दत्तक मुलाला पालकांची जात लावण्याचा पूर्ण हक्क- मुंबई उच्च न्यायालय
अनिल ठाणेकर
ठाणे, दत्तक घेतलेल्या मुलाला दत्तक पालकांची जात लावण्याचा पूर्ण हक्क असून, तो हक्क नाकारणे म्हणजे त्या मुलाचे भविष्य अंधारात टाकण्यासारखे ठरेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियमाअंतर्गत दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो मुलगा दत्तक पालकांचे वैध अपत्य ठरतो आणि त्या नात्याशी संबंधित सर्व हक्क, सवलती व जबाबदाऱ्या त्याला प्राप्त होतात, असे न्या. एम. एस. कर्णिक व न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.मुलाला जात प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने संबंधित महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली. संबंधित मुलाचा जन्मावेळी त्याग करण्यात आला होता. त्यानंतर पुणे जिल्हा न्यायालयाने बाल न्याय अधिनियम, २००० अंतर्गत दिलेल्या आदेशाने महिलेला व तिच्या पतीला दत्तक पालक घोषित केले होते. तसेच पुणे पालिकेला मुलाच्या जन्म प्रमाणपत्रात दत्तक पालकांची नावे नोंदविण्याचे निर्देश दिले होते.
