रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार
पाच संशयीतांना पुण्यातून अटक
मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घरावर अज्ञात हल्लेखोरांनी रविवारी मध्यरात्री गोळीबार केला. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून त्याच्या बालकनीच्या काचा मात्र या गोळीबाराने फुटल्या आहेत. बिष्णोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
दरम्यान या हल्लाप्रकरणी पोलिसांनी पुण्याहून चार संशयतींना अटक केली आहे. तपासात अमन मरोटे (२७), आदित्य गायकी(१९), सिद्धार्थ येनपुरे (२०), समर्थ पोमजी (१८) आणि स्वप्निल सकट (२३) यांची नावे पुढे आली आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, रात्री उशिरा एक तरुणाने दुचाकीवरून येत रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर ओळख लपवण्यासाठी हुडी घालून ४ गोळ्या झाडल्या आणि काचा फोडल्या. गोळीबारानंतर तरुण दुचाकीवरून फरार झाला.
पोलिसांना घटनास्थळावरून चार रिकाम्या बुलेट शेल मिळाल्या आहेत. त्या फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आल्या आहेत.
“घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेट्टी आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत,” असे पोलिसांनी स्पष्ट केले.
