्रश्न उपस्थित करीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीने विलिनीकरणाचा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी असं आज स्पष्ट केले.
अजित पवार राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आग्रही होते आणि १२ फेब्रुवारी रोजी ते जाहीर करणार होते असा दावा शरद पवारांच्या गटाकडून करण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “समजा अजित पवार जर राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाचा निर्णय घेत असतील तर ते भाजपशी चर्चा केल्याशिवाय घेतील का? चर्चा अंतिम स्टेजला गेली असती, तारीख ठरली असती तर त्यांनी आम्हाला सांगितलं असतं. अशा प्रकारच्या कोणत्याही तारखेची आम्हाला माहिती नाही. राष्ट्रवादीने असा कोणताही निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी.”
निधनाच्या आदल्यादिवशी अजित पवार आणि मी दोन तास बोलत बसलो होतो, तशी कोणतीही माहिती मला त्यांनी दिली नाही असंही फडणवीसांनी यावेळी सांगितले. सुनेत्रा ताईंनी नेतृत्व करावे हा त्यांचा पक्षाचा निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या निर्णयासोबत उभे राहणे हे आमचं काम आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
